जळगाव : अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने रविवारी (१४ डिसेंबर) शांताराम नारायण चौधरी नगर (खान्देश सेंट्रल) येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात ६५ तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. यात ३५ मुलांचा आणि ३० मुलींचा समावेश होता. मेळाव्याच्या शेवटी सहा जोडप्यांचे विवाह यशस्वीपणे जुळले. आयोजकांनी याची माहिती दिली. हे सहा जोडपे आता पुढील लग्न सोहळ्यासाठी तयार झाले आहेत.
मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, “आजकाल सर्वच समाजात मुलींची कमतरता आहे. मुलगी देणाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याने अनेक तरुण-तरुणींचे लग्न उशिरा होत आहे किंवा होतच नाही. शेतकरी कुटुंबातील मुलांना मुलींचे पालक नकार देतात, याबद्दल खेद वाटतो. जर मुलगा निर्व्यसनी असेल, मेहनती असेल आणि आधुनिक शेती करत असेल तर त्याला नक्कीच संधी द्यायला हवी. गुण असल्यास झोपडपट्टीतला मुलगादेखील जिल्हाधिकारी होऊ शकतो, हे वास्तव आहे.”
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, शांताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सिंधुताई चौधरी, महिला मंडळ अध्यक्षा प्रमिला चौधरी, संतोष चौधरी, अॅड. महेंद्र सोमा चौधरी, भागवत चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष भाग्यवंत, रामेश्वर चौधरी, डॉ. वसंतराव भोलाणे, नामदेवराव चौधरी, श्रीराम चव्हाण, सुभाष चौधरी, प्रशांत सुरळकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी कडोजी महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले तर सूत्रसंचालनही त्यांनीच केले. आभार दशरथ चौधरी यांनी मानले.
या मेळाव्यामुळे तेली समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत झाली असून, समाजात एकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढली आहे. असे मेळावे नियमित आयोजित केल्यास सामूहिक विवाहांना प्रोत्साहन मिळेल आणि अनावश्यक खर्च कमी होईल, अशी अपेक्षा सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade