नव्हती ते संत करिता । संताचे
प्रस्तुत अंभगामध्ये तुकाराम महाराज खर्या संतांची लक्षणे प्रतिदान करतात. त्यात प्रथमच संतांचे आपतांचाही उल्लेख करतात. संतांचे आप्त संत असतीलच असे नाही. जोपर्यंत देहाचा निरास होत नाही किंवा देहमिथ्यत्वाचा निश्चय होत नाही, तोपर्यंत ते सर्व संसारी जिवच आहेत. भले ते कोणत्याही वेषाचे, आडनावाचे वा संप्रदायाचे इ. असोत. असे खरे संत भेटणे हे अतीशय दूर्लभ गोष्ट आहे.
बहु आवघड आहे संतभेटी । परी जगजेठी करूणा केली ॥
देवाची कृपा होते व त्यामुळेच संतांची भेट होते. ही संतांची भेट मात्र आत्मत्वाने होत असते. त्यामुळे व्यावहारीक भेटीपेक्षा आत्मत्वाने होणारी संत भेट परमार्थात महत्वाची आहे. अशाच पद्धतीने शिर्डी हे ज्यांचे पारमार्थीक कार्यक्षेत्र होते अशा व खरा परमार्थीक संबंध आला. नात्याने लक्ष्मण महाराजांचा (बाबा) मी भाचेजावयाचा मुलगा ! पंरतु बाबांनी ह्याव्यवाहारीक व प्राकृत नात्याला कधीही किंमत दिली नाही. त्यांच्याकडे किंमत ही केवळ पारमार्थीक योग्यतेलाच होती.
लक्ष्मण महाराज हे तसे मुळचे रहीवासी नागडे गांव ता. येवला येथील होते. परंतु पुढे व्यवसायाचे निमित्ताने शिर्डीला स्थाईक झाले. त्याकाळी मोठे होलसेल किराणा दुकान होते. परंतु त्यांच्या व आमच्या अशा दोन्हीही कुटुंबामध्ये मागील काही पिढ्यांपासुन भगवद्भक्तीचा वारसा चालत आलेला आहे. माझे आजोबा ह.भ.प.श्री.चंद्रभानजी लुटे हे आळंदीला जोग महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी होते. त्यांनीच लक्ष्मण महाराजांना आळंदीला जाण्याची प्रेरणा दिली व आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी ठेवले. आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासुनच बेटावरील सर्व महात्मांशी सतत संपर्क राहीला. लक्ष्मण महाराज ज्या वेळी प्रथमच आळंदीला वारकरी शिक्षणासाठी गेले. त्यावेळी त्यांचे लग्न झालेले होते. परंतु तेथील प्रमुखांची भेट होण्यापुर्वी एका लंगड्या विद्यार्थ्यांने सल्ला दिला की लग्न झालेले नाही असे सांग. त्याप्रमाणे ज्ञानाची ओढ असल्याने लक्ष्मण महाराजांनी तेथील त्यावेळचे प्रमुख ह. भ. प. गुरूवर्य श्री. मारूती बुवा गुरव यांना लग्न झाले नसल्याचे खोटेच सागीतले व संस्थेत प्रवेश मिळविला. त्याच वेळी तिथे सुप्रसिद्ध साधु गु.ह.भ.प. बन्सीबुवा तांबे (नेवासा) हे ही होते. मारूती बुवा गुरव यांचे वर लक्ष्मण महाराजांची विशेष श्रद्धा होती. त्यांनाच ते अखेर पर्यंत गुरूस्थानी मानत होते. संस्थेमध्ये त्यावेळी गु.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांचे वरचेवर येणे असे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची चाचणी मामासाहेब घेत असत. मामासाहेबांचे कडकडीत वैराग्य, गुरूभक्ती, सांप्रदायीक निष्ठा, निष्कामता व अगाधज्ञान याचा लक्ष्मण महाराजांवर फार मोठा पडगा होता. शिवाय भजन व गुरू निष्ठा गु.ह.भ.प. श्री. बंकट स्वामी महाराज यांचे कडुन प्राप्त झाली. लक्ष्मण महाराजांनी आयुष्यात ज्ञानोबाराय, तुकाराम महाराजा नंतर पुढेे फक्त आयुष्यभर या दोन महात्मांचाच सतत जयजयकार केला. अभंगाचे निरूपण करतांना लक्ष्मण महाराज ज्यावेळी संताबद्दल बोलत, त्यावेळी त्यांच्या वाणीला असा काही बहर येई की एैकत रहावे. मामासाहेबांचे वैराग्य, सद्गुरूनिष्ठा, निष्कामता, सडेतोडपणा व विषय विन्मुखता याचे महाराज अतीशय सुक्षम व भावपुर्ण वर्णन करीत असत.
