दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
कादंबरीची पहिली आवुत्ती हातोहात संपली. महाराष्ट्राच्या सिमारेषा पार करून इतर राज्यात सुद्धा अल्पावधीत आपला वेगळा ठसा उमटवून यशाच्या शर्यतीचा पल्ला गाठला. यावरून कादंबरी लेखनाची महती वाचकांच्या सहज लक्षात येईल.
कांदबरीच्या यशाची काही खास अंगप्रत्यये आहेत. लेखकाची वेगळया थाटणीची लेखनशैली, प्रसंगानुरूप केलेली कथात्मक मांडणी, भिन्न विषयाचा अंर्तभाव करून केलेलं लेखनकार्य यात चरित्रात्मक, सामाजिक, सांस्कुतिक, संशोधनात्मक, वैचारिक, इतिहासिक या विष्यस्तंभावर उभी करून ही साहित्यइमारत आकारास आली आहे. म्हणूनच वाचकाला करमणुकी सोबतच इतिहासाचीही चव चाखायला मिळते. यासाठी लेखकाने केलेली अपार, अविरत, अथक पयत्नांची फलश्रुती होय असच म्हणावं लागेल.
वाचकांच्या प्रतिसादाचा सूर असा की, लेखकांनी तत्कालिन परिस्थितीचा अभ्यास संताजीवरचं पुरेसं साहित्य उपलब्ध नसतांना सुद्धा कसा केलेला असावा. लेखकाच्या राहत्या स्थलापासून कोसो दूर असलेल्या ऐतिहासिक स्थळांची तंतोतंत माहिती कशी प्राप्त केली असावी. तसेच संताजीच्या चरित्रवषियाची अवघड माहिती कशी संकलीत केली असावी. असे अनेक प्रश्न वाचकाला उदभवतात. यावरून असे लक्षात येते की, लेखकांनी किती अडचणिच्या शर्यती पार पाडल्या असाव्यात म्हणूनच ही कादंबरी भविष्य काळासाठी एक अमूल्य ठेवा ठरेल.
संताजी महाराजांची संपुर्ण ओळख होण्यास सहायभूत ठरणारी ही कादंबरी होय. इतर त्रोटक साहित्यावरून संताजी फक्त संत तुकाराम महाराज यांचे सहकारी म्हणूनच समाजामध्ये समाजमान्य होते. पण असं नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला साहायभूत असणारी महत्वाची व्यक्ती म्हणजेच संताजी. संत संताजी व संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी प्रबोधनाने स्वराज्य उभारणीसाठी मावळे तयार करणे व मावळयांना लढण्यासाठी स्फुर्ती टॉनिक म्हणून महान कार्य त्यांच्या हातून पार पडलें आहे. लेखकांनी संताजींना योद्धा ही पदवी बहाल का केली या शंकेचं रहस्य यात दडलेलं आहे.
संताजी महाराजांच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं यथार्थ वर्णन या कांदबरीत आहे. यावेळी धर्मांध सत्ता व सुलतानशाहीनी प्रजेच्या छळाची मालिकाच तयार केली होती. या दोघांच्या अत्याचाराच्या आगीत जनता होरपळून निघाली होती. या आगीला आपल्या प्रबोधनरूपी शस्त्राने शांत करण्याचं महत्तम कार्य संताजीने केले अन्यायाविरूद्ध लढणारे ते प्रांजळ वीर अर्थात योद्धे होते.
समाजामध्ये त्याकाळात कुप्रथा, कर्मकांड, अंधश्रद्धा याचं अमाप पीक आलं होतं याद्वारे जनतेच्या आर्थिक व शारिरिक शोषणानं हद्दच पार केली होती. या धार्मिक दहशतीच्या सावटातून जनतेची सुटका करण्याचं कार्य संताजीने केले. प्रजेला अन्यायाविरूद्ध लढण्याचं अमृतबळ आपल्या अमृतवाणीने कीर्तनाच्या माध्यमातून आयुष्यभर विनामूल्य देत सेवाव्रत राहिले.
एकंदरीत सारासार विचार करता ही कादंबरी सामाजिक प्रबोधनाचा एक साहित्य साधन म्हणून भविष्य काळाचा आरसा ठरेल. वैज्ञानिकतेच्या अंगाने नटलेली कथात्मकतेच्या विविध् रंगाने रंगलेली, पात्रांच्या रास्त सुसंवाद सुत्रात बांधलेली, नाट्यात्मक अंश लाभलेली, प्रसंगावधानाचं नेमकं भान राखलेली, वीर व करूण रसाने तुडुंब भरलेली, प्रयत्नवादाचं एक रसायन, वाचनीय साहित्यकृती, वाचकांना हवीहवीषी वाटणारी रेकॉर्ड ब्रेक कांदबरी होय. लेखकाच्या लेखनाला जय संताजी करतांनाच त्यांच्या पुढील साहित्यकृतीस भरभरून शुभेच्छा.
कादंबरी - संताजी जगनाडे एक योद्धा
लेखक - संजय वि. येरणे नागभीड जि. चंद्रपूर संपर्क 9404121098
प्रकाशन - भरारी प्रकाशन, बंडू कत्रोजवार नागपूर.
पृष्ठे 176, किंमत -200 रू
समीक्षा परीक्षण - पुनाराम निकुरे, तळोधी बा. जि. चंद्रपूर