यांत्रिक दाबाच्या साहाय्याने तेल निर्मीती ( निष्कर्षण ) : मोठ्या प्रमाणावर व तेलाचा उतारा उच्च पडेल अशा तऱ्हेने निष्कर्षण ( तेल निर्मीती करण्यासाठी ) करण्यासाठी यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. शिवाय त्यापूर्वी तेलबियांवर काही प्राथमिक प्रक्रिया करून घ्याव्या लागतात. या पद्धतीत अनेक टप्पे आहेत. सुरूवातीच्या काही लेखात लिहिल्याप्रमाणे बियांच्या नमुन्यांची तपासणी झाली की, चाळणीवजा यंत्रांच्या योगाने त्यांमधील रेवाळ माती, खडे, काटक्या यांसारखे अनिष्ट पदार्थ दूर करतात. साफ करण्याच्या क्रियेतील हा पहिला टप्पा होय. दुसरा टप्पा म्हणजे बियांच्या वरील टरफल अगर साल काढून आतील मगज वेगळा करणे हा; उदा., भुईमुगाच्या शेंगांपासून दाणे वेगळे करण्याची क्रिया, कापसातील सरकी काढून टाकण्याच्या यंत्रातून (जिनमधून) आलेल्या सरकीवर उरलेला कापूस (लिंट) प्रथम काढून घेऊन मगच सरकीचे टरफल काढून टाकतात. नंतर टरफलासहित बियांचे मगज भरडून बारीक करतात. हा तिसरा टप्पा होय. याला भरडा म्हणू या. हा भरडा नंतर विवक्षित पाण्याचे प्रमाण आणि तापमान (१००°-११०° से.) वापरून शिजविला जातो. याकरिता योजलेल्या अनेक साधनांपैकी स्टॅक कुकर हे एक साधन आहे. हे एक ०·६–२·० मी. व्यासाचे उभट पीप असून त्यात एकावर एक असे ३ ते ६ कप्पे असतात. कप्प्यांचे तळ पोकळ असून त्यातून वाफ जाईल अशी योजना असते. कप्प्यात भरलेला पदार्थ फिरविला जावा म्हणून तळावर फिरक्या असतात आणि त्या पिपाच्या मध्यातून जाणाऱ्या उभ्या व फिरत्या दांड्याला जोडलेल्या असतात. कप्प्यांच्या तळाला खिडक्या असून त्यांतून वरच्या कप्यातील पदार्थ खालच्या कप्यात पडतो. सर्वांत वरच्या कप्यात वाफ सोडलेली असते. तळच्या कप्प्यामधून हवेच्या झोताने भरड्यातील अतिरिकत पाणी काढून टाकले जाते. सर्व कप्प्यांच्या मधून खाली आलेला माल अवश्य तेवढा शिजलेला व पाण्याचे प्रमाण यथायोग्य असलेला असतो. भरडलेल्या बिया (अगर मगज) शिजविल्याने पुढील गोष्टी घडून येतात : (अ) बियांवर वाफ सोडून त्या शिजविल्या जात असल्यामुळे त्या मऊ होतात आणि त्यावर अपायकारक बुरशी अथवा जंतू असल्यास त्यांचा नाश होतो. (आ) बियांतील प्रथिनांचे किलाटन (न विरघळणाऱ्या साक्याच्या स्वरूपात रूपांतर) झाल्यामुळे त्यातील तेलाचे सूक्ष्म थेंब एकत्रित होऊन मोठे थेंब बनतात. (इ) पापुद्र्यांमधील छिद्रे उमलली जातात. (ई) बियांतील पाण्याचे प्रमाण वाढले गेल्यामुळे त्यांची तेल पकडून ठेवण्याची पात्रता कमी होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे एरवी मेद काढण्यासाठी जेवढा दाब वापरावा लागला असता त्याच्यापेक्षा अनेक पटींनी कमी दाब वापरून जास्त प्रमाणात तेल निघते.
काही बाबतींत, या शिजविण्याच्या क्रियेच्या वेळी योग्य ते pH मू्ल्य [→ पीएच मू्ल्य] राखल्यास काही चांगले परिणाम दिसतात. उदा. शिजविताना pH मू्ल्य ठेवल्यास सरकीपासून मिळणाऱ्या तेलात गॉसिपॉलाचे प्रमाण अगदी कमी असते. साठवणीने त्याचा रंग बदलत नाही व शुद्धीकरण प्रक्रियेत तेल कमी वाया जाते. पेंडीमध्ये मात्र गॉसिपॉलाचे प्रमाण वाढते.
काही मेदबिया दाबयंत्रात घालण्यापूर्वी शिजवीत नाहीत. या पद्धतीने निष्कर्षण करण्याच्या पद्धतीला शीत पद्धत म्हणतात. एरंडेल आणि चांगल्या प्रतीचे ऑलिव्ह तेल शीत पद्धतीने काढतात.
शिजविलेला भरडा लगेच दाबयंत्रात घालून तेल व पेंड मिळविणे हा पाचवा आणि शेवटचा टप्पा होय. यातून मेदाचे जास्तीत जास्त निष्कर्षण होणे हे त्यावर दिला जाणारा दाब, जास्तीत जास्त दाब किती वेळ ठेवला होता, दाब दिला जात असताना पदार्थाचे तापमान किती होते व त्या तापमानाला मेदाची श्यानता किती आहे, या सर्वांवर अवलंबून असते.
दाबयंत्रांनी तेल मेद काढण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एकात निष्कर्षण करण्याचा पदार्थ हप्त्याहप्त्याने यंत्रात भरला जातो व त्याचे निष्कर्षण झाल्यानंतर पेंड काढून घेऊन पुन्हा नवीन पदार्थ भरण्यात येतो. साहजिकच निष्कर्षणाची क्रिया पदार्थ पुन्हा भरून होईपर्यंत बंद राहते. या प्रकाराच्या निष्कर्षण यंत्राची रचना अशी असते की, एका बाजूने पदार्थ यंत्रात भरला जातो आणि दुसऱ्या बाजूने मेद व पेंड वेगळे होऊन बाहेर पडतात. ही क्रिया सतत चालू शकते आणि म्हणून हिला अखंडित प्रक्रिया म्हणता येईल.