नगरच्या तेल्याची पालखी

          आई तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा परंपरा या जगावेगळ्या असून त्यात सर्वसमावेशकता आहे. अहमदनगरजवळील बुर्‍हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर म्हटले जात असल्याने त्याठिकाणचा जानकोजी तेली हा तिच्या पित्यासमान मानून माहेरवासिनीचा सन्मान म्हणून सीमोल्लंघनासाठी तुळजाभवानीची मूळ मूर्तीची मिरवणूक ही याच तेल्याच्या पालखीतून काढली जाते. हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आल्याची माहिती पालखीचे मानकरी अॅड. अभिषेक विजयराव भगत यांनी सविस्तरपणे कथन केली. विशेष म्हणजे ही परंपरा चालविणारे ते ३० वे वंशज आहेत. 

          तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवाची सांगता ही देवीच्या सीमोल्लंघनाने होत असते. तुळजापूरच्या सीमोल्लंघटनाचे वैशिष्ट्य म्हणजे तुळजाभवानीची मूळ मुर्ती काढून ती पालखीत ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. तुळजापूरपासून अहमदनगर २५० किलोमीटर अंतर असूनही शेकडो वर्षांपासून ती पालखी आणण्याचा मान नगरजवळील बुर्‍हाणनगरमधील जानकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. बुर्‍हाणनगरमध्ये तुळजाभवानीचे भव्य मंदिर असून, त्या ठिकाणी तुळजापूरप्रमाणे सर्व उत्सव साजरे केले जातात. तेल्याच्या घरी लहान मुलीचे रूप घेऊन देवी गेल्यानंतर जो तेलाचा घाणा चालविला तोही तेथे दाखविला जातो. इ. स. १९१३ साली के लहानू किसन भगत यांनी ५२ बाय १०० फुट असा भव्य मंडप असणारे तुळजाभवानाच एक सुंदर मंदिर त्या ठिकाणी उभे केले आहे. ५ एकर परिसरात मंदिर असून, त्याकाळी मुंबईहून मूर्ती बनवून आणण्यासाठी वाहतुकीच्या पैशासाठी लागणारे ६५ रुपयेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते हे आवर्जुन नमुद करण्यासारखे आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ देवीची पूजा करतात. मंदिराची सेवा करण्याचा मान परंपरेने थोरल्या मुलाकडे देण्याची परंपरा भगत घराण्याने जपलेली आहे. बुर्‍हाणनगरच्या देवीचे तुळजाभवानीशी साधर्म्य असल्याने नवरात्रात त्या ठिकाणी लाखो भाविक गर्दी करत असतात.

         परंतु बुर्‍हाणनगरच्या या भगतांना ओढ लागलेली असते तुळजाभवानीच्या सीमोल्लंघनाची ! कुठल्याही देवस्थानच्या परंपरेत नसेल परंतु तुळजाभवानीची पालखी दरवर्षी नवीन बनविली जाते. पालखीची तयारी आवण प्रतिपदेलाच सुरुवात होते. यादिवशी भगत सागवान ३ घनफुट आणि १ घटफूट बोरीचे लाकूड घेवून ते राहुरीतील पवार नामक कै उमाकांत सुतार घराण्याकडे देतात. यावेळी लाकडाच्या कतईचे काम धनगर समाजातील भांड घराण्याकडे तर खिळपट्टीचे काम रनशिंगनामक लोहार घराणे करते. त्यानंतर पालखी तयार झाल्यानंतर ती राहुरीतील तुळजाभवानी मंदिरामध्ये ठेवण्यात येते. याचे पुजारीपण धोत्रे नामक तेली करतात. अहिल्याबाईंचे एक सेवक सरदार घोगरेंनी सुरुवातीला हिंगणगावात तयार होणारी पालखी राहुरीमध्ये आणल्याचे सांगितले जाते. भाद्रपद पौणिमेला ही पालखी बुर्‍हाणनगरच्या दिशेने रवाना होते. यावेळी नदी पार करुन देण्याचा मान येथील कोळ्यांना आहे. तर ढोरचांभार समाजाकडे मशाल धरण्याचा मान आहे.

         राहुरीमधून वाजतगाजत पालखी देसवंडी, पिंपरी अवघड, वडगांव, भाळवणी, ढवळपुरी, टाकळी, ढोकेश्वर, जामगांव, शहाजापूर, टाकळी खातगांव, हिंगणगांवरुन दुसर्‍या माळेला बुर्‍हाणनगर परिसरामध्ये दाखल होते. त्याचवेळी घोडेगावