महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रूढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजासारख्याच आहे. या समाजाच्या राज्यात साधारणत: २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, शनवार, शुक वार, राठोड, परदेशी, तिळवण आणि गंधी यांचा समावेश होतो. यापैकी तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर भारतात 700 पेक्षा अधिक पोटजाती आहेत. या समाजातील लोक सोमवारी काम करीत नाहीत म्हणून त्यांना ‘सोमवार तेली’ म्हणतात. याशिवाय समाजात अनेक पोटजाती आहेत. यात प्रामुख्याने मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली, सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, एक बादिया तेली, चौधरी तेली आदि तेली जातीच्या उपशाखा आहेत. मुस्लीम धर्मातील तेली समाजाला रोशनदार असे म्हटले जाते. नागपूर भागात प्रामुख्याने एक बैले, दोन बैले किंवा तराणे आणि एरंडे अशा तेली समाजाच्या शाखा पोटशाखा आहेत. वर्धा जिल्ह्यात सावतेली हा समाज आदिवासी जमातीप्रमाणे राहतो, तर एरंडे तेली हे गावाबाहेर राहतात. साहू क्षत्रिय समाज विदर्भात मोठय़ा प्रमाणावर आहे.
तेली समाजात एकाच कुळातील मुलाचा आणि मुलीचा विवाह निषिद्ध मानतात. तेली समाजातील महिलांचा पोषाख हा बहुजन समाजातील महिलांसारखा असतो. हे लोक गणपती, मारुती आदि देवतांना भजतात. देशस्थ ब्राह्मण त्यांचे पौरोहित्य करतात. आमले, बेंद्रे भागवत, भिसे, चव्हाण, दळवे, देशमाने, दिवकर, डोळसे, गायकवाड, झगडे अशी त्यांची आडनावे आहेत. लग्नकार्यात देवक म्हणून पहार आणि घाणा यांची पूजा करतात. तसेच काही ठिकाणी उंबर, कळंब, आपटा आदि झाडांचीही पाने पाचपालवी म्हणून देवकार्यात पूजतात. सैन्य दलात कामगिरी आणि शासनकर्ता समाज तेली समाजातील लोक फक्त तेल काढून विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत होते, असे नव्हे, तर त्यांनी काही काळ राज्यही केले होते. अनेकांनी सैन्य दलातही चांगली कामगिरी बजावली होती, असे इतिहासातील घटनांवरून स्पष्ट होते.आंध्र प्रदेशातील तेली समाजातील अनेक पिढय़ा सैन्यदलात सैनिकापासून तेसेनापती पदापर्यंत पोहोचल्याचेआढळते.
अनेक तेली लोक अयोध्या येथील विजयादित्य राजाबरोबर अयोध्या सोडून आंध्र प्रदेशात लढण्यासाठी गेले होते. विजयादित्याने चालुक्य वंशाचे राज्य स्थापन केले होते. यात तेली समाजाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, असे दिसून येते. तेली जातीच्या सैनिकी व शासकीय सेवेतील योगदानाची स्तुती राजजोड गगुडा या राजाने एका अधिकारपत्रात केली आहे. या पत्रात राजा म्हणतो, ‘माझ्या राज्यात असे अनेक कर्मचारी आहेत, जे प्रामाणिक सेवा, साहस, स्वामीभक्ती व बुद्धीने काम करतात; परंतु यात तेली जातीचा पहिला क्रमांक लागतो.’ तत्कालीन अनेक प्रसंगांतून तेली समाजाच्या स्वामीभक्तीचा परिचय येतो. विशेष म्हणजे, तेली जातीच्या वधू- वरांना अश्वारोहणाचा अधिकार राजजोड गगुडा या राजाने दिला होता. लग्नाच्या वरातीला राजमहालाजवळ येण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी राजा स्वत: आपल्या हाताने वधू-वरांना सुवर्णपात्रातील तांबूल देत असे,असाही उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरापराड जातींच्या लोकांमध्ये तेली समाजाचाही समावेश होता. लढाईत तलवार चालविण्याबरोबर काही लोक सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था पाहत, त्यासाठी तेल-पाणी, घासलेट, मीठ- मिरची याची व्यवस्था हे लोक करत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी आले असता, मोगलांचा वेढा पडला. तेव्हा हातातील टाळ ठेवून संताजी जगनाडे महाराजांनी तलवार हाती घेऊन मोगल सैन्याचा प्रतिकार केला होता. सातारा जिल्ह्यात रमाबाई तेली उपाख्य तेलीणताई नावाची महिला सेनापती होऊन गेली. दुसर्या बाजीराव पेशव्याचे सेनापती बापू गोखले यांच्याविरुद्ध कित्येक दिवस संघर्ष करीत या वीर महिलेने वासोटा किल्ल्याचे रक्षण केले होते. पुरुषाची वेशभूषा करून ताई तेलीणीच्या सैन्याने पेशवाईच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. रणांगण गाजविणार्या तेलीन ताईचा तेली समाजात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. प्राचीन व मध्ययुगात तेली लोक सैनिक व सेनापती होते. काही काळ शासक म्हणून त्यांनी राज्य केले.
इतिहासकार कर्निघम यानेआपल्या टिपणांमध्ये नमूद केले की, बुंदेलखंडातील उच्चहार येथील परिहार राजवंशज शासक लोक तेली जातीचे होते. मध्यप्रांतातील चेदीराजा गांगेय देव हे तेली समाजाचे होते. यावरून बुंदेलखंड, बघेलखंड आणि दक्षिणी कौशल आदि भागांवर पाचशे वषर्ा्ंपेक्षा अधिक काळापर्यंत तेली जातीने राज्य केले होते. इसवीसनाच्या पहिल्या शतकातील शिलालेखांच्या आधारे तेली लोक हे श्रीमंत व मोठे व्यावसायिक होते, असे स्पष्ट होते. तसेच तेली व्यावसायिकांचे संघ असून, त्यांचा मोठय़ा प्रमाणावर व्यापार-उद्योग चालत असे. उत्तर आणि दक्षिण भारतातील शिलालेखांनुसार दोन हजार वर्षांपूर्वी तेली व्यावसायिक संघाची एक घटना असायची. त्यात काळ व प्रदेशानुसार बदल करण्यात येत असे. संघाची प्रमुख कार्यकारिणी असायची. संघाचे सदस्य एका विशिष्ट गाव किंवा शहराएवढेच र्मयादित न राहता पूर्ण प्रांतातील लोकांना सदस्यत्व देण्यात येत असे. कोची येथील संघाचे सभासद विविध २४ नगरांत होते. नवव्या व दहाव्या शतकातील ग्वाल्हेर व राजपुतान्यातील सियादोनी येथील शिलालेखांतून तेली संघाची घटना व कार्याची माहिती मिळते. गाव व नगरातील संघाची एक स्थानिक कार्यकारिणी समिती असायची. यात सभापती आणि तीन ते चार सदस्य असत. ग्वाल्हेरजवळील सर्वेश्वरपूर नगरातील तेली संघाचा प्रमुख महत्तक सवस्वक होता. ग्वाल्हेर येथील शिलालेखांवरून स्पष्ट होते की, जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय संघ असायचा व त्याचे जिल्ह्यातील अन्य नगर व गावात संघ प्रतिनिधी असायचे. या शिलालेखांमध्ये विविध ठिकाणच्या संघांचा उल्लेख केल्यानंतर ‘इवमादि समस्त तेलिक श्रेणी’ असे शेवटी नमूद करण्यात आले आहे. यावरून विविध ठिकाणच्या सभासदांकडून वर्गणी घेऊन दान करण्याचा निर्णय संघ घेत असल्याचे स्पष्ट होते.
सियादोनीच्या दहाव्या शतकातील शिलालेखाच्या आधारे तेली समाजाचे दोन संघ क्रियाशील असल्याचा उल्लेख आढळतो. यावरून आवश्यकतेनुसार मोठय़ा शहरामध्ये विठू, नारायण, नागदेव व महासोन हे चार सदस्य होते., तर दुसर्या संघाच्या कार्यसमितीमध्ये केशव, दुर्गादित्य, केसूलाल, उजोनेक व लुंडीसिक असे पाच सदस्य होते. स्थानिक मंदिरातील दिव्यांना संघातील सदस्यांनी एक वेळ तेल दान करावे, असा निर्णय या दोन्ही संघांनी घेतला होता. स्सामाजिक कार्य तेली समाजाच्या अनेक सामाजिक संस्था असून, त्यांच्यामार्फत विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. १९८५ मध्ये तेली समाजातील महाराष्ट्रासह देशभरातील अनेक संस्था एकत्र येऊन अखिल भारतीय तौलिक साहू महासभेची स्थापना करण्यात आली. बीडच्या तत्कालीन खासदार केशरकाकू क्षीरसागर या संस्थापक अध्यक्ष होत्या. 2008 पासून जयदत्त क्षीरसागर अध्यक्ष आहेत. तेली समाजाची एकूण १३ मासिके असून, त्यात तेली समाजसेवक आणि श्रीमंगल (नाशिक), तेली गल्ली (पुणे), तेलीमत (चोपडा) आदिंचा समावेश आहे.
