वाचनिय अशीच संजय येरणे लिखीत कादंबरी. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने भरारी प्रकाशन नागभीड द्वारा नवखळा तह. नागभीड जि. चंद्रपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना संजय येरणे लिखित, शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणा-या संतसूर्य संताजीच्या पत्नी यमुनेच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीच्या अंतरंग लेखनाला अनुरूप असे सुविख्यात चित्रकार बंसी कोठेवार यांचं मुखपृष्ठ लाभलेलं असून मलपृष्टावरील सर्व कादंबरी विषयाचा मंथितार्थच प्रकट करतो आहे.
यमुना ही कादंबरी साकार करतांना कादंबरीकाराने आपल्या अथक परिश्रमाने निर्माण केलेलं हे एक सुंदर पुष्पच होय. यमुना संताजी जगनाडे महाराज यांची पत्नी, एक कर्तृत्ववान, स्त्रीमुक्ती चळवळीचा अंश असलेली स्त्री. सतराव्या शतकात होवून गेली. पण महाराष्ट्राच्या इतिहासात अंधारात दडलेलं पात्र प्रकाशात आणण्याचे महत्तम कार्य लेखकाच्या खडतर प्रयत्नातून साकार झालेलं आहे. ही कादंबरी पुढे येणा-या पिढ्यांना, वाचकरसिकांना मार्गदर्शक ठेवाच ठरणार आहे.
या कादंबरीची नायिका यमुना एक आदर्श मुलगी, गृहिणी, माता, समाजसेविका होती. या संबंधाचं रेखाटन करतांना अचूक प्रसंगरचनात्मक वर्णन, साधलेला साधर्म्य व्याख्यानजोगाच आहे.
संत शिरोमणी संत तुकारामासमवेत संत संताजी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, लुटशाही या विषयीचे प्रबोधन गावोगावी जावून आपल्या कीर्तनरूपी शस्त्रातून करीत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीला बळ देण्याचे कार्य करायचे. तेव्हा यमुनेला एकांगी जीवन कंटावे लागत असे. पण अशाही प्रसंगी न डगमगता, स्वदुःखाचे सावट दूर सारून शोषनशाही विरूद्ध ती धीरोदात्तपणे उभी राहते. गरजवंताना योग्य ती मदत करण्यास पुढे सरसावते. अशी कारूण्यमूर्ती यमुना उपलब्ध इतिहासापासून कासो दूर होती. ती कादंबरीकाराने आपल्या संशोधन वृत्तीने जगासमोर आणण्याचे धाडस केले ते कार्य अतुलनिय होय.
कादंबरी जीवनचरित्रासोबतच इतिहासाचीही चव चाखायला लावणारी आहे. यमुनेचं बालपण, तिचं वागणं, तिचं अख्खं जीवन हे कुणालाही ठावूक नव्हतंच. मात्र लेखकाची ती टिपण्याची शैली म्हणजेच आज महात्मा फुलेच्या सावित्रीला जेवढं स्थान निर्माण आहे, तेवढंच स्थान निर्माण करण्याचं कार्य इतिहासात डोकावून यमुनाप्रति केलेले आहे. आज संताजीची यमुना म्हणून नक्कीच पूजल्या जाणारं आहे. तेवढंच तीचं निर्माण केलेलं काल्पनिक तैलचित्रही आता अनेक कार्यक्रमप्रसंगी वापरल्या जाणारं आहे. यमुना ही इतिहासातील सामाजिक, वैचारिक या विषय आधारावर भक्क्म उभं राहणारं असं पात्र आहे. सत्य इतिहासाची खात्री पटवून देण्यास सहाय्यभूत ठरणारी, माणसाने जीवन जगत असतांना सामाजिक मूल्याचं भान ठेवावयास प्रवृत्त करणारी, वैचारिकतेच्या परिपाकाची जपणूक करण्यास भाग पाडणारी, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, एकात्मता, स्त्री-पुरूष समानता या नैतिक मुल्यांवर आधारित राष्ट्रजागृतीला प्रोत्साहित करणारी, सर्वाथाने सुंदर अशीच वाचनीय कादंबरी...।
यमुना एक जीवनरसायन, जीवनप्रणाली, वैज्ञानिक आचरण रीतच आहे. असे म्हणणे वावगे ठरेल. कुटुंबाला आपुलकीने सांभाळणारी, स्वतःचे दुःख हुंदक्याप्रमाणे गिळून दुःखीजनांना सदैव मदत करण्यास तत्पर असणारी, आपल्या पतीच्या परोपकारी कार्याचा मत्सर न करता उलट त्यांना बळ देणारी, पतीच्या परकार्याचा संस्कार मुलांवर होण्यासाठी सदैव धडपडणारी यमुना वाचकांचे हृदय हेलकावयास भाग पाडणारी आहे.
या कादंबरीची गुंफणही अतिशय सुरेख आहे. नवीन कल्पनात्मक प्रयोगातून साकार, उत्तम भाषाशैली, प्रसंगात्मक निवेदन, सुत्रबद्ध मांडणी, इतिहासाच्या दाखल्यातून अंगावर रोमांच निर्माण करीत उभे राहणारे प्रसंग व पात्र. वीर व करूणरसात न्हावून निघालेली ही अजरामर कलाकृती पिढयां न पिढयांना साथ देणारी अशीच आहे. यामुळे तर कादंबरी वाचकाच्या मनात ठाम रूतून बसते. एवढेच नव्हे तर तीचं स्थान देव्हा-यात घेवून जाते. नाट्यात्मक रूपात आकारास आलेली वाचकाची लय साधणारी अशी ही साहित्यकृती निश्चिंतच भारतीय समाजासाठी एक प्रेरणास्तोत्र म्हणून आदर्शमय ठरणार आहे.
लेखकाच्या जबरदस्त लेखणीला जय यमुना करतांनाच त्यांच्या पुढील साहित्यकृतीस भरघोष शुभेच्छा ! अंतरंगातुन
मनात एकच इच्छा होती... ही शोषणशाही... ही गुलामशाही नष्ट व्हावी. त्यासाठीचं हे जगणं होतं. खरेच या जगण्यातील क्षण नि क्षण कामी आलं. या जगण्याला माझाही तेवढाच हातभार लागला. यातच मन समाधानी आहे. योग जुळून येत रयतेला बळीराज्य प्राप्त झालं होतं. याशिवाय काय हवं आहे मला.. आता सुखानं इथं नाही तर तिथं, पांडुरंग... पांडुरंग.... कटेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, एकटक संताजी जगनाडे महाराजांच्या सावलीस निरखित राहिला... आणि गहिवरल्या आवाजात नातवंडाचं रडणं कापरं भरवीत राहिलं... यमुना एका कारूण्यमूर्तीचा सुपरिमल आसमंतात पसरत चाललेला.... कादंबरी - संताजी जगनाडे महाराजांची सावली
यमुना लेखक - संजय वि. येरणे. नागभीड, जि. चंद्रपूर,
- समीक्षा परीक्षण - मागणी संपर्क - 9404121098 पृष्ट 200, किमंत 200 रू.
पुनाराम वा. निकुरे तळोधी (बा.) जि. चंद्रपूर. मो. 9404121140