इ. स. १७७५ ते १७९० या कालावधीत महीपतीबाबा ताहराबादकर (कांबळे) यांनी भक्तिविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत आदी संतचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांनी एकूण २८४ संतांची चरित्रे लिहिलीत. त्यात तुकोबाराय व त्यांचे संतसांगाती संताजी जगनाडे यांच्या कार्याची प्रगल्भता सुंदर वर्णन केलेली आहे.
संतांच्या साहित्याविषयी व संतांविषयी मराठी माणसाच्या मनात अपार प्रेम आहे. केवळ प्रेमच नाही, तर आदरही आहे. श्रद्धा व प्रेम जतन केलेले आहे. संतचरित्र परमपवित्र असतात. कवी मोरोपंतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे आकलन केल्यास, सर्वसामान्य माणसाप्रमाणे जन्माला येऊन आयुष्याचे सार्थक करून घेतले जाते. संतचरित्र गाण केल्याने वाणीवर पावित्र्याचे संस्कार पडतात. वाचन व पारायण करावेसे वाटतात. त्यामुळे जीवनातील महत्त्व कळते व स्वत:च्या वाटचालीसाठी मार्गदर्शनही मिळते. संतांनी केलेले चमत्कार, त्यांच्या जीवनाचे वळण, लौकिक जगापेक्षा वेगळे असतात.
श्री संत जगनाडे महाराज हे जगद्गुरू तुकोबारायांचे शिष्य होते. तुकोबारायांची आपल्याला लाभलेली अभंगसंपदा हा मराठी भाषेवरचा संताजी महाराजांचा अनुग्रह आहे. सच्चिदानंद बाबा हे जसे ज्ञानोबामाउलीचे तसेच संताजी जगनाडे हे जगद्गुरू तुकोबारायांचे लेखकू होते. तुकोबारायांची उत्स्फूर्त प्रतिभा त्यांनी केवळ शब्दांकित व अनुवादितच केली नाही, तर तुकोबारायांची वाङ्मयीन अभंगसंपदाही टिकविली आहे. गेल्या तीन शतकांपासून मराठीभाषकांच्या अंत:करणात ती स्थिरपद करण्याचे काम श्री संत संताजी महाराजांच्या अनन्यसाधारण कळकळीतून झाले आहे. प्रपंच करता करता परमार्थ साधावा, ही वारकरी संप्रदायाची मूलभूत शिकवण संताजींनी पुरेपूर अंगीकारली व आपल्या तेलाच्या घाण्याची साथ न सोडता भक्तिमार्गात रंगले.
तुकोबारायांच्या काव्यलेखनाला झालेला प्रस्थापितांचा विरोध व त्यामुळे त्यांनी इंद्रायणीत अभंगांच्या गाथा बुडविल्या तो प्रसंग, यानंतरही गाथा पुनश्च लिहून काढून अत्यंत मोलाचे कार्य संताजींनी केले. हे त्यांचे अनमोल कार्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप टाकून जाते. एवढेच नाही, तर पुनश्च लिहिलेली गाथा जिवापाड सांभाळून व परकीयांच्या आक्रमणातून जिवाप्रमाणे सांभाळून जिवंत ठेवल्याने मोलाचा ठेवा जगाला दिसला. त्यामुळे तुकोबारायास आकाशाएवढे करण्याची मोलाची संधी संताजींना लाभली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
इतिहासात संताजी नसते, तर तुकाराम महाराजांचा अनमोल ठेवा पुनश्च लिहिला गेला नसता अन् तुकोबारायांची गाथा लोकांना कळलीच नसती! कारण तुकोबारायांचे लेखकू श्री संत संताजी जगनाडे होते. जे जे काही तुकोबाराय कीर्तनात सांगायचे, ते शब्दबद्ध करण्याचे काम संताजी करीत असत. प्रस्थापितांनी गाथा इंद्रायणीत बुडविल्यानंतर सतत १३ दिवस तुकोबारायांनी अन्नपाणी सोडले होते. ही अवस्था पाहून संताजी गहिवरले. त्यांनी निश्चय करून, त्यांना मुखोद्गत असलेले अभंग गावोगावी जाऊन, गोळा करून, पुन:श्च लिहून काढण्याचे कार्य जिवापाड कष्ट करून पार पाडले. ही पुनश्च लिहिलेली अमर गाथा त्यांनी तुकोबारायांस अर्पण केली. तुकोबांनी संताजींना मिठी मारली व आनंदाश्रू ढाळू लागले व म्हणाले की, ‘‘संतू! तू हा मोलाचा ठेवा अमरत्वाकडे पोहोचविला आहे.’’ केवढी ही महानता! केवढे हे आश्चर्य! हाच इतिहास आहे. तेली समाजातील या अनमोल व्यक्तिमत्त्वाच्या संतप्रभूने केलेले हे दिव्य आज जगासमोर अजरामर झाले आहे. संताजी महाराज भाग्यवान यासाठीही होते की, त्यांनी तुकोबाची ‘मज विश्वंभर बोलवितो,’ ही अवस्था प्रत्यक्ष पाहिली. ‘अंतरिचे भावे स्वभावे बाहेरी’ ही स्थितीही अनुभवली. ही अवस्था शब्दबद्ध व अक्षरबद्ध करण्याचे भाग्यही त्यांना लाभले. तुकोबारायांच्या सहवासामुळे त्यांना आध्यात्मिक प्रवास करता आला. त्यांच्या मागोमाग चालण्याचा त्यांना योग आला.
