संताजी जगनाडे महाराजांनी दिली कर्तव्याची शिकवण उपदेशांवर समाजोत्थानाचे कार्य सुरू
नागपूर : संताजींचा विवाह बाराव्या वर्षी झाला. संसार करतानाही त्यांचे मन मात्र योग्य गुरूसाठी तळमळत होते. दोन अपत्य झाल्यावर एका कीर्तनाच्या निमित्ताने त्यांची संत तुकाराम महाराजांशी भेट झाली. संत तुकारामांचे ते शिष्य झाले. महाराजांच्या १४ टाळकर्यांमध्ये संताजी प्रमुख होते. संत तुकारामांच्या सहवासाने संताजी संसारापासून दूर झाले. धर्माच्या आधारावर वाढलेल्या कर्मकांडावर प्रहार करून त्यांनी समाजाचे अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन केले. तुकाराम महाराजांच्या सततच्या सहवासाने त्यांचे अभंग संताजींना मुखपाठ झाले. समाजकंटकांनी तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवून टाकल्यावर गुरूवर झालेल्या अन्यायाने ते व्यथित झाले. संताजींनी त्यावर उपाय शोधला आणि १३ दिवसांच्या आत तुकाराम महाराजांची गाथा जशीच्या तशी तयार करून महाराजांच्या हातात दिली. त्यांनी संत तुकारामांचा हा ठेवा दुष्टप्रवृत्ती, आक्रमणे यांच्यापासून सांभाळला म्हणूनच आज त्यांचे विचार आपल्यापर्यंंत पोहोचू शकले. संताजींनी संत तुकाराम महाराजांची गाथा, शंकर दीपिका, प्रकाशदीप, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निगरुणाच्या लावण्या, पाचरीचे अभंग, तैलसिंधू आदी अनेक ग्रंथांची रचना केली. इ.स. १६९९ साली त्यांनी सदुंबरे येथे ७५ वर्षांंचे सेवा कार्य पूर्ण करून त्यांनी भक्तांचा निरोप घेतला. त्यांच्या विचारांवर चालणारे अनेक लोक सातत्याने समाजाची सेवा करण्यासाठी पुढे आले. आजही अनेक युवा कार्यकर्ते संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजाच्या उत्थानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा परिचय करून घेताना संताजींच्या विचारांचीच आज नितांत गरज आहे.