लेखक - दिलीप फलटणकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 1996
ज्यांच्या कार्यातुन मूल्यांचे मोल प्रकटले, ती माणसे संत झाली, महात्मा झाली. माणसाच्या मोठेपणाच्या मोजपट्टया येथे महत्वाच्या नसतात. संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे हे असेच एक व्यक्तिमत्व. जे चारशे वर्ष इतिहासाच्या पानांनी जपलेलं व्यक्तिमत्व आहे. अशी संत महात्मे या तंत्रज्ञानाच्या काळात जगण्यासाठी उर्जा देत असतात. श्री. संताजी महाराजांनी मानवी जीवनात देवत्वाची पूजा बांधली. आंब्याचे झाड लावणार्या एका भारतीय आजोबांना एका परदेशी माणसानं प्रश्न विचारलं की, “आजोबा, हे झाड तुम्ही लावताय खरं पण त्याची फळ तुम्हाला चाखायला मिळतील का? त्या आजोबांनी चटकन उत्तर दिले, “या झाडाचा फायदा मला नाही मिळणार पण माझ्या पुढच्या पिढ्यांना हे झाड सावली आणि फळे देईल”. या भारतीय आजोबांच्या शब्दात भारतीय संस्कृतीचे सार लपलेले आहे. तेली समाजातील श्री संत संताजी महाराज यांनी मराठी संस्कृतीला संत तुकाराम महाराजांचा ‘तुकाराम गाथे’ सारखा ग्रंथ दिला. वारकरी संप्रदायासाठी अनमोल अशी देणगी दिली.
“आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत, देव जातीपातीत नाही तर भावाचा भुकेला आहे. देव दया निधी असून, भक्तांचा कैवारी आहे. हा परस्परात विश्वास जागवला असा ग्रंथ जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितला आणि संत श्री संताजी महाराज जगनाडे यांनी लिहून घेतला म्हणून आज जगाला संताना वाट दाखवणारा ‘तुकाराम गाथा’ सारखा ग्रंथ मिळाला. संत तुकाराम म्हणतात,तसे
आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटूं धन जन लोकां ॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दचि गौरव पूजा करु ॥ संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज यांच्या 14 टाळकर्यांमध्ये श्री संत संताजी महाराज जगनाडे यांना विशेष महत्व आहे. तुकाराम महाराजांचे अभंगाचे लेखक म्हणून सतराव्या शतकातील संताजीनी त्यांचा उल्लेख केला आहे.
संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून काढणे हेच संताजीनी आपले जीवन कार्य मानले होते. त्यामुळे त्यांची काव्य रचना फारशी नाही. जी काव्य रचना उपलब्ध अहे ती ‘घाण्याचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या काव्यात तेली समाजाची व्यावसायिक परिभाषा वापरली आहे. श्री तुकाराम महाराज व संत संताजी महाराज यांचे संसार काव्याचे स्वरुप सांगता येईल. ‘घाणा’ पाचरीचे लाटेचे, खुंटीचे, शेंडीचे, जू (जोखड), नंदीबैलाचे तेलाचे असे रुपक वापरले आहे.
संताजी महाराजांचे मूळ गाव चाकण सुदुंबरे हे त्यांचे आजोळ, त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा जगनाडे तर आईचे नाव मथुबाई होते. संताजी महाराजांना तेलाचा, पेंडीचा हिशोब ठेवावा लागत होता त्यामुळे लिहिण्या-वाचण्याचा चांगला सराव होता. जगनाडे परिवारात पिढ्यानपिढ्या पंढरपुरची वारीची परंपरा होती, त्या वातावरणातच संताजी मोठे झाल्याने आपोआपच ते भगवभद्भक्तीकडे वळले. नित्यनियमाने वडिलांबरोबर संताजीही कथाकीर्तनास जात. तेथेच त्यांची आणि संत तुकाराम यांची भेट झाली. आणि संताजी महती संत तुकारामांच्या कथाकीर्तनाने इतके प्रभावित झाले की सदैव तुकारामांच्या सहवासातच ते राहू लागले. त्यांचे जिवलग मित्र, परम शिष्य आणि टाळकरी बनले. तुकारामांच्या श्रेष्ठत्वाची त्यांना मनोमन जाणीव झाली. बालवयातच त्यांना अनुसरणारे संताजी संत तुकारामांच्या निर्याणक्षणापर्यंत त्यांच्या सान्निध्यात सावलीसारखे राहिले. सदैव तुकारामांच्या सहवासात राहून त्यांनी उत्स्फूर्तपणे म्हटलेले अभंग संताजी तात्काळ उतरवून घेत, हेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले होते. कीर्तन करताना तुकारामांनी निरूपण करावे, मागे संताजीने ध्रृपद धरावे असा त्यांचा नित्यनेम असे ते पुढील अभंगावरुन दिसून येते.
“पुढे तुका नाम गाजवी । मागे संतु टाळी वाजवी ॥
तुका करी निरुपण । संतु मागे ध्रृपद म्हणे” ॥
अशी संताजी आणि संत तुकाराम यांची दृढ मैत्री होती.
संताजींचे सर्वांत महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले हे तर आहेच, पण अगदी प्राणपणाने त्यांनी त्याची जपणूक केली हे विशेष होय. शाहिस्तेखानाच्या हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतर दहा वर्षांनी झालेल्या दिलेरखान, बहादूरखानाच्या हल्ल्यातून त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांच्या वह्या मोठ्या शिकस्तीने वाचविल्या. समकालीन म्हणून आज त्या प्रमाण मानल्या जातात. संताजींना पांडुजी नावाचा एक भाऊ होता. त्यांचा चार मुले होती. मोठ्या मुलाचे नाव बाळाजी असे होते.
संताजींबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे ती म्हणजे संत तुकाराम आणि संताजी यांनी एकमेकांशी ‘आणभाक’ केली होती की, ज्याचा मृत्यू आधी होईल त्यास जो मागे राहील त्याने ‘मूठमाती’ द्यावी ! संत तुकारामांच्या निर्याणानंतर कित्येक वर्षांनी संताजी तेली वारले. आप्तेष्टांनी मूठमाती दिली. परंतु तेलीबाबाचे तोंड झाकेना. अखेर मध्यरात्री तुकाराम स्वत: प्रगट झाले. त्यांनी मूठमाती दिली व बाळोजीस (त्यांचे मुलास) तेरा अभंग दिले.”
एक अभंग पुढीलप्रमाणे :
चारितां गोधने । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तीन मुष्टी मृत्तिका देख । तेव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संत न्यावया विष्णुलोकां ॥4॥
“सावध व्हा रे माझ्या जातीच्या तेल्यांनो ।
आवघ्या जनांनो सावध व्हा रे ॥
काळाचिचे उडी पडेल बा जेव्हां ॥
सोडविना तेव्हा मायबापा ॥
संतु तेली म्हणे सावध कोण झाला ।
देहासहित गेला तुकावाणी ॥ (अ.क्र. 66 राहटे - 1924)
मनाला ‘नंदीबैला’ चे रुपक देऊन संताजी म्हणतात,
‘मन पवनाचा करुनि नंदी । पाहुनि संसारामधी संधी ॥
जोखड घेऊनिया खांदी । भ्रमाची झोपडी बांधी ॥
संतु तेली म्हणे हा नंदी । करितो सर्व जगाची चांदी ॥” (अ.क्र. 67 राहटे - 1924)
ते पुढे म्हणतात.
“मन हे ओढाळ गुरु फार आहे । परधन पर कामिनीकडे धांवे ॥
असेंच हे मन राहिना हो स्थिर । नेहमी हुरहुर लागली असे ॥
संतु म्हणे मन करा तुम्ही स्थिर । राऊळा आंगणी जाऊनियां ॥” (अ.क्र. 68 राहटे - 1924)
या ओढाळ मनाला स्थिर करुन ते तुम्ही देवापाशी लावा. तर आत्मोध्दार करुन घेता येईल. आयत्या वेळी काही होणे नाही.
देहरुपी घाण्यात सत्त्व, रज, तम हे भाव रगडले जाऊन त्यांचे अस्तित्व उरत नाही. संसारात असणारे सर्व भोग भोगून घेतले. मनोविकारांवर विजय मिळवून जे चैतन्यरुपी तेल मिळते ते कोणी घेलते याचे मार्मिक चित्र संताजींनी ‘तेलावरील’ रुपकातून व्यक्त केले आहे. हे चैतन्यरुपी तेल म्हणजे ब्रम्हज्ञान. सर्वच संतांना या भौतिक जीवनातील सुखदु:खांना सामोरे जावे लागले. सर्वांनी ही सुखदु:खे भोगूनच संपविली, त्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांना जाणले. हे जाणणे म्हणजेच ब्रम्हज्ञान.
संताजी म्हणतात, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, संत चोखा, कबीर, रोहिदास, सावता माळी, जनाबाई, कान्होपात्रा, तुकाराम या सर्वांनी हे चैतन्यरुपी तेल नेले.
अभंगातून संताजींनी केलेला सर्वच संतांचा उल्लेख म्हणजे ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंत संतांचा घेतलेला आढावा हा बहिणाबाईंच्या इमारतीचे रुपक वापरुन केलेल्या संतगौरवाच्या जवळ जाणारा वाटतो.
निरनिराळ्या रुपकांच्या आधारे संताजींनी जे ब्रम्हज्ञान सांगितले, ते म्हणजे तुकारामांच्याच मनातील भाव, त्यांच्याच तत्वज्ञानाचा आशय होता. हे पाहून तुकारामांना अतिशय संतोष वाटतो. प्रसन्न मनाने ते संताजीचा उचित गौरव करतात.
धन्य धन्य संतु तू होशील जाण । तुजलागी ज्ञान फार आहे ॥
व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक । मजलागी देख कळों आलें ॥
ज्ञानाचा सागर होशील तू योगी । नेणती हे जगीं मूढ जन ॥
तुका म्हणजे बोल अंतरीचे ज्ञान । ऐकतां वचन गोड लागे ॥
(राहटे - 1924 अ.क्र. 84)
संतीजींची कविता अल्पसंख्य असली तरी तीतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता हे लक्षात येते. अगदी बालपणापासून संताजी तुकारामांच्या सहवासात होते. संताजींनी त्यांना अगदी जवळून अवलोकिले होते. तुकारामांचे मनन, चिंतन, यांतून त्यांना मिळविलेले ब्रम्हज्ञान या सार्यांचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून होते. साहजिकच तुकारामांचा प्रभाव त्यांच्यावर इतका होता की, तुकारामांचे अभंग आपलेच आहेत, इतक्या आत्मीयतेने त्यांनी ते अभंग लिहून काढले आहेत. तुकाराम गाथा यासारखा अतुलनीय ग्रंथ मराठी भाषेला मिळाला आहे.