पैठण : प्रतिनिधी :- वाढती स्पर्धा, घटलेले उत्पादन आणि शेतकर्यांनी कापूस पिकाला दिलेल्या पसंतीमुळे पीरांपरागत सुरू असलेल्या करडई तेल घाणा उद्योग अडचणीत सापडला आहे. या उद्योगाला नवसंजीवनी मिळावी यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.
तालुक्यात अंदाजे 40, तर शहरात 8 ठिकाणी करडईचे तेलाचे घाणे चालतात. वाढत्या स्पर्धेमुळे घरगुती प्रकियेतून निर्मिती करण्यात येणार्या तेलाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच चांगना नफा मिळतो म्हणून शेतकर्यांकडून कापूस पिकाची लागवड केली जात आहे. परिणामी करडईचे उत्पादन घटले आहे. भाजीसाठी या पिकाची आज लागवड केली जाते. यामुळे तेल काढण्यासाठी आवश्यक करडई उपलब्ध होत नसल्याने या उद्योगाला घरघर लागली आहे. तेलाचा हा उद्योग अक्षरश: शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. पॅकिंगच्या युगात वाढलेली स्पर्धा आणि शासनाने अवलंबलेले चुकीचे धोरणामुळे आमच्या परंपरागत उद्योगाला उतरती कळा लागली असल्याचे मत विक्रम सर्जे यांनी बोलताना व्यक्त केले.