‘त्या चाकणी संत जगनाडे एक|
अन् तुकोबारायाचा शिष्य देख|
असा हा महापुरुष नेक|
उद्धारिया या जगा॥
(संत जगनाडे महाराज माहात्म्य
अध्याय १/२८ ओवी)
‘प्रिय संत थोर लेखनिक|
तेली संत जगनाडे एक|
अध्यात्मासाठी सांभाळूनि|
तुका केले जगी अमर॥
(संत जगनाडे महाराज माहात्म्य
अध्याय १/९६ ओवी)
संताजी जगनाडे महाराज यांचा तेल उत्पादनाचा व्यवसाय होता. कोणताही जन्मदत्त व्यवसाय हीन न मानता, त्याचेच ईश्वरीपूजेमध्ये रूपांतर करण्याची कला श्री ज्ञानोबामाउलीने अगोदरच शिकविलेली आहे. त्यामुळे बहुतेक संतांनी आपापल्या व्यवसायावर आध्यात्मिक रूपक केलेले आहे.
‘कांदा, मुळा, भाजी|
अवघी विठाई माझी|’’ (सावतामाळी)
‘जोहार मायबाप|
तुमच्या महाराचा मी महार|’ (चोखामेळा)
‘आम्ही बारिक|
करू हजामत|
करू हजामत बारीक|’ (सेनान्हावी)
‘देवा तुझा मी सोनार|
तुमचे नामाचा व्यवहार|’ (नरहरी सोनार)
तुकोबारायांनी भंडारदरा डोंगरावर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात संताजी जगनाडे महाराजांनी आध्यात्मिक विवेचन सुंदरतेने खालीलप्रमाणे केलेले आहे-
‘देह क्षेत्र जाणा ऐका त्याच्या खुणा|
गुदस्थान जाणा उखळ ते॥
स्वाधिष्ठानावरी मनपूर चक्र|
बिंदू खंत चक्र अनहूत॥
एकवीस धमनी खांब जो रोविला|
सुतार तो भला विश्वकर्मा॥
मनासी जुंपीले रेखांक दिले|
तेल दाता ओले सुरेमन॥
संतू म्हणे घाणा देहांत पहाना|
इतरांचे खुणा नको नको॥
सुलतानी आक्रमणातून झालेला विध्वंस व पुराच्या पाण्याचीही पर्वा न करता जिवापाड वाचविलेले महाराजांचे अभंग वाङ्मय, हेच संताजीचे जीवनसर्वस्व ठरले होते. त्यांच्या जीवितकार्याचे सार संक्षेपात सांगायचे झाल्यास- ‘तुकोबारायांच्या अभंगांचे लेखन व जिवापलीकडे जोपासना’ याच शब्दांत सांगता येईल. जणू तेवढ्याकरिताच ते जन्माला आले, जगले व कृतकार्य होऊनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्री क्षेत्र सुदुंबरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे समाधिस्थ झालेले श्री संताजी जगनाडे महाराज आज तेली समाजाचे श्रद्धास्थान आहेत. श्री तुकोबारायांच्या सहवासातील संतमेळाव्यात त्यांचे स्थान अनन्यसाधारण होते.
संताजींनी आपल्या गुरुनिष्ठेच्या बळावर असाधारण पारमार्थिक अधिकार प्राप्त केला होता, हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्व गुणांचा एक भाग होय. तसेच त्यांचे पारमार्थिक कार्यही अतुलनीय तथा असामान्य होते. त्यांचे चरित्र गुरुसेवकांना प्रेरणादायी, साधकांना मार्गदर्शक, विरक्तांना धैर्यवर्धक तथा संतसज्जनांना आल्हाददायक वाटणारे असेच आहे. संतचरित्र वर्णन करणार्यांवर नितान्त प्रेमाचा व कृपेचा वर्षाव होत असतो, असे भगवंत म्हणतात-
‘तेणेसी आम्हा मैत्र एथकायसे
विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे|
तेही प्राणा परौते आवडती
हे निरुते भक्तचरित्राते प्रशंसिती॥
(ज्ञानेश्वरी अ. १२ ओवी २६६/२७)
संतांचे अवतारकार्य हे ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
| देह कष्टविती परोपकारे |’ तद्वतच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी तेली जातीत जन्म घेऊन, प्रपंच करून व घाणा चालवून संतसंगती व परमार्थ साध्य करून एक महान आदर्श समाजापुढे ठेवला. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेला (पाचवा वेद) अमरत्व प्राप्त करून देण्याचे अमोलिक कार्यही संताजींनी केले. हे त्यांचे अनमोल व्यक्तिमत्त्व आज जगाला दिसून आलेले आहे.
- मधुकर सदाशिव वाघमारे