मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जातीजमाती भाजपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भुदान यज्ञाचे प्रणेते जगविख्यात आचार्य विनोबाजी भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती डॉ. सुशील नायर आणि सहकार महर्षी स्व. दादाजी देशमुख यांच्या कर्मभुमीत देवळी येथे दि. 1 एप्रिल 1954 रोजी रामदासजी तडस यांचा जन्म झाला. वयाची 62 वर्ष पुर्ण करणार्या या पैलवानाचा आजचा उत्साह एखाद्या तरुणास लाजवेल एवढा आहे. आज रामदासजींचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना समस्त जनतेसोबत माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
वर्धा यवतमाळ मार्गावरील देवळी या छोटेखानी गावात चंद्रभानजी तडस आणि त्यांची सौभाग्यवती कौसल्याबाई यांच्या पोटी रामदास तडस यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती फार समाधानकारक नव्हती. देशाला नुकतेच स्वातंंत्र्य मिळाले होते. देशाचा विकास नव्हता, त्यामुळे तेव्हाच्या मध्यप्रदेशचा सी.पी. एन्ड बेरार म्हणुन गणल्या जाणारा विदर्भतसेच वर्हाड भाग ज्यात आजचा अमरावती महसुल भाग येतो तो पुर्णत: दुर्लक्षीत होता. आईवडीलांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शालेय काळात रामदास तडस फावल्या वेळात शेतीवर वडिलांना मदत करीत असत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा समाज प्रबोधनाचे कार्य करीत होते. गाडगे बाबांच्या एका प्रवचनात त्यांना शरीर संपत्ती सर्वात मोठी संपत्ती असे ऐकायला मिळाले आणि तेव्हा किंगकाँग नामक पहेलवनाचा जगभर बोलबाला होता. रामदास तडस यांनी प्राथमिक शाळेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इयत्ता 5 वीत प्रवेश करताच आभ्यासापेक्षा मैदानी खेळांकडे लक्ष पुरविले. प्रारंभी कब्बडी खो-खो मध्ये त्यांना रस होता. पण त्या सांघिक खेळात यशस्वी झालेल्य चमुचे अभिनंदन होतांना एका विशिष्ट खेळाडूस मान मिळत नव्हता. सांघिक नेतृत्वाने आमुक संघ जिकला, अशी चर्चा व्हायची हिच बाब त्यांनी हेरली. आयुष्यात नावलैकीक कमवायचा असेल तर एकल स्पर्धा जिंकणे जरूरी आहे, असे त्यांना जाणवले. एकल स्पर्धेत सर्वाधिकत संधी कुस्तीमध्ये आहे, असे समजुन रामदास तडस यांनी शरीर कमावतांनाच कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरूवात केली. कुस्तीचे फड कसे जिंकायचे यांची संपुर्ण तयारी करीत असताना त्यांनी मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण केली. तोवर विदर्भाचा समावेश महाराष्ट्र राज्यात झाला होता. महाराष्ट्राच्या कोल्हापूर नगरीचे पैलवान अख्खा महाराष्ट्र गाजवत होते. तथापी पिता चंद्रभानजी तडस यांनी पुत्र रामदासला महाविद्यालयाच्या क्रीडाक्षेत्रातुन कुस्तीचे प्रशिक्षण घे आणि देवळीचे नाव काढ ! असा सल्ला दिला. नागपूरला त्यांचे आगमन होताच उपराजधानीत मराठा लॉन्सर्स, सुभाष मंडळ, नबाबपुर्यातील जंगी आखाडा वगैरेची त्यांना माहिती मिळाली. भाऊसाहेब सुर्वे, माधव कडव, शंकर वस्ताद, एस.