दिलीप दत्तात्रय शिंदे यांचा जीवनप्रवास (श्री संताजी प्रतिष्ठान सचिव)

माझा जीवप्रवास
प्रथम सर्व समाजबांधवांना सप्रेम नमस्कार,

           मी दिलीप दत्तात्रय शिंदे, मूळ नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव निवासी. माझे आजोबा उद्धव रामा शिंदे, वडील श्री. दत्तात्रय उद्धव शिंदे, चुलते मोहन उद्धव शिंदे. आम्ही ९ भावंडे (४ भाऊ, ५ बहिणी). माझा जन्म ४ ऑगस्ट १९६२ रोजी पेडगाव येथे झाला. माझे शिक्षण पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथे झाले. 

       पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.

      गाय-बैल वगैरे सुमारे ५०-६० च्या संख्येने होती. कालांतराने आमच्या आजोबांचे बंधू आणि आजोबा विभक्त झाले. आमच्या चुलत आजोबांना एकच मुलगा भानुदास माधव शिंदे. आजोबांच्या निधनानंतर १९५४ मध्ये चुलत चुलते आणि आमचे वडील, चुलते यांच्यात जमिनींचे वाटप झाले. त्यात आमच्या वाट्याला साधारण ३०० एकर शेती  आली. शेतामध्ये सतत ४-५० मजुरांचा राबता असायचा. त्यावेळी सालकरी पद्धत असल्याने २ गडी वर्षाच्या कराराने आमच्याकडे काम करत असत. ते वर्षतून एकदाच त्यांच्या घरी जात असत. त्याकाळी आमचच्याडे तेलाचा घाणा चालायचा. त्यावेळी फक्त करडईच्या तेलाचेच उत्पादन घेतले जायचे. आमच्या पावसावर अवलंबून असलेल्या ४० एकर शेतीमध्ये फक्त करडईचे पीक घेतले जायचे. त्यावर तेलाचा घाणा चालायचा. तसेच गावातील काही शेतकरी आपल्या शेतातील करडई आमच्याकडे आणून त्याचे मजुरीने तेल काढून घेऊन जात असत. तसेच आमचे किराणा मालाचे दुकान होते. आमच्या गावात शुक्रवार म्हणजे बाजाराचा दिवस. हा दिवस म्हणजे शेतमजुरांचा पगाराचा दिवस. दर शुक्रवारी सकाळी शेतमजुरांचे पगारवाटपाचे काम चालायचे. पुन्हा शनिवारपासून नित्यनेमाने शेतीची कामे चालायची. 
कालांतराने निसर्ग बदलला. पावासाचे प्रमाण कमी झाले. शेती पिकण्याचे प्रमाण हळुहळू कमी होऊ लागले. १९७४ मध्ये गावावर दुष्काळाचे सावट आले. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे ते उदरनिर्वाहासाठी गावे सोडून परगावी निघून जायला लागले. अशावेळी शेतीची कामे करण्यासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला. दुष्काळामुळे जनावरांना चाराही मिळेनासा झाला. जनावरे कवडीमोल किमतीते विकावी लागली. अशावेळी आम्ही भावंडानंी शेती करायला सुरवात केली. सन १९७४ ते १९७८ पर्यंत मी आणि माझे ज्येठ बंधू अशोक शिंदे स्वत: शेती करायला लागलो. आम्ही ९ भावंडे आणि आई-वडील असे ११ जणांचे कुटुुंब होते. ५ वर्षे शेती करून किराणा दुकान चालविले. पण दुष्काळी परिस्थितीत काही सुधारणा होईना. १९७८ मध्ये पुन्हा तीव्र दुष्काळ पडला. पाऊस कमी होत असल्याने शेतीही पिकत नव्हती. किराणा दुकान होते; परंतु लोकांकडे पैसाच उपलब्ध नव्हता, त्यामुळे तो व्यवसायही अडचणीत आला. अशावेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले होत. भावंडांचे आमचे शिक्षण अपूर्ण राहिले. गावातील काही लोक परगावी जाऊन छोटे-मोठे व्यवसाय, मजुरी करून उदरनिर्वाह करू लागले. आमचे घराणे सावकार असल्याने आम्हाला कोणाकडे मजूर म्हणून काम करणे म्हणजे अस्मितेला धक्का पोहोचत होता. 

               या सर्व गोष्टींचा विचार करून पुण्यात येण्याचा निश्चिय केला. माझे आजोळ पुणे असल्याने आईने आम्हाला पुण्याला घेऊन येण्याचे ठरविले. ज्यावेळी पावसमान सुधारेल, त्यावेळी आपण पुन्हा आपली शेती पिकवूया, असा विचार करून १९७९ मध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही पेडगाव सोडून पुणे येथे स्थायिक होण्याचे ठरविले. आमच्या भागात दिवसातून फक्त सकाळी एकच एसटी बस येत असे. त्यावेळी आम्ही पेडगाव दौंड हे २३ किलोमीटर अंतर पायी येऊन तेथून रेल्वे पकडून पुणे गाठले. पुण्यात आमचे आजोळ, आत्या असल्याकारणाने यांचे सहकार्य मिळेल या आशेने आम्ळी गाव सोडून पुण्यात आलो. पण पुध्यात नवीन असल्याने आणि कोणत्याही कामाचा अनुभव नसल्याने थोडीशी अडचण जाणवू लागली. 

