कृतार्थ कै. नारायण तुकाराम देवकर यांच्या आत्मचरित्राचा काही भाग
12 मार्च 1938 माझा जन्मदिवस. सहासष्ट वर्षांच्या कालप्रवाहांत अनेक सुहृद भेटले, देवासारखी माणसं भेटली, तर काही दानवासारखी देखील. तरी देखील माझ्यातला नारायण अविचल राहिला, सार्या झंझावाताला तोंड देत माग्रक्रमण करीतच राहिला.
भूतकाळातल्या आठवणींचा हा प्रवास, मला घेऊन जातो तो नगर शहराच्या पूर्वेस वसलेल्या बुर्हानगरला. जगदंबामातेचं देवस्थान. तुकाराम भुजंगा देवकर माझे वडिल. आमचं सारं घराणंच भगताचं. भगताचं म्हणजे देवीमातेच्या पुजार्याचं. पण पूजेवर मिळणार्या उत्पन्नातून घर चालविताना वडिलांची ओढाताण व्हायची. मिळणारं उत्पन्न आणि खाणारी तोंडं याचं गणित काही बसत नव्हतं. घरामध्ये दारिद्रयाचा सुखेनैव वावर चालू होता. पोटच्या पोरांसाठी काही तरी करणं भाग होतं. देवीमातेची मनोभावे सेवा करणारे आमचे वडील मग असहाय्यपणे काम करू लागले., तेल्याच्या घाण्यावर. भिंगारच्या मुरलीधर ढवळे यांच्या तेल घाण्यावर रात्रंदिवस कष्ट करणार्या पिताजींनी, बुर्हानगरचा जड अंत:करणाने निरोप घेऊन प्रवेश केला, तो नगर शहरात.
नगरला आल्यावर वडिलांनी रात्रंदिवस चाकरी केली, ती काशीनाथबुवा कारभारी यांच्याकडे. दरम्यान माझा जन्म झाला. 12 मार्च 1938. कारभारींनीच माझं नावं नारायण ठेवलं. आयुष्यभर कष्ट करून चरितार्थ चालविणार्या माझ्या वडिलांना, आपल्यावरच्या जबाबदार्यांचा मात्र कधीही विसर पडला नाही. योग्य अशी स्थळं पाहुन, वडिलांनी त्यांच्या तीनही बहिणींचे विवाह लावून दिले. सर्वात थोरल्या बहिणीचा विवाह, श्री. शंकरराव साळुंके यांच्याशी, मधल्या बहिणीचा विवाह, श्री. विठ्ठलराव डोळसे यांच्याशी, तर सर्वात धाकट्या बहिणीचा विवाह, वांबोरीच्या श्री. मारूती साळुंके यांच्याशी करून देऊन वडिलांनी कन्यादानाचं पुण्य पदरी घेतलं.
1944 साल होतं ते. दारिद्रय पांचवीलाच पूजलेलं असावं, अशा तर्हेने गरिबी घरात ठाणं मांडून बसलेली होती. जीथं खाण्याचीच भ्रांत होती. तिथं शाळा शिकण्यासाठी फी कुठून आणनार ? म्हणूनच वडलांनी मला दाखल केले, ते सर्जेपुरा भागात असलेल्या नगरपालिकेच्या 12 नंबर शाळेमध्ये पहिलीपासुन ते इयत्ता पाचवी पर्यंत मी त्या शाळेत शिकलो.
मोठ्या बहिणी बईबाई, गंगूबाई, सुभद्रा, मी स्वत: आणि अंबादास व हरिश्चंद्र हे माझे भाऊ. 7/8 माणसांच कुटूंब. पण खाणारी तोंड आणि उत्पन्न यांचं अजूनही गणित बसलं नव्हतं. वडिलांची ओढाताण चाललेली दिसत होती. पण वडिलांना मदत करावी एव्हढं देखील वय झालेलं नव्हतं.
दुष्काळानं हळुळळु आपले पाश बळकट केले. उन्हाने काहिली होत होती, पाण्याचा टिपूस नजरेला पडत नव्हता आणि पोटाकरता दाणा. जीथं खायची मारामार, तिथे तेलाचा घाणा कसा फिरणार ? तो ही दुष्काळापुढे हरला, ठप्प झाला. पुन्हा चाकरी नशिबी आली. तळ्याच्या कामावर जाण्याचं दुर्भाग्य सार्यांच्याच नशिबी आलं. घरातील होती - नव्हती ती सारी भांडी सावकाराची झाली, आणि त्यापोटी पदरात पडले, ते फक्त 5-10 रपये. 5 आणे रोजात रणरणत्या उन्हांत, आईवडिलांच्या नशिबी आले ते अपरमित कष्ट. वाळूंजच्या वास्तव्यांत दशावतार पहाण्याचं दुर्भांग्य, आई- वडिलांच्या आणिा आम्हा सर्वांच्याच नशिबी आलं. म्हणूनच मी आणि सुभद्रानं, माझ्या बहिणीनं, डोक्यावर रेवडी आणि गुडीशवेची पाटी घेतली. आणि रणरणत्या उन्हात, दगडमातीतुन आम्ही दोघं बहिण भाऊ, गावोगावी फिरू लागलो आम्ही मिळविलेल्या तुटपूंज्या पैशाचाही वडिलांच्या संसाराला तेव्हढाच आधार होऊं लागला. कधी भाकरीबरोबर मीठ आणि कांदा, तर कधी नुसतीच पाण्याबरोबर भाकरी गिळुन, आम्ही सर्वांनी दिवस काढले. विलक्षण दु:ख आणि असहायता यांचा तो दाहक अनुभव होता. कुणाच्याही नशीबी येऊं नये असा नैराश्यानं घेरलेला.
फक्त कष्ट आणि ते तुला केलच पाहिजेत. ते केले तरच तु जगशील, आणि इतरांनाही जगवशील. आणि दुसर्या दिवशी सकाळीच, देवकरांचा नारायण, गुलाबराव राठौड यांच्या उपहारगृहामध्ये दिवसाकाठी 12 आणे मिळवूं लागला. पण दिवसभराचे कष्ट आणि मिळणारा रोजगार, याचं काही गणित जमेना.
मात्र परिश्रमाच्या या प्रवासात, मला आत्मविश्वासाची शिदोरी लाभली. त्या बळावरच मी एक हातगाडी भाड्याने घेतली आणि शेंगाविक्रीचा व्यवसाय सुरू केला. सकाळी त्याच हातगाडीवर मठाची उसळ, हुलग्याची उसळ, वाटाणे विकावयाचे आणि दुपारी शेंगाविक्री. दिवसभराच्या कष्टाला पैशाची पावती मिळाली. पण हा पैसा मजा हाजा करण्यात घालवावा असं मनाला कधीही वाटलं नाही. मात्र हे सारं करीत असताना आई-वडीलांची भावा- बहिणींची सतत आठवण यायची. आणि त्या आठवणींनी डोळे भरून यायचे आतां प्रकर्षानं त्यांना नगरला घेऊन यावंसं वाटु लागले.
किसन डोळसे, माझ्या आत्याचा मुलगा, माझा आत्तेभाऊ, आत्तेभावापेक्षाही आमचं नातं. मित्र म्हणुन अधिक जवळचं होतं. माझ्यासारखीच त्याचीही शेंगाविक्रीची हातगडी होती. मात्र मिळणारं उत्पन्न काही फार मोठं नव्हतं. म्हणुनच यातून काहीतरी वेगळं करावं. या भावनेनं आम्ही अगदी झपाटून गेलो होतो. खुप चर्चा केल्या, मात्र त्यातून मार्ग काढतां येत नव्हता. विचारांती ठरलं. नगरचा निरोप घ्यायचा. पुण्याला जाऊन, मिळेल तो व्यवसाय करायचा. नाहीच शक्य झालं, तर पडेल ती कामं करायची आणि एक दिवस... एक दिवस कुणालाही न सांगता, मी आणि किसन डोळसे पुण्याला रवाना झालो.
खिशात होते ते फक्त 50/55 रूपये. पण त्याहीपेक्षा सोबत होती, ती जिद्द आणि पडतील ते कष्ट कण्याची तयारी. आत्मविश्वासाची ही शिदोरी बरोबर घेऊनच, आम्ही पुण्यनगरींत प्रवेश केला. पुण्यात कोणही नव्हतं आमचं, ना कुणी नातेवाईक, ना मित्र ना जगावं कसं हे शिकवणारे आई वडिल. हे शिकवणारे आई वडिल नव्हते. पण स्वत:ची उन्नती करावयाची, या एकाच भावनेनं आम्ही झपाटुन गेलो होता. चार पांच दिवस बोरविक्रीचा व्यवसाय केला. दिवसभराच्या श्रमानं थकून-भागून कधी वळचणीला तर कधी दुकानासमोरच्या फळ्यांवर झोपलो. दिवसभराचा वेळ कामात जायचा, रात्र झाली की घरातल्या सगळ्यांची तीव्रतेने आठवण यायची. आमच्या काळजीनं ग्रासलेले आई वडीलांचे चेहर समोर दिसायचे. मन गलबलुन यायचं.