टी. भोतमांगे आदींच्या सानिध्यात रामदासजी आले. नागपुरच्या कुस्तीगीर संघात त्यांची निवड झाली. तो रामदासजीसाठी सुवर्णदिन होता. देवळीच्या या मल्लाने नागपूर विद्यापीठाला अनंत सुवर्णपदक प्राप्त करून दिलीत. पुढे तर कुस्ती म्हणजे रामदास तडस हे समीकरणच बनले. त्यांच्या कलागुणांची पारख करून नागपूर विद्यापीठाने त्यांना कुस्तीसाठी कलर बहाल केला. त्याच महाविद्यालयीन काळात तरूणांच्या प्रश्नावर वेळावेळी जी आंदोलन झालीत, त्यातरामदासजींचा सहभाग असायचा. आंदोलनातून मित्र परिवार वाढला, ओळख व माणस जोडण्याची कला त्यांना शिक्षण काळातच अवगत झाली होती. देशातुन आणीबाणी नावाचे काळे पर्व हटले आणि दि. 16 जुन 1977 रोजी रामदास तडस यांनी सौ. शोभाताईंशी विवाह केला. वैवाहिक बंधनात रामदासजी अडकले. घर-संसार आणि वृद्ध आई वडिलांची सेवा करण्याच्या भानगडीत ते कुस्ती पासुन दुर जातील, अस त्यांच्या घरच्यांना तसेच चाहत्यांना वाटत होते. पण रामदासजींनी पूर्वीचा जोश कायम ठेवत 1976, 1978, 1980 तसेच 1982 या चार वर्षी विदर्भ केसरी चा बहुमान पटकावला. विदर्भातून चार वेळा हा बहुमान पटकवणारे रामदासजी एकमेव मल्ल आहेत. पुढे त्यांनी केवळ प्रशिक्षक म्हणुन देवळी शहरातुन प्रांतीय स्तरावर पेलवान तयार करण्याचा चग बांधला. सोबतच मित्र परिवारांच्या आग्रहास्तव राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचे नक्की केले. सन 1983 मध्ये पूलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक होणार होती. सहकार महर्षी स्व. बापुरावजी देशमुख यांना रामदासजी पितासमान मानत होते. त्यांनी नव्या दामाचा गडी म्हणून रामदासजी तडस यास बाजार समितीच्या निवडणूक रिंगणत उतरविले . महागुरूचा आशिर्वाद पाठीशी असल्यामुळे त्या निवडणुकीत रामदासजी सहज विजयी झाले. बाजार समितीचे कार्यक्षेत्र पुलगाव त्या काळी स्व. मोतीलालजी कपूर यांचे एकछत्र राज्य होते. रामदास तडस यांचे राजकीय गुरू बापुरावजी देशमुख यांच्या इशार्यावर त्यांनी देवळी नगर परिषदेची 1985 ची निवडणुक नगर विकास आघाडी च्या नावाने सर्वांना सोबत घेऊन लढविली. त्यावर्षी नागरिकांनी कपूर यांची 35 वर्षाची राजवट संपवुन शहराची सुत्रे रामदास तडस व त्यांच्या तरूण सहकार्यांकडे सोपविली. सर्व मित्रांच्या आग्रहास्तव नगराध्यपदाची माळ साहजिकच रामदासजींच्या गळ्यात पडली. तेव्हापासून देवळी नगर परिषदेवर त्यांच्यात गटाचा बोलबाला आहे. सन 1994 मध्ये वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिलह्यातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. अपक्ष उमेदवार म्हणून रामदासजींनी रिंगणात उडी घेतली व सुरेश पोरड्डीवार यांन पराभूत करून मुंबईच्या विधान परिषदेत प्रवेश केला. मुंबईच्या महासागरात कुणीतरी राजकीय गुरू असावा असे त्यांना प्रकर्षाने वाटु लागले. सन 2000 मध्ये पुन्हा जि. प. सदस्य, न.