कोथरूड येथे सुरूवातीला श्री. संताजी जगनाडे महाराज तिळवण तेली समाज ट्रस्ट म्हणुन १९९३ मध्ये स्थापन करण्यात आला. या ट्रस्टची स्थापना होण्यापुर्वी सन १९९२ मध्ये तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ येथील निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी व श्री विजय भोज आम्हा दोघांना काही ट्रस्टींनी १९८६ ची मतदार यादी देऊन या भागातील समाजबांधवांना मतदनासाठी कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसारर मी आणि श्री. विजय भोज आम्ही दोघांनी मतदार यादीनुसार येथील प्रत्येक समाजबांधवाकडे जावुन मतदानासाठी कार्यालयात येणाचे आवाहन केले. परंतु मतदानासाठी आलेल्या समाजबांधवांनी कार्यालयात येऊन मतदार यादीत आपले नाव शोधले असतार एकाही समाजबांधवाचे नाव यादीत आढळले नाही. त्यावेळी तेथील काही ट्रस्टींकडून आम्हाला सांगण्यात आले की, आम्ही यावेळी मनपा हद्दीहबाहेरील समाजबांधवांची नावे वगळली आहेत. नदीच्या पलीकडील भाग महापालिकेत नाही. त्यामुळे फक्त महापालिका हद्दीहत जेवढे समाजबांधव आहेत तेच फक्त येथे सभासद आहेत. त्यामुळे येथील समाजबांधवांचा भ्रमनिरास झाला. त्यातूनच मग येथील समाजबांधव एकत्र येऊ लारगले घरगुती मीटिंग सुरू झाल्या. सर्वात प्रथम मीटिंग झाली श्री. नारायण शिंदे यांच्या निवासस्थानी. निमित्त होते किर्लोस्कर कंपनीतले पांडुरंग शिंदे या समाजबांधवाचा मुलगा सचिन शिंदे हा त्यावेळी दहावी बोर्डात महाराष्ट्रात १४ वा नंबराने उर्त्तीर्ण झाला होता. कंपनीत काही समाजबांधवांनी त्यांचा सतकार करण्याचे ठरविले. पण सत्कार कुठे करायचा ? त्यानुसार श्री. नारायण शिंदे यांनी सुचविले की, आपण माझ्या घरी हा सत्कार करूया. हे सर्वांनी मान्य करून सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी फक्त ७ सामाजबांधव एकत्र आले आणि त्या मुलाचा सत्कार केला. तेथेच समाज एकत्रीकरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मीटिंगनंतर सर्वांनी चर्चा केली, की आपण आणखी कंपनीत कितीजण आहेत हे पाहुया त्यानंतर किर्लोस्कर कंपनीत सर्व्हे करण्यात आला. कंपनीमध्ये एकूण १८ समाजबांधव असल्याचे समजले.
मग सर्वांनी विचार केला कंपनीमध्ये १८ समाजबांधव आहेत, तर मग कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी या परिसरात किती समाजबांधव असतील ? मग दर रविवारी सात-आठ समाजबांधव एकत्र येऊन भेटीगाठीचा कार्यक्रम घ्यायला सुरूवात केली. दुसर्या मीटिंगला माझी या समाजबांधवांशी भेट झाली. दुसरी मीटिंगमध्ये मी प्रथमच उपस्थित होतो. तेथे बर्यापैकी संख्या वाढली. तेव्हा सहकार खात्यातील अधिकारी श्री. हरिभाऊ जगनाडे हे उपस्थित होते. त्यांनी पुढील मीटिंग माझ्या निवासस्थानी घेण्याचे सांगितले पुढील रविवार त्यांच्या निवासस्थानी झाली. त्या मीटिंगमध्ये युनियन बँकेचे ब्रँच मॅनेजर श्री. माधवराव इप्ते हे उपस्थित होते. त्यांनी पुढील मीटिंग माझ्या निवासस्थानी घ्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर श्री. इप्ते यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. तेथे सुमारे ५० समाज बांधव एकत्र आले आणि यावेळी सर्वांनी विचार केला की जर तिळवण तेली समाज संस्थेने आपले सभासदत्व रद्द केले असे तर आपल्याला आपल्या भागातील समाजबांधवांसाठी आपल्या भागात सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्याला सर्वांनी एकमताने दुजोरा दिला. तेथेच खर्या अर्थाने हे रोपटे लावले गेले. या मीटिंगमध्ये ट्रस्ट रजिस्टर करण्याचे ठरले. त्यानंतर श्री. रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) यांच्या निवासस्थानी मीटिंग घेण्याचे ठरले. तेथील मीटिंगमध्ये श्री. रत्नपारखी अप्पांनी पूर्वी पायपीट करून जमविलेेली समाजबांधवांच्या पत्यांची डायरी त्यांनी आमच्या हवाली केली. आणि त्या डायरीच्या आधारे आम्ही प्रत्येक सामजबांधवाच्या घरी जाऊन भेटीगाठी सुरू केल्या. आणि ट्रस्ट रजिस्ट्रर केला. ट्रस्टचे प्रथम अध्यक्ष म्हणुन समाजातील सर्वांत ज्येष्ठ व्य्कती ज्यांनी पायपीट करून समाजबांधवाची यादी बनविली ते श्री. रामचंद्र (अप्पा) रत्नपारखी गुरुजी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यातुन सामाजिक उपक्रम राबविणे सुरू झाले. त्याला संपूूर्ण परिसरातील समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे पांठिंबा दिला. मग प्रथम कोजागिरी कार्यक्रम कोथिरूड येथील बागेमध्ये आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर सर्वांचा उत्साह वाढला. दर महिन्याला एक दिवस प्रत्येकाच्या घरी मीटिंग होऊ लागल्या. त्यानंतर श्रीक्षेत्र सुदूंबरे येथील श्री. संताजी महाराज पुण्यतिथी साठी २ बस ठरवून सर्व समाजबांधवांना श्री. संताजी महाराजांचे दर्शन घडवून आणले. ते आजपर्यंत विनाखंडीत सुरू आहे. समाजातील खरी गरज ओळखून वधू-वर मेळावा घेण्याचे ठरले. त्यानुसार २००७ मध्ये भव्य स्वरूपात वधू-वर मेळावा घेण्यात आला. त्यत सुमारे १२०० वधू-वरांची नोंदी झाली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातुन फक्त २० रूपये प्रवेश फी ठेवून एक वेगळा ठसा उमटविला. कालांतरांने या ट्रस्टचे रूपांतर श्री संताजी प्रतिष्ठानमध्ये झाले. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन समाजात मेळाव्याची खरच गरज ओळखुन पुन्हा मेळावा घेण्याचे ठरविले. समाजात मेळाव्याची गरज खरच आहे; परंतु सध्या मेळाव्याला कमर्शिअलपणा आल्यामुळे समाजातुन नाराजी आहे.
आम्ही कोथरूडमधील संघटनाच्या बळावर श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा २० मे २०१४ रोजी मेळावा घेतला तो संपुर्ण मोफत. कोणाशीही स्पर्धा केलेली नाही. आमचे पुस्तकही मोफत दिले. यातून आम्ही कोणाशीही स्पर्धा केलेली नाही. आमचे ब्रीदवाक्यच होते नाही कोणाशी हेवा दावा, आमचा उद्देश फक्त समाजसेवा यातुन आम्हाला आणखी स्फुर्ती मिळाली. जर मोफत मेळावा घेऊनही पैसे शिल्लक राहू शकतात तर मग इतर ठिकाणी इतकी अवास्तव फी कशी घेतली जाते ? असो, हा ज्या त्या संस्थांचा निर्णय आहे. त्याबाबत अधिक न बोलणे चांगले. पण भविष्यात या गोष्टी समाजहितासाठी अधिक पारदर्शक व्हाव्यात हीच इच्छा. समाजाला स्थानिक संस्थांकडून आणखी बर्याच अपेक्षा आहेत. परंतु यापुढे सर्व संस्थांनी समाजातील तळगळातील घटकांसाठी काही उपक्रम राबविणे अधिक गरजेचे आहे उदा. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी काही योजना राबविणे, समाजातील विधवा, परित्यक्ता अशा महिलांसाठी समाजातून मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे. तरी सर्व भागातील समाजसंस्थांनी जरा गांभीर्याने विचार करावा, ही विनंती.
श्री. दिलीप शिंदे, सेक्रेटरी