एक दिवस जेवण करून मी आणि किसन शनिवारवाड्या जवळ बसलो होतो. घरातल्या सर्वांची आठवण आमच्या बोलण्यातुन वारंवार येत होती. घरी पत्र टाकुन आपण पुण्यात आहोत हे कळविलं पाहिजे, या मतापर्यंत आम्ही आलो होतो. बोलण्याच्या नादांत आपल्या गप्पा कोणी ऐकतंय हे समजण्याचं ज्ञान आणि सम्यक भान आम्हा दोघांजवळही नव्हतं. पण आमच्या सुदैवाने आमच्या गप्पा एका दयाळु माणसानं ऐकल्या होत्या. त्या देवमाणसानं आम्हा दोघांची आस्थेवाईकपणे चौकश केली. आमची अडचण जाणुन घेतली. बोबडे हालवाई हे त्या दयाळू माणसाचं नाव होतं. आणि मिठाई इतकांच त्यांच्या स्वभावांत होता गोडवा. विविध यात्रांमध्ये मिठाई विक्री करणार्या माणसानं 30 रूपये महिना पगारावर आम्हा दोघांना कामावर ठेवलं. कोंढणपूर, केंजळ, वाघोली, कोरेगांव अशा यात्रा करतांना, मालकांशी आमचं मुलासारखं नातं जडलं. आमच्या दोघांचा साठलेला पगार दिला व अतिशय प्रेमानं मला व किसनला नगरला पाठविलं. बोबउे हलवायांच्या रूपानं, जगातल्या चांगुलपणाचं आण माणुसकीचं दर्शन झालं. आम्ही पुन्हा आमच्या घरकुलात परत आलो. वडिलांच्या प्रेमाचा हात पाठीवरून फिरला, आईच्या कुशीत मायेची उब लाभली, भ्रमंती संपली होती.
वडीलांचा आग्रह 1 एप्रिल 1960 राहुरीच्या काशीनाथ लोखंडे यांच्या सुकन्येनं वत्सलाबाईंनं, देवकरांच उंबरठ्यावरलं भरलं माप ओलांडून माझ्या जीवनात प्रवेश केला. माझी पत्नी म्हणून म्हणत नाही, पण काटकसरींन संसार करताना जे आहे त्यात अतिशय समाधानी राहुन सौ. वत्सलाबाईनं, सार्या घराची अतिथ्यशीलता सांभाळली, सार्यांची मनं राखली, दुखणी - खुपणी काढली. पण केल्या कामाचं श्रेंय तीनं कधी स्वत:कडे घेतलं नाही. सौ. वत्सलाबाईच्या रूपाने, पुढील प्रवासत लक्ष्मी प्राप्त झाली. वैभव प्राप्त झालं.
लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात, शहराच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या. तोरडमल यांच्या इमारतीमध्ये अम्हाला भाड्याने जागा मिळाली. तोरडमल म्हणजे रईस, खानदानी मंडळी, आणि मधुकर तोरडमल म्हणजे तर व्यावसायिक चित्रपट, आणि रंगीूमीवरील समर्थ कलावंत. तिथे एक छोटा व्यवसाय सुरू करून चितळे रोडवर मी एक टपरीही विकत घेतली त्याची किंमत होती 150 रूपये आणि भाडं होते दररोज चार आणे. तोरडमल बिल्डींगमधील जागेत आम्ही जुजबी दुरूस्ती करून रहाण्यास सुरवात केलीच शिवाय त्या जागेत शेंगदाणे व फटाण्याचेही दुकान सुरू केले.
पुन्हां एकदा दुर्दैव आडवं आलं. अतिक्रमणामध्ये आडवं येतं, म्हणून चितळे रोडवरील दुकान नगरपरिषदेनं पाडलं. तेथील व्यवसाय बंद झाला. पण हाताश होणं, हतबल होणं माझ्या स्वभावात नव्हतं. दुसर्याच दिवशी मी, छाया चित्रपटगहाच्या ओट्यावर व्यवसय करावयास सुरूवात केली. अल्पाधवीतच या व्यवसायाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. व्यवसाय नावारूपाला आला.
व्यावसायिक जागेसाठी परत एकदां शोधयात्रा सुरू झाली. मात्र अतां चणे-फुुटाणे हा पूर्वापाार चालत आलेला व्यवसाय न करतां हॉटेल व्यवसायाचा आरंभ करावा. या बाबत सार्वांचं एकमत झालं.
हॉटेल व्यवसाय करायच ठरला खरा, पण त्यासाठी भांडवल आणायच कुइून ? इथं मात्र मित्रमंडळींबरोबरच समर्थपणे मगे उभी राहिली ती नगरची अर्बन बँक. कर्जापोटी मला 4000/- रपयांची रक्कम दिली, आणि 15 ऑगस्टला तेरडमलांच्या राहात्य जागेत, शुभारंभ झाला.
मिळालेल्या प्रत्येक पै न पै चा विनयोग योग्य कामासाठीच करायचा, याची आई- वडिलांकडूनच दीक्षा घेऊन, पुढील आयुष्यप्रवासात, हा संकेत मी कटाकक्षाने पाळला. म्हणूनच पै-पै साठवून, त्या रकमेतुन बुरूडगाव रोडवर 1968 साली, 75 पैसे भावाने एक प्लॉट घेतला. व्यवसाय आणि त्याबरोबरच कष्ट चालू होते. नालेगावमध्ये एक पडीक जगा विक्रीस आहे असं कळालं. मनानं ठरविलं, की या जागेतच जुजबी दुरूस्ती कून रहाण्यास जाऊ.
1965 साली लक्ष्मणचा - माझ्या सर्वांत थोरल्या मुलाचा जन्म झाला. सारं घर कसं आनंदाने भरून गेलं. फटाक्याच्या आवाात या जन्मसोहळ्याचा आनंद साजरा केला गेला. खरं सांगू ? कदाचित या आनंदामधूनच, फटाकड्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेड रोवली गेली असावी. किसनराव तोडकर.. माझे मित्र आम्ही दोघांनी मिळुन भागीदारीमध्ये फटाकडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने आम्ही स्वतंत्रपणे या व्यवसायाकडे वळाले. कुठलीही कटुता न बाळगता, गैरसमज न ठेवंता, आम्ही फटाकडे विक्रीचे व्यवसाय सुरू केले.
1975 साली देवकर परिवाराच्या व्यावसायिक विश्वांत, एका नव्या उद्योगाची भर पडली. शुद्ध चिक्की आणि पांढर्या तिळाच्या आमच्या रेवडीनं बाजारपेठेत अनेकांची मने जिंकली नारायण देवकराची रेवडी घरोघरी पोहचली. फटाकड्याच्या व्यवसायानं हात दिला तर रेवडीच्या व्यवसायानं उदंड यश दिलं.
1975 साल होतं ते. गणेशोत्सवाचे दिवस, उत्साहाचे, आनंदाचे जल्लोषाचे. पेणच्या प्रसिद् अश गणेशमूर्ती आणुन, शनिवार वाड्याजवळ मी विक्रीस बसलो. शनिवार वाड्याचं, पुण्याचं, आणि माझं, कां, कोण जाणे ? अतूट नातं., हे मात्र खरं,. श्री गणरायाच्या कृपाशिर्वादांनं मला कल्पनेच्या बाहेर यश लाभलं. माझे परिश्रम, माझी धडपड पाहुन आयुष्यप्रवासांत देवासारखं भेटलेल्या माझ्या मित्रानी, श्री. हिरालाल मुदीगंटी यांनी त्याच्या कारखान्यात तयार झालेल्या गणेशमुर्ती मला पुण्याला विकावयास दिल्या. एका रसवंती गृहाची जागा भाड्याने घेऊन, तिथे मी गणेशमुर्ती विकत असे. सुबकता रंगसंगती आणि मूर्तीचं देखणपणा पाहून, पुणेकरांनी नगरच्या गणेशमूर्तींना प्रचंड प्रतिसाद दिला. इतका की शनिवार वाड्याजवळ असलेल्या श्री. फडतरे यांनी त्यांची जागा. पुढील प्रत्येक वर्षी मला भाड्याने दिली.