गु. लक्ष्मण महाराजांचा स्वभाव अतीशय कडक व शिस्त प्रिय असे. बेशिस्त वागणे त्यांना बिलकुल आवडत नसे. महाराज आळंदीवरून शिर्डीला आल्यानंतर आपले स्वत:चे किराणा दुकान पारमार्थीक साधना करता चालवत असत. ज्ञानेश्वरीवर त्यांचे विशेष प्रेम असे. ते ज्ञानाचे भोक्ते होते. पुढे त्यांना किराणा दुकाण हे उपाधी वाटु लागली व एका रात्रीत किराणा दुकान बंद करून टाकले. येणार्या उधारीचीही त्यांनी पर्वा केली नाही. दुर्देवाने एकच लहान मुलगा होता. तो ही आजारपणांत वारला. आईसाहेब अधीक भावुक बनल्या. परंतु त्यांनाही महाराजांनी धीर दिला. महाराजांच्या कडक व शिष्तप्रिय स्वभावामुळे सामान्य लोक महाराजाच्यां जास्त जवळ जात नसत.तरीही शिर्डीमधील व परिसरातील वैदु समाजाचे लोक मात्र महाराजांकडे नेहमी येत. त्यात प्रमुखाने ह.भ.प. शकंर महाराज, ह.भ.प. श्री. गोपाळ महाराज गुडे व ह.भ.प. रामभाऊ शिंदे (गायक) हे होते त्यांची जिज्ञासा व भक्ती पाहुन महाराजांची वारकरी संतांवर जी निष्ठा होती ती अद्वितीय अशी होती. जयजयकार केला तो केवळ वारकरी संतांचाच केला. आरती गाईली ती वारकरी संतांचीच अन्य सांधुचा त्यांनी अव्हेर केला नाही परंतु निष्ठा मात्र ज्ञानोबाराय व तुकाराम महाराज यांच्यावर चरणाजवळ होती. अन्य साधूंची आरती करण्यासाठी महाराजांकडे अनेक प्रलोभने आली. परंतु महाराजंनी ती धुडकावुन लावली. राहत्याला ज्ञानेश्वरी सांगण्यााठी सायकलवर जात असत. परमार्थासाठी स्वत:च्या शरीराचची त्यांनी कधीही पर्वा केली नाही.
त्यावेळेचे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वामी सहजानंद भारती यांचे बरोबर महाराजांचे अतीश निकटचे व प्रेमाचे संबंध होते. श्रीरामपुरला स्वामी रहात असत. त्यांना वेळोवेळी भेटण्यासाठी महाराज जात असत. महारजांनी आयुष्यात कधी किर्तनाचा किंवा प्रवचनाचा मोबदला घेतला नाही. हे व्रत त्यांनी अखंडपणे शेवटपर्यंत पाळले. श्रीरामपूरला एकदा स्वामींनी महाराजानां प्रवचन करायला लावले. व प्रवचन संपल्यावर त्यांच्या अंगावर उपरणे टाकले. एवढ्या मोठ्या विभुतीने केलेला सत्कार तात्यांना नाकारता येईना. परतुं लगेच महाराजांनी ते उपरणे दुसर्या विद्यार्थ्याला देऊन टाकले. प्रवचन किर्तनाचा मोबदला घेण्यासाठी महाराजानां आयुष्यभर परिक्षाच द्याव्या लागल्या ! परंतु कधीही महाराजांनी पैशाला स्पर्श केला नाही. त्याचाच परिणाम म्हणुन आजही आमच्या दिंडीतील किर्तनकार किर्तनाचे पैसे घेत नाहीत.
साईबाबा मंदीरामध्ये ज्ञानेश्वरीवरील प्रवचने सुरू असतांना वैदु साधकांनी शिर्डी ते पंढरपुर पायी दिंडी सुरू करण्याबद्दल महाराजांकडे अग्रह धरला. सुरूवातीला महाराज यासाठी तयार नव्हते. परंतु फारच आग्रहानंतर ते तयार झाले. सन 1964 साली पहिली दिंडी महाराजांनी शिर्डीवरून सुरू केली. त्यावेळी जेमतेम 50 - 60 वारकरी दिंडीत सामील झाले होते. पुढे हेच साधन महाराजांचे जिवन की प्राण झाले. दिंडी या साधनावर महाराजांचे अतिशय प्रेम होते. या दिंडीत बहुसंख्य वारकरी वैदु समाजाचे होते त्यामुळेसाहजीकच पुढे या दिंडीला वैदांची दिंडी अस नाव पडले. दिंडीमध्ये सकाळपासुनच भजन सुरू होत गेली व शिर्डी राहता परिसरातील शिक्षीत व श्रीमंत वर्गातील लोक यात सामिल झाले.
महाराज कडक स्वभावाचे व शिस्तप्रिय असल्याने कोणी बेशिस्त वागल्याचे त्यांना खपत नव्हते आशा वेळी ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नव्हते. घरगुती बाबतीत सुद्धा महाराज कडक शिस्तीचे होते. महाराजांना दोन बहिनी एक विठाबाई व दुसरी (पुंजाबाई). या बहिणी देखील सुरवातीला दिंडीमध्ये पायी असत. त्यामधील पुंजाबाई ही बहिण देखील महाराजांसारखीच कडक स्वभावाची होती. एकदा दिंडी बाभळेश्वरला आली असतांना या दोघा बहिण भावाचे भांडण झाले. या बहिणीने देखील पिशवी उचलली व महाराजांना म्हणाली, तुझी दिंडी तुला लखलाभ ! ही मी चालले ! तुझे व तुझ्या दिंडीचे पुन्हा तोंड पाहणार नाही ! आणि म्हातारी पिशवी उचलुन सरळ एस.टी.ने. पंढरपुरला निघुन गेली ती पुन्हा दिंडीत आली नाही.
या महाराजांच्या बहिणी रक्षा बंधनासाठी ज्यावेळी शिर्डीला येत, त्यावेळचा कार्यक्रम पाहण्यासारखा असे. बहिण भाऊ समोरासमोर आले तरी एकमेंकांशी बोलणे होत नसे. रक्षा बंधनासाठी महाराजांनी हात पुढे करायचा व त्यांनी राखी बांधायची. महाराजांनी त्यांच्या हातात साडी द्यायची परंतु बोलणे मात्र नाही. अशीही गंमत पहायला मिळायची. हे स्वभावाचे वेगवेगळे पैलु !
माझी प्रकृती थोडीशी स्थुल आहे. गेल्या दहा बारा वर्षा पासुन मी दिंडीत पायी चालतो. मी दिंडीत येऊ लागल्यानंतर व थोडेफार दिंडीचे काम करायला लागल्यावर महाराजांना फार आनंद झाला. महाराज मला म्हणायचे दत्ता ! तु माझ्याकडे विचार/ज्ञानेश्वरी शिकायला ये. तुला सर्व शिकवतो. परंतु माझा ओढा जास्त सेवेकडे होता. किर्तनाचे वेळ मी समोरच बसावे असा त्यांचा आग्रह असे. परंतु मला मात्र तब्बेतीमुळे ते जड जाई. किर्तन चालु असतांना मधुनच मी कुठे आहे याबद्दल विचारणा करीत असत. मला नाईलाजाने का होईना परंतु जवळच थांबावे लागे. पंढरपूर रस्त्यावर जातांना मी एका वस्तीवंर जेवण केले व जादा उन्ह असल्यामुळे तिथेच थांबलो. दिंडी रस्ता सोडुन थोडी आतल्या गावाला गेली. तिथे प्रवचनाचे वेळी महाराजांनी विचारले दत्त कुठे आहे ? प्रसंगावधान व पुढेचे संकट ओळखुण एकजनाने सांगीतले महाराज ! मागच्या वस्तीवर दत्ताची तब्बेत बिघडल्यामुळे तो मागेच थांबला आहे. अशा पद्धतीने हा प्रसंग पार पडला. असे अनेक वेळा घडले. परंतु तरीही महाराजांनी माझ्यावर फार प्रेम केले. त्यांना मला किर्तनकार करायचे होते. परंतु त्यांचे आयुष्य कमी पडले, अजुनतरी हा योग आलेला नाही.
दिंडी पंढरपुरला जातांना खुळेवस्ती वरुन पुढे मुक्कामाला निरा नरसिंगपूरला जात असे व पुन्हा दुसर्या दिवशी मुक्कामाला खुळे वस्तीवर येत असे. असे दोन दिवस दिंडी तिथेच फिरत असे. याला कारण महाराजांची इच्छा अशी की दिंडी जास्त दिवस चालत रहावी व निरा नरसिंगपूर वरील त्यांचे प्रेम ! हे स्थान महाराजांना फार आवडत असे. दिंडी पंढरपुरला गेल्यानंतर रामबागेत दिंडीचा मुक्काम असे. तिथे बहुतेक किर्तनाचे /प्रवचनाचे कार्यक्रम महाराजांचेच असत. दोघांच्या खांदयावर हात ठेऊन महाराज प्रदक्षिणा पुर्ण करीत असत.