प. सदस्य यांच्या आशीर्वादाने त्यांना स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातुन विधानपरिषदेची निवडणूक लढणयाची संधी मिळाली. यावेळी सुद्धा रामदास तडस यांनी फड जिंकला. आशाप्रकारे पूर्व विदर्भाचा 14 नगर परिषद, तीन जिल्हा परिषदांचे प्रश्न विधान परिषदेत मांडलेत. रामदास तडस नगराध्यक्ष झाले, आमदार झाले पण त्यांचा कुस्तीचा पिंड काही सुटला नाही. राजकीय फडापेक्षा त्यांना आखाड्यातील लालमातीचे आणि शेतामधील काळ्या मातीचे आणि वेड सर्वाधिक होत आणि आजही आहे. म्हणुनच त्यांनी देवळी शहरात मल्लांची दुसरी फळी उभी करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले. काही मल्लांना व्यवस्थीत मार्गदर्शन करून विभागीस व राज्यस्तरावर पाठविले एवढेच नाही तर आमदारकीच्या काळात कोणत्याही गावी ते गेले की, तुमच्या गावात ते गेले की तुमच्या गावात व्यायाम शाळा आहे का ? कोणता पोरगा कुस्ती खेळतो ? हे आवर्जुन विचारत होते. या कुस्तीच्या वेडापायी त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा देवळीत भरविली होती. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या पुत्रीला त्या रिंगणात उतरविले होते, पूत्र छोटा असल्यामुळे तडस परिवाराचे नाव मल्लांच्या यादीत नाही, याची खंत त्यांना नेहमी जावणवत होती. आपण ज्या समाजात जन्म घेतला तो समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे, पण पोट जातीमुळे विखुरला आहे, ही सल त्यांना नेहमी बोचत होती. स्व केशर काकु क्षिरसागर शांतारामजी पोटदुखे, संतोष अण्णा चौधरी, आम. जोगेंद्र कवाडे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शेखर सावरबंधे, स्व. अशोक वाडीभस्मे, गिर्हेपुंजे, जगदीश गुप्ता, प्रमोद शेंडे आदींशी वारंवार निमंत्रणा करून त्यांनी तैलिक महासंघाची स्थापना केली. उपरोक्त सर्वाना एकत्र आणुन प्रथम तीन वर्ष सलग समाज बांधवांचे मेळावे घेतले, संत जगनाडे महाराजों मठ गावोगावी व्हावेत, म्हणुन रामदासजींनी महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिण भारत सुद्धा पिंजुन काढला संताजींचे जन्मस्थळ सुदुंबरे येथे 2003 मध्ये भव्य मेळावा घेऊन त्यांनी समाजाप्रती आपली कळवळ दाखवून दिली. प्रत्येक कर्तबगार पुरूषाच्या पाठीमागे त्याच्या अर्धागिनीचा मोठा वाटा असतो. रामदास तडस यांच्या चढत्या कमानित त्यांची पत्नी सौ. शोभाताई कुठेच मागे नव्हत्या. चार कन्या मनीषा, निलिमा, आणि सुनिता, प्रिती यांच्या सह पंकजची जबाबदारी सांभाळून त्यांनी रामदासभाऊना राजकीय व सामाजिक उपक्रमात सहर्ष मदत केली. त्यांची सो. शोभाताई जाणीव होती. तथापी, 2006 च्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी केवळ रामदासजींच्या आग्रहास्तव पुन्हा उमदेवारी दाखल केली.
संयोगाने 14 वर्षाच्या वनवासानंतर देवळी नगर परिषदेचा अध्यक्षपदी पुन्हा तडस परिवाराची सुनबाई विराजमान झाली. त्यापुर्वी 15 वर्ष नगराध्यक्ष, 12 वर्ष आमदारकी भोगलेल्या रामदासजींचे मार्गदर्शन लाभत आहे. ना. नितीनजी गडकरी यांचा आशीर्वाद व मित्र, इनामदार, खासदारांच्या सहकार्याने सौ. शौभाताई देवळीचा संपुर्ण विकास करतील अशी, रामदास तडस यांना अपेक्षा आहे. आज भाऊ 62 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पुत्रास आशीर्वाद देण्यासाठी पिता व माता नाहीत पण वडीलधार्यांची पुण्याई, मित्रांचे प्रेम, जावयांचा स्नेह व चाहत्यांचे स्नेह कायम आहे.
त्यांना ईश्वर सुख-समृध्दी आणि निरामय आयुष्य प्रदान करो ही कामना !
मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस
अनुसूचित जातीजमाती भाजपा