राजकारणातील स्थान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे असून, गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी गुजरात राज्याच्या विकासात मोठा हातभार लावलेला दिसतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपकम) जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजाचे असून, अखिल भारतीय तौलीक साहू महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. त्याप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बावनकर आणि कृष्णा खोपडे तेली समाजातील आहेत. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. षन्मुख चेट्टी अर्थमंत्री होते. तसेच दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शांताराम पोटदुखे अर्थराज्यमंत्री होते. विधानसभेचे माजी सभापती प्रमोद शेंडे, तत्कालीन विदर्भ राज्यातील उपमुख्यमंत्री उलमलकू मकडे, रामदास तडस, जगदीश गुप्ता आदिंसह अनेक मान्यवर राजकारणात अनेक पदांवर कार्यरत आहेत.शिक्षणाचे प्रमाण संपूर्ण देशभरात तेली समाजाची लोकसंख्या सुमारे १३ कोटी असून, महाराष्ट्रात साधारणत: एक कोटी लोकसंख्या आहे. विदर्भात ६५ लाख तेली समाजबांधव असून, या समाजाचे सर्व क्षेत्रांत प्राबल्य दिसते.१९0१ च्या जनगणनेनुसार तेली जातीचे शिक्षण घेण्याचे प्रमाण १.५ टक्के होते.१९२१ मध्ये ते ३.६ टक्के एवढे झाले, तर १९३१ मध्ये ५.२ टक्क्यांपर्यंत शिक्षण घेणार्यांचे प्रमाण वाढले. १९३१ च्या काळात इतर जातींमध्ये शिक्षण घेणार्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते : लोहार ७.५ टक्के, माळी ७ टक्के, कुणबी ७.६ टक्के, तर ब्राह्मणांमध्ये ५५.३ टक्के. १९३१ नंतर जनगणना जाती आधारावर न झाल्याने नंतरच्या तेली जातीतील शिक्षणाचे प्रमाण आकडेवारीनुसार उपलब्ध नाही.
सद्यस्थितीत तेली समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण २ टक्के , पदवी ७ ते ८ टक्के, बारावी १५ टक्के, दहावी २५ टक्के एवढे शिक्षणाचे अल्प प्रमाण आहे. एकूण आर्थिक, सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे व दैन्य, दारिद्रय़, उदासीनतेमुळे ७५ ते ८0 टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. ५९ टक्के मुले तर शाळेचे तोंडही बघत नसल्याचे आकडेवारी सांगते. व्यापार-उद्योग व शिक्षण क्षेत्र तेली समाजाचा मुख्य व्यवसाय तेलविक्री असला, तरी अन्य व्यवसायांतही या समाजाने लक्षणीय प्रगती केलेली दिसते. बीड जिल्ह्यात गजानन सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषविणार्या केशरकाकू क्षीरसागर या देशातील पहिल्या महिला साखर कारखाना अध्यक्ष होत्या. कारखानदारी, लघुउद्योग, शेती, तसेच किराणा व्यवसायात समाजातील लोकांनी चांगली प्रगती केलेली दिसते. याशिवाय घाऊक व किरकोळ औषधविक्री व्यवसायात समाजाचे बहुसंख्य लोक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तेली समाजाने प्रगती केली आहे. बीड येथील माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या नवगण विद्या प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातही तेली समाजाच्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. अनेक उच्च पदांवर समाजाचे लोक दिसून येतात. सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राधाकृष्ण मोकलवार, शिक्षणसंस्था अध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, नागपूर तेली समाजाचे ईश्वर्जी बाळबुधे, सुखदेवजी वंजारी, काटोलचे प्राचार्य रविन्द्रजी येनुरकर, गणेशजी चन्ने, आदिंसह अनेक लोक उच्च पदांवर आहेत.