खंडित निष्कर्षण तेल निर्मीती प्रक्रिया : खंडित प्रक्रियेत दाब देण्यासाठी जलशक्तीचा उपयोग करतात. खंडित प्रक्रियेतसुद्धा खुली खंडित प्रक्रिया आणि बंद खंडित प्रक्रिया असे दोन पर्याय असून प्रत्येकी दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. खुल्या पद्धतीत शिजवून व ठेचून घेतलेल्या बिया गाळण कापडात गुंडाळून, गठ्ठे करून, जाळीदार पत्र्यात किंवा जाळीच्या पेटीसारख्या साच्यात ठेवून दाबयंत्रात घालतात. या जाळ्या किंवा साचे यांची रचना अशी असते की, दाब पडला असता हे जाळीदार पत्रे किंवा साच्यांचे तळ आणि झाकण ठराविक आसाच्या आधारे सरकतात. त्यामुळे गाळण कापडातील पदार्थ दाबला जाऊन मेद बाहेर पडते. जाळ्या वापरल्या जाणाऱ्या यंत्रात साचे वापरल्या जाणाऱ्या यंत्रापेक्षा जास्त पदार्थ एकावेळी भरता येतो. साच्यांचे आकारमान साधारणतः ८७·५ X ३५ X ५ सें.मी. असून असे १५–१६ पेटी साचे यंत्रात मावतात. या यंत्रातून २४ तासात १० टन भुईमुगाच्या शेंगांचे तेल काढता येते. या खुल्या खंडित प्रक्रियेत प्रत्यक्ष पदार्थांवर दर चौ. सें.मी. स ११६–१३० किग्रॅ पर्यंत दाब पडतो. जास्त दाब दिल्यास गाळण कापड फाटण्याची भीती असते. पदार्थ भरलेले गठ्ठे किंवा साचे यंत्रात ठेवण्यापासून तो तेल निघेपर्यंत व साच्यातील पेंड काढून टाकण्याच्या संपूर्ण क्रियेस सु. ३६ मिनिटे लागतात. पैकी ६ मिनिटे जास्तीत जास्त दाब येण्याची आणि २६ मिनिटे मेद पूर्णपणे वाहून येण्यास लागतात. निष्कर्षणाचे तापमान ९०°–९५° से. असते. शिजविण्याच्या क्रियेतून मिळालेली उष्णता व दाब दिल्यामुळे वाढणारी उष्णता या दोन्हींमुळे हे तापमान कायम ठेवता येते. खंडित प्रक्रियेत पदार्थ भरण्यास व पेंड काढून घेण्यास वेगळी योजना करावी लागते. बंद खंडित प्रक्रियेत शिजविलेल्या आणि ठेचून घेतलेल्या बिया मोठ्या जाळीदार पिपात किंवा पिजंऱ्यात ठेवतात. गाळण कापडाची यात आवश्यकता नसते. त्यामुळे जास्त दाबाखाली निष्कर्षण करता येते. पिपाच्या उंचीचा गोलाकार पृष्ठभाग ३–४ जाळ्यांच्या थरांचा बनविलेला असतो. आतल्या बाजूने जाड जाळी व बाहेरील बाजूस बारीक जाळी अशी रचना असते. दट्ट्यासारख्या यांत्रिक साधनाने पिपाच्या तळाकडून किंवा झाकणाकडून दाब देऊन दुसरी बाजू पक्की ठेवल्यास पदार्थ दाबला जाऊन जाळीतून गाळलेले तेल बाहेर पडते. निष्कर्षण झाल्यानंतर ही पिपे बाजू्ला घेऊन त्यातील पेंड काढून पुन्हा पदार्थ भरून ती दाबयंत्रात बसवतात. एरंडीसारख्या पदार्थांचे तेल काढताना उच्च तापमान चालत नाही; परंतु पूर्ण मेद निघण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. बंद खंडित पद्धतीत हे शक्य होते. खोबरे व पाम मगज यांची तेलेही या पद्धतीने काढतात. बाजूने जाळी ठेवण्याऐवजी तळाला जाळी ठेवल्यास आणि पिपाला बाहेरून वाफ सोडण्यासाठी आवरणाची तजवीज केलेली असल्यास जास्त तापमानालासुद्धा निष्कर्षण करता येते. कोको बटरसारख्या जास्त वितळबिंदू असलेल्या मेदांचे निष्कर्षण अशा यंत्रसामग्रीने करतात. खंडित पद्धतीत पेंडीत ५–६% मेद शिल्लक राहते.