नांदगाव (ता. येवला, जि. नाशिक) : श्री संत सावता महाराज मंदिरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हा सोहळा प्रांतिक तैलिक महासभेचे युवा प्रदेश महासचिव तथा भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमात उत्तर नाशिक जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी यांनी 'संतु तुका जोडी लावी ज्ञानाची गोडी' या विषयावर मार्मिक प्रवचन केले. त्यांनी संत तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या जोडीचा उल्लेख करीत ज्ञान आणि भक्तीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे प्रमुख लेखक असून त्यांच्या शिकवणी आजही समाजाला दिशा देतात, असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी नरेंद्र चौधरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून समाजाने एकत्र येऊन संघटित होण्याचे आवाहन केले. “एक है तो सेफ है” असे सांगत त्यांनी संघशक्तीच्या महत्त्वावर भर दिला. राजकारणात ताकद दाखवल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही, अशी जाणीव त्यांनी करून दिली. समाजाने एकसंघ राहिले तरच आपले हक्क आणि प्रतिनिधित्व वाढेल, असे ते म्हणाले.
यावेळी प्रकाश बढे, ॲड. शशिकांत व्यवहारे आणि ॲड. बी. आर. चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी संतांनी घालून दिलेला भक्ति आणि समतेचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले. संत विचारांच्या माध्यमातून सुदृढ आणि सुसंस्कृत समाज घडवता येईल, असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला मनमाडचे माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ, नाशिक विभाग अध्यक्ष ॲड. शशिकांत व्यवहारे, जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी, जिल्हा सचिव दिलीप सौंदाणे, प्रकाश बढे, राजेंद्र व्यवहारे, वैशाली चौधरी, तुषार चौधरी (धुळे), तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, आप्पा सौंदाणे, बाळासाहेब वाघ, दिगंबर महाले, धर्मा महाले, बाळासाहेब खैरनार, दत्तात्रय बत्तासे, कुमुद चौधरी, सरला चौधरी, ज्योती व्यवहारे, माजी नगरसेविका वनिता पाटील, कृष्णा सोनवणे, राम देहाडराय, विशाल खैरनार, सचिन शिरसाठ, संजय वाघ, ज्ञानेश्वर देहाडराय यांच्यासह नांदगाव, मनमाड, न्यायडोंगरी आणि जातेगाव परिसरातील अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सोहळ्याची सांगता संताजी महाराजांची महाआरती आणि महाप्रसाद वाटपाने झाली. अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे तेली समाजात एकता वाढते आणि संत परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade