पाऊले चालती पंढरीची वाट

श्री. दिलीप फलटणकर

पंढरपुरच्या पांडुरंगाची मराठी माणसाला विलक्षण अशी ओढ आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी येतात त्याप्रमाणे मद्रास, बंगलोर, इंदौर या भागातूनही पंढरपूरला लोक श्रद्धेने येतात. मग तो माणूस गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षीत असो, नाहीतर अडाणी असो. सर्वांच्या मनात पांडुरंगाबद्दल उत्कट अशी भक्ती असते.

‘‘ जाईन ग माये तया पंढरपुरा
भेटेन माहेर आपुलिया’’

सासरी असणार्‍या मुलीला माहेराची जशी ओढ असते. त्या ओढीनं तळमळीनं आर्ततेनं..वारकरी पंढरपुरला येत असतात.

    मे महिन्यात ग्रीष्माच्या कडक उन्हानं भाजून, करपून टाकलेल्या जमिनीवर मृगाचा पाऊस सुरू होतो. पाऊस म्हणजे निसर्गाच चैतन्य.. पाऊस म्हणजे जीवन देणारा, जगण्याचं नव स्वप्न दाखवणारा या पावसानं महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आनंदाच उधाणं आलेलं असतं. पाऊस आला आता धरणी माता तृप्त होणार. आपलं शिवार फुलणार, नदी, नाले,ओढे ओसंडून वाहणार. मृगाचा पाऊस पडला की, शेतकरी पेरणीसाठी तयारी करतो. 

    रानारानात शेतकर्‍याची पेरणीची लगबग सुरू होते. शेतकरी हाताने पेरणी करीत असतात तरी डोक्यात त्याला वेध लागलेले असतात. ते पंढरपुरच्या वारीच्या देहूतून श्रीसंत तुकाराम महाराजांच्या किंवा आळंदीतून श्रीसंत ज्ञानेश्वरांच्या पालखीत त्याला सहभागी व्हायचं असतं. 

‘‘ सुंदर ते ध्यान उभे विठेवरी|
कर करावरी ठेवानिया॥

अशा सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं मनाला हुरहुर लागलेली असते. तो वारकरी खांद्यावर भगवी पताका घेतो आणि आवश्यक तेवढं साहित्य घेऊन वारीत सहभागी होतो. सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्‍या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी. म्हणून या पंढरपुरला महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि अध्यात्मिक विद्यापीठ म्हणतात. ते खरचं आहे. मी स्वत: साहित्याचेज्येष्ठ अभ्यासक डॅा. रामचंद्र देखणे यांच्यात दिंडीत सहभागी झालो आहे. डॉ. रामचंद्र देखणे संत साहित्याचे अभ्यासक आहेत पण कारेगांव सारख्या ग्रामीण भागातून आल्याने त्यांची ग्रामीण भागातील मूळ घट्ट आहेत. या वारीतील उर्जा व सकारात्मक भावना हे सगळचं विलक्षण आणि अलौकीक असतं. पंढरपुर माझे गाव आहे. महिन्यातून एकदा दोनदा तरी पंढरपूरला जातोच. पण वारीत सहभागी होऊन जातानाच आनंद काही वेगळा असतो.

आषाढी एकादशीला माझं पंढरपूर वेगळचं रूप घेत... नाचत... गात भजन करीत सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनाला आतूर झालेले असतात. चंद्रभागेत माणसांचा सागर उसळलेला असतो.पताका आकाशात फडकत असतात. चंद्रभागेत एकमेकाला आंघोळ घालत. एकमेकाची पाठीवर, तोंडावर, पाणी उडवत. आनंदाचा सोहळा चालू असतो.कुणीतरी अनोळखी वारकरी आपल्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून अंघोळ घालतो.  दहा पंधरा दिवसाचा सगळा थकवा नाहीसा होतो. चंद्रभागेच्या बाहेर आले की, अष्टगंध कपाळावर घेऊन कपाळावर स्वस्तिक काढणार्‍यात फुलांची गर्दी होते. कपाळावर दिवसभर ते देवचिन्ह फिरविण्यात एक आनंद असतो. मग वारकरी दर्शन रांगेकडे वळतात. तीस तीस तास दर्शनासाठी दर्शन रांगेत थांबणार्‍या भक्ताला जेव्हा पांडुरंगाच्या पायावर डोक टेकवायला मिळतो तो क्षण केवढाचा आनंदाचा सगळं शरीर, मन, बुद्धी, आत्मा पांडुरंगाच्या  दर्शनानं रोमांचित झालेलं असतं.    
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ झाकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळले
न वर्णवे तेथची शोभा॥

