सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ) : तिळवण तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. संताजी महाराज हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रमुख लेखक आणि संत परंपरेतील थोर व्यक्तिमत्व मानले जातात. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित हा उत्सव सोनई येथील भजनी मंडळ मंदिरात दि. १० ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडला.

सोहळ्याची सुरुवात बुधवारी झाली. संत तुकाराम महाराज गाथेचे सतत पारायण करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन, आरती, पुष्पाजली आणि फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. त्यांनी उपस्थित भक्तांना संताजी महाराजांच्या जीवनाचा आणि कार्याचा उलगडा करून दिला.
या उत्सवात माऊली महिला मंडळ, तेली महिला मंडळ तसेच सोनई आणि परिसरातील तेली समाजाचे अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनीही उत्साहाने सहभाग घेऊन भजन-कीर्तन आणि पूजनात भाग घेतला. सोहळ्यातील भक्तिमय वातावरणाने सर्वांचे मन जिंकले.
रामदास महाराज क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समाजबांधवांकडून आर्थिक मदतीचे आवाहन केले. मंदिराच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी सर्वांनी उदार हाताने मदत करावी, असे ते म्हणाले. अशा सोहळ्यांमुळे संत परंपरेची ओळख कायम राहते आणि समाजात एकता वाढते, असेही त्यांनी नमूद केले.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी तेली समाजाच्या सर्व बांधवांनी आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. असे धार्मिक कार्यक्रम नव्या पिढीला संतांच्या शिकवणीशी जोडतात आणि समाजात भक्ति व सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत करतात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade