अखंडित निष्कर्षण प्रक्रिया तेल प्रक्रिया : स्क्रू पद्धतीची दाबयंत्रे वापरात येऊ लागल्यापासून खंडित पद्धत मागे पडू लागली आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात दाण्याचे पीठ करण्याचे स्क्रू पद्धतीचा आडवा दांडा असलेले जे यंत्र आपण वापरतो, त्याच तत्त्वावर या दाबयंत्राची रचना असते. या पद्धतीने निष्कर्षण सतत चालू ठेवता येते. मजुरी कमी पडते व कोणत्याही मेदबियांकरिता यंत्रातील भागात बदल न करता ते वापरता येते. गाळणी कापडाचा उपयोग करावा लागत नाही. मात्र आवश्यक तो जास्त दाब निर्माण करण्यासाठी यांत्रिक शक्ती जास्त लागते. अशा दाबयंत्रामध्ये स्क्रूसारखे फिरते दांडे असलेले दोन भाग असतात. उभ्या दांड्याच्या योगाने थोडासा दाब दिला असता सहजासहजी बाहेर पडलेले मेद वेगळे होऊन येते व पदार्थ आडवा स्क्रू–दांडा असलेल्या नळीत येतो. या ठिकाणी त्यावर दर चौ.मिमी. स ७·८७–२३·६२ किग्रॅ. एवढा दाब दिला जातो आणि जवळजवळ सर्व मेद बाहेर पडते. या पद्धतीत पेंडीमध्ये ३–५% मेद शिल्लक असते. मेद गाळले जाण्याची योजना स्क्रू–दांड्याच्या बाजूने परंतु त्याला लंबरूप असलेल्या निरनिराळ्या अंतरांवर असलेल्या जाळीदार पत्र्यांच्या मदतीने केलेली असते. या जाळ्यांच्या मध्ये पेंड साठते व मेद गाळून बाहेर येते. या पद्धतीत यांत्रिक दाब एवढा असतो की, त्यामुळे बाहेर येणाऱ्या मेदाचे तापमान खूप वाढते. ते तसेच राहिल्यास यंत्राच्या दृष्टीने ते हानिकारक असते. शिवाय अशा जास्त तापमानाला मेदाचे अपघटन होऊन मेदाची प्रत कमी होण्याचा धोका असतो. याकरिता दांडा फिरत असलेल्या नळीच्या बाहेरील बाजूने गार केलेले, अगोदर काढलेले मेद किंवा पाणी खेळविलेले असते. यामुळे यंत्राचे व मेदाचे तापमान योग्य तितके राखले जाते. यंत्रात भरल्या जाणाऱ्या बिया आधी ठेचून व शिजवून घेतलेल्या असतात हे सुरूवातीला सांगितले आहेच. काही यंत्रसामग्रीत स्क्रू दाबयंत्राच्या वरील बाजूस बिया ठेचून निघण्याची व शिजविण्याची सोय असते आणि अशा तयार झालेल्या बिया स्कू–दांड्याच्या नळीत सरळ ओतल्या जातात.