अशी त्या वारकर्‍याची अवस्था झालेली असते. माऊली..माऊली म्हणून तो आनंदाने पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवतो.. ही भेट हा दिंडीतील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. माऊली म्हणजे आई. आई म्हणजे प्रेम, वात्सल्य आणि करूणा याचं मूर्तिंत उदाहरण.. मला पांडुरंगाच दर्शन खूप आवडतं कारण त्या सावळ्या विठ्ठलाला भेटता येतं. इतर सर्व देवांचं दहा पंधरा फूट अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं पण पांडुरंगाच्या चरण स्पर्शात भेट घेतल्याच आणि समर्पणाची भावना असते.. त्याच्या पावलाच्या स्पर्शाची पातळी जगण्याला शक्ती देते. एरवीचा माझा गाव पंढरपूर आषाढी एकादशीला मला सापडत नाही. गल्लोगल्लीत टाळ मृदूंगाचा  गजर, विठ्ठलाचा नामघोष.. डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा गाठोडं डोक्यावर घेऊन फिरणार्‍या माता भगिनी, घरातल्या लोकांनी.. दारात उदबत्ती, हळदी कुंक़ू, खेळणी, फुले, लाह्या, बुक्का, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या पितळेची भांडी यांची दुकाने लावलेली असतात. घरात वर्‍हाडातून, कोकणातून, खानदेशातून आलेल्या वारकर्‍यांची ये जा चालू असते.कुणी भजन म्हणतं, कोणी ज्ञानेश्वरी वाचत असतं. कोणी हरिपाठ म्हणत असतं. 

माझ्या घरी मलाच ते वारकरी विचारतात. ‘‘माऊली कुणाला भेटायचयं.’’ इतकं ते माझं घर त्यांच झालेल असतं. 

वारीकरी या शब्दापासून ‘वारकरी’ शब्द झालेला असावा. वारी म्हणजे येरझारा. पण वारीबरोबर पंढरपूरला येण्यानं आयुष्यभर पुरून त्यानंतरही उरेल इतका आनंद दिलाय. पहाटे ४ वाजता उठून नदी, तलाव, विहिरीवर अंघोळ करायची. झुंज मुंंज झालं की, ‘‘ज्ञानोबा, माऊली, तुकाराम’’ असा गजर करीत दिंडीत सहभागी व्हायचं. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध, खांद्यावर भगवी पताका घेऊन उन्हातान्हांची, वार्‍या पावसाची पर्वा न करता ‘‘ज्ञानोबा, माऊली तुकारा’’’ असा अखंड गजर करीत चालत असतात. उन्, वारा, पाऊस, तहान भुक कशाकशाची आठवण नसते. वारीत चालतअसताना त्याच्या चेहर्‍यावर शांतता, आनंद आणि स’ाधान ओसंडून वाहत असतो. 

दिंडीची एक शिस्त असते. बाजूलाझेंडेकरी, मधोमध टाळकरी, पाठीमागे वीणेकरी, पाठीमागे महिला..असं दिंडीचे एक व्यवस्थापन शास्त्र असतं म्हणून लाखो लोक एकत्र येऊन शिस्तबद्धपणे, लयतालाचा सुर पकडत पण श्रद्धेनं दिंडी जात असते. भूक लागली सगळे गोल करून एकत्र बसणार. मिळेल तिथं पाणी पिणार. नांगरलेल्या ढेकळाच्या शेतात, रस्त्यावर, झाडाखाली विश्रांती घेणार, एवढ्या गडबडीत पण शांतपणे झोप घेणारे.. केवढे भाग्यवान... येणार्‍या अडचणींची किरकिर नाही. पोटाला मिळालं तर मिळालं. नाही मिळालं तरी तक्रार नाही. पंढरपुरच्या पांडुरंगावर विश्वास, श्रद्धा, भक्ती ठेवून वारकरी पुढे निघणार.. तोंडाने ‘माऊली... माऊली’ चा गजर चालू असतो. इथं प्रत्येक वारकरी प्रत्येक वारकर्‍याला पांडुरंगाच्या रूपात पाहत असतो.

    स्त्री असो नाही तर पुरूष. प्रत्येकजण ‘‘माऊली’’, प्रत्येकजण एकमेंकाच्या पाया पडत असतात. वारीतएकात्मतेचं, मानवतेचं आणि सामाजिक समतेचं दर्शन होतं. रोजसूर्य मावळला की, कुठेतरी शाळेत, पालावर दिंडी विसावते.. दिवसभर झालेल्या गोष्टीची, गप्पांची मैफील जमते. दिवेलागणीला हरिपाठ होतो. टाळ-मृदूंगाचा गजर होत भजन, कीर्तन सुरू होतं.संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची दिंडी म्हणजे विद्वान, सुशिक्षित मंडळीची दिंडी. डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ. अशी इतर वेळी आपआपल्या क्षेत्रात यशस्वी असलेली मंडळी.सहभागी झालेली असतात. रात्री त्याचं प्रवचन होतं. अनेक नामवंत किर्तनकार लोकांना मी ऐकलं आहे. केशवराव बडगे आणि अवधूत गांधी यांच्या स्वरांची मैफिल अनुभवली. रात्री अंथरूणाला पाठ ठेवली की, गाढ झोप लागणार.. पहाटे चार वाजता.. पुन्हा हा दिनक्रम सुरू. या वारीत एक महत्त्वाचं काय होत असेल तर ‘‘मी पणा’’ संपतो. अहंकार नाहीसा होतो. आपल्यातल्या सामान्यत्वाची ओळख होते.वारी अहंकार विसरायला शिकवते. रोज सुटा बुटात टाय लावून फिरणार्‍या एका नामवंत डॅाक्टरला शर्ट पायजमा घालून तिथं पोत्यावर बसून दाढी करून घेताना पाहिलं आणि एका नामवंत कॅालेजच्या प्राचार्यांना स्वत:चे कपडे स्वत: धुवून वाळत टाकताना मी पाहिलं आहे. परमार्थ साधनेचे अनेक मार्ग आहेत. जप-तप-नामस्मरण, यज्ञ, याग पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकविणारी ही वारी..हा एकजीव असा हा अनुभव आहें. त्यात द्वेषाच बंधन नसतं आणि द्वेषाची भावनाही नसते. त्याचं अस्तित्वही नसतं. मुळातवारकरी ’नानं सर्वांतून मुक्त झालेला असतो. वारकरी संध्याकाळी मोबाइलवर गावाकडची हालहवाल विचारतो. सुखदु:खाची देवाण-घेवाण करतो. प्रपंच नेटकेपणाने चाललाय याची खात्री करतो आणि परत पांडुरंगाचं बोट धरूनच परमार्थाच्या मार्गाला लागतो. ‘हे विश्वचि  माझे घर ही भावना येथे दृढ झालेली असते.

    वारीतीलरिंगण हा एक रोमांचकारी अनुभव असतो... संसाराच्या ... माया मोहाच्या रिंगणातून बाहेर पडून माणूस ’ नानं मुक्त होतो... तो इथचं
    दरवर्षी आषाढी यात्रेला आठ-दहा लाख वारकरी येतात. प्रत्येकाला पांडुरंगाचे दर्शन होतेच असं नाही. आषाढी वारीत एवढी गर्दी असते की, अनेक वारकरी पांडुरंगाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन किंवा ताकपीठे विठोबा मंदिरातील विठोबाचं दर्शन घ्याव लागतं. खर तरं या लाखो वारकर्‍यांना कोणी निमंत्रण पाठविलेले नसतं किंवा परिपत्रक काढलेलं नसतं की वारीचा तुम्हाला जाण्यायेण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊ असं कोणीही सांगितलेलं नसतं तरी मोठ्या भक्ती भावाने वारकरी पंढरपूरला येत असतात. या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे त्यांचं काही मागणेही नसतं.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन विठोबाचे॥

आषाढी यात्रेमध्ये प्रत्यक्ष देवळात जाऊन पांडुंरंगाचं दर्शन घेता येत नाही तरी पण पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतले तरी चेहर्‍यावर शांती, तृप्ती, समाधान आणि सुख पसरलेलं असतं. कारण त्यांच्या संसारात या पंढरपूरच्या अबिर बुक्क्याचा सुगंध पसरलेला असतो. त्यांची पांडुरंगावरची श्रद्धाचं इतकी प्रबळ असते की संत ना’देव ’हाराज म्हणतात, तसं त्यांचं जगणं सुखाचं असतं. 

आकल्प आयुष्य व्हावे, तया कुळा|
माझिया सकळा | हरिच्या दासा ॥
कल्पनेची बाधा, न हो कोणे काळी|
ही संत मंडळी सुखी असो॥
अहंकाराचा वारा, न लागो राजसा |
माझिया विष्णुदासा, भाविकासी॥
नामा म्हणजे तया, असावें कल्याण |
ज्या मुखी निधान, पांडुरंग ॥

    पंढरपूरच्या वारीला येऊन समाधान मिळणे आणि आनंदाची अनुभूती मिळणे हेच परमार्थाचे प्रयोजन आहे. एवढं मात्र खरं आहे.

*******

दिनांक 11-07-2015 22:00:44
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in