मी, आयुष्यामध्ये नोकरी केली, चाकरी देखील केली. मिळालेल्या अनुभवानं, सभोवतालची माणसं वाचता यायला लागली. परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आणि कष्टाशिवाय प्रतिष्ठा नाही, ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवली. मोठ्या चिरंजीवांना, प्रा. मधुकर तोरडमल, यांच्या सुभाष चौकात असलेल्या वास्तूत बर्फ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला. अविश्रांत कष्ट करून, त्याने तो वाढविला, नावारूपाला आणला. एम.आय.डी.सी. मधुन बर्फ आणण्यासाठी त्यांने एक जुना टेम्पो विकत घेतला. हप्त्या हप्त्यांने त्याने टेम्पोच्या मालकाचे पैसे परत केले. कुणाची कपर्दिकही आम्ही कुणी कधी बुडविली नाही. प्रामाणिकपणाचं हे व्रत पुर्ण आयुष्यभर आम्हा सर्वांच्य उपयोगी पडलं. चि. लक्ष्मणने बर्फ विक्रीबरोबरच एका प्रसिद्ध व्यावसायिक दालनामध्ये काम केलं. त्यांचे फर्निचर, कपाट, फ्रीज, टी.व्ही. यांच स्वत:च्या टेम्पोमधुन तो अतिशय सुरक्षित वहातूक करीत असे. एव्हढंच नवहे तर वेळप्रसंगी त्यानं विटा वाहिल्या, वाळूची वहातूक केली, पण केल्या कामाची त्यानं कधीही लाज बाळगली नाही की त्यांत कधी कमीपणा मानला नाही.एक दिवस माझे परमस्नेही, हिरलाल मुदीगंटी घरी आले. समोरच लक्ष्मण, माझा थोरला मुलगा बसला होता. गप्पांच्या ओघात अनेक विषयांवर चर्चा झाली. लक्ष्मणला व्हिडीओ हॉल सुरू करण्याचा त्यांनी सल्ला दिला. कष्टाची मुळात सवय असलेल्या माझ्या मुलानं, याही व्यवसायात उदंड यश प्राप्त केले.
हाताशपणें बसून राहणं म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. परमेश्वरानं संकटसमयी धावुन यावं तसे नगरच्या व्यावसायिक विश्वातले यशस्वी व्यावसायिक, मणीधरजी, आमच्याकडे आले. आणि त्यांच्या कॉटस व रॅक्स दुकानांत विक्रीस ठेवा, असं म्हणाले. शिवाय माल विकल्यानंतर पैसे द्या. असंही म्हणाले, पण माझ्या मनाची तयारी होत नव्हती, पण त्यांचं मनही मोडवत नव्हतं पैसे मला मिळाल्यानंतर द्या, असे म्हणाले, पण शिवाय पुण्याचे एक व्यावासियक मित्र मध्यस्थी होते. या दोघांच्या आग्रहामुंळे, किंवा प्रेमामुळे म्हणा हवं. तर देवकर फर्निचर अस्तित्वांत उदंड यश मिळवितांना लक्ष्मण आणि मच्छिंद्र यांनी आपली कुशल व्यावसायिकता सिद्ध केली.
साल होतं 1993 बुर्हाणनगर, आमचं मुळ गाव. अंबिका माता आमचं दैवत ! सुख दु:खाचे अनेक क्षण आले आणि गेल, मात्र तीच्या आशीर्वादानं आयुष्याची वाटचाल सुकर झाली. आलेली संकटं टळली. तीच्या कृपेचा वरदहस्त, सदैव आम्हां कुटूंबियांवर राहिला. अशा वरदायिनी मातेची मूर्ती घरांत असावी, तीच्या दर्शनानं रोजचा दिवस उगवावा, आणि तीच्याच दर्शनानं रात्र व्हावी असं सातत्यानं माला वाटायचं. मुलांजवळ मी हा विषय काढला. माझीच मुलं ती, सर्वांनी एकमुखान होकार दिला, आणि.. जयपूरहून प्रवास करून, माँ अम्बिकेची सुुंदर, प्रसन्न मूर्ती, देवकरांच्या वास्तुत विधीवत स्थापना झाली.
लक्ष्मण, मच्छिन्द्र, सोमनाथ, शिवा - चारही मुलं आपापल्या व्यवसायात मग्न आहेत. शिंपी गल्लीमधील तीळ रेवडी आणि गाठीच्या मूळ व्यवसायांत मी मग्न आहे. नवीपेठेच्या मध्यवर्ती भागात अद्यायावत आणि कलात्मक फर्निचर्सच्या दालनाचा शुभारंभ केला आहे. मुलांकडून कधीही, काहीही गैर घडणार नाही याची मला मनोमन विश्वास आहे, आणि खात्रीदेखील.
कर्तृत्वसंपन्न मुलं आहेत. विनयशील अशा सुना आहेत. कल्याणी, विशाल, अमृत आणि कोमल, सिद्धांत, ओम सारखी गोड नातवंडं आहेत. आयुष्यभर निरांजनासारखं तेवत राहून, तीनं माझ्या जीवनप्रवासात मला सावलीसारखी साथ दिली, अशी सौ. वत्सलासारखी सहधर्मचारिणी आहे. जीवनप्रवासात लाभणारा हाच खरा सत्विक आनंद आहे.