महाराजांच्या अखेरच्या काळात ते दिंडीच्या परतीच्या वेळी ट्रॅक्टरच्या ट्रालीत बसुन प्रवास करीत. परंतु तो ट्रक्टर दिंडीबरोबरच चालत असे. शेवटी त्यांची तब्बेत अतीशय नाजुक होत गेली. शरीरावरील ताबा सुटलेला होता. प्रवचन सुरू झाले की तासन तास प्रवचन चाले. दोन वर्ष त्यांना त्रास मोठ्या प्रमाणावर झाला. एकदा ते बेशुद्ध पडलेव त्यांना जीपने करमाळ्याला आणले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी विचारले दिंडी कुठे आहे ? दिंडी जर अजुन मागेच आहे तर मग मला पुढे का आणले ? एवढे महाराजांचे दिंडीवर प्रेम होते. शरीराबद्दल त्यांना बिलकुल असक्ती राहीलेली नव्हती. आपला अंत भगवद् स्मरणात व दिंडीतच व्हावा असे महाराजंना मनोमन वाटे.
आयुष्याच्या शेवटच्या काळात देखील महाराज व्यवहाराबाबत दक्ष होते. दवाखान्याचे किंवा औषधाचे झालेले बील देखील महाराज मला बँकेतुन पैसे आणुन चुकते करायला लावीत. अखेरपर्यंत कोणाचेही उपकार त्यांनी स्वत:च्या डोक्यावर घेतले नाही. सांप्रदायीक नियमांचे महाराजांनी अखेरपर्यंत काटेकोरपणे पालन केले. त्यात कधीही न्युनता येऊ दिली नाही. हेच नियम काटेकोरपणे सर्वांनी पाळावेत असा महाराजांचा अग्रह असायचा. विषयामध्ये अडकलेल्य जिवांना किर्तनामधुन हेच समजुन सांगत. प्रसंगी अतीशय सडेतोडपणे कोणाचाही मुलाईजा न ठेवता निर्भिडपणे समाचार घेतला. जिवांनी साधक बनुन पंढरीची वारी करावी तसेच आळंदी, पैठण या संताच्या वार्या कराव्यात. असे कळकळीने महाराज साधकांना बजावुन किर्तनकारांबद्दल महाराज सडेतोड पणे सांगत असत. अरे किर्तनकाराने खरे सांगीतले नाही तर तुम्हा खरे कोण सांगेल ? एवढी कळकळ महाराजांच्या अंतकारणांत होती. खरा साधक जर समोर दिसला तर महाराजांचे बोलणे स्वत:च्या शरीराचे पर्वा न करता तासनतास चाले.
त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला महाराज तब्बेतीच्या अतीशय गंभीर अशा स्थितीत देखील हात टेकित कोणाचाही आधार घेवून डोंगर चढुन जात व प्रदक्षिणा पुर्ण करीत. आजच्या काळत किर्तनामधील सिद्धांत / प्रमेये ऐकुण अनेकांना अशा शंका उत्पन्न होतात. की खरोखर असे खरे, कठोरपणे व अगदी सत्याने जगणे शक्य आहे काय ? तर त्याला लक्ष्मण महाराजांनी कठोरपणे त्या तत्वांचा स्विकार करुन त्यावर आरूढ होऊन आयुष्य पुर्ण केलेले आहे. म्हणुन लक्ष्मण महाराजांचे आयुष्य हा वारकरी साधकाचा वस्तुपाठ आहे. यात बिलकुल संशय घ्यायचे कारण नाही.
असे सर्वांना परमार्थाचे दिग्दर्शन करून देऊन भक्तिचा मार्ग दाखविणारे प.पु.गु. लक्ष्मण महाराज वाघचौरे यांनी सप्टेंबर 2006 मध्ये आपला देह ठेवला. त्यांनी दाखवुन दिलेल्या मार्गाने आजही दिंडींचे कार्यक्रम चालु आहेत. भगवद प्राप्तीकरीता जे साधक धडपडत आहे. त्यांना महाराजांचे आयुष्य व त्यांनी केलेला उपदेश हा आजही दिपस्तंभासारखा उपकारक ठरत आहे.
- श्री. दत्तात्रय जगन्नाथ लुटे - शिर्डी