मग आमच्या गावातील ब्राह्मण कुटुंबातील काशिनाथ जाखडे हा  मुलगा भेटला. त्याने आम्हाला पुण्यात घर भाड्याने घेण्यास मदत केली. कर्वेनगर येथे रूम रिकामी झाल्याचे त्याला माहीत होते. तेथे तो घेऊन आला. घरमालकाशी चर्चा करून ती रूम ५० रुपये डिपॉझिट देऊन दरमहा ४५ रुपये भाड्याने घेतली. त्यानंतर काम शोधणे सुरू झाले. मोठे बंधू गोळ्या-बिस्किटांच्या कारखान्यात कामाला जायला लागले. मला काही दिवसांनंतर आमच्या घरमालकाच्या बहिणीने त्यांच्या ओळखीच्या पुण्यातील सदाशिव पेठेतील संजीव मुद्रणालय या प्रिंटिंग पे्रसमध्ये नेले. तेथे पुस्तके, कादंबरी छपाईचे काम चालत होते. तेथे माझी ओळख करून दिली व मला शिकाऊ म्हणून त्या प्रेसमध्ये काम लावले. परंतु त्या मालकाने सांगितले की, जर काम शिकला तर पगार मिळेल. ज्या दिवशी काम येईल त्या दिवसापासून पगार मिळेल. एक महिना तरी काम शिकायला लागेल असे मला त्यांनी सांगितले. मी म्हटले ठीक आहे. मी बिनपगारी १५ दिवसांत वंâपोझिंगचे (अक्षरांचे खिळे जुळविण्याचे) काम शिकलो. कमी कालावधीत काम शिकल्यामुळे मालकाने पगार सुरू केला. पण कामाचा प्रकार पीस रेटवर होता. पहिल्या महिन्यात मी ७४ रुपयांचे काम केले. पण पुण्यात येऊन पैसे कमवायला लागल्याचे ते एक वेगळेच समाधान होत. त्यावेळी असे वाटले, चला किमान घरभाडे तरी आपण या महिन्यात कमावले. असे करत पुढे पुढे कामात प्रगती होत गेली. ज्ञानात भर पडत गेली. मग १ वर्षभर तेथे काम करून बाहेर जास्त पगाराची नोकरी पकडली. १९८३ मध्ये लग्न झाले. बुकवर्वâच्या कामामध्ये खूप कष्ट होते म्हणून कमर्शिअल प्रेसमध्ये काम धरले. तेथे १९८६ पर्यंत काम करून प्रेसमधील सर्व कामाचा अनभव घेतला. त्यानंतर पुन्हा एका प्रेस १९८९ पर्यंत काम करून अनुभवात भर पडली. मग निश्चिय केला, आपण स्वत:चा प्रिंटिंग प्रेस उभा करायचा. फिरून माहिती घेतली, कोथरूडमध्ये एकाचा पूर्ण चालू स्थितीतल प्रेस विकायला आहे. तो प्रेस पाहून आलो. गावाकडील थोडी शेती विकली आणि तो प्रेस ३७०००/- विकत घेतला आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. भांडवलासाठी पैसा कमी पडू लागला, मग बँकेचे कर्ज काढून व्यवसाय वाढविला. आणि पुण्यात बस्तान मांडले. त्याच्या जोडीला अधिक उत्पन्न मिळावे म्हणून सन २००० मध्ये दै. सामना येथे मुद्रितशाधेक म्हणून नोकरी करायला लागलो. गावाकडील शेती मात्र पडीक पडली. पडीक पडू नये म्हणून एकाला कसण्यासाठी दिली. पण त्याने शेतातील उत्पन्न कधी आमच्या वाटाला येऊ दिले नाही. थोड्या दिवसांनी गावातील काही लोकांनी तलाठ्याला हाताशी धरून शेतात घुसखोरी करून सातबारा उताNयावर पीकपाणी नोंद करून घेतली. त्यासाठी कर्जत कोर्टात दावा सुरू झाला. मग उरलेली शेती मिळेत भावात विवूâन टाकली. तरीही अजून ४५ एकर शिल्लक आहे. ती वादात आहे. तिकडे दुर्लक्ष झाले. मग इकडे व्यवसायातच लक्ष देऊन चांगल्याप्रकारे व्यवसाय सुरू ठेवला. आता मुलगा हाताशी आल्यामुळे व्यवसाय तोच सांभाळत आहे. ३ वर्षांनी नोकरीतून निवृत्त होत आहे. 

      तसेच समाजकार्याची आवड असल्याने कोथरूड येथील श्री संताजी प्रतिष्ठानचा सचिव म्हणून कार्य करीत आहे. या संस्थेची स्थापना १९९३ मध्ये माझ्या प्रेसच्या पत्त्यावर केली आहे. तशी जीवनगाथा सांगावयाची झाल्यास खूप आहे. थोडक्यात माझा परिचय करून दिला आहे. सध्या वारजे येथेवास्तव्यास असून तेथेच प्रिंटिंग पे्रस चाल आहे.
धन्यवाद! जय संताजी!

- दिलीप दत्तात्रय शिंदे

दिनांक 31-05-2016 18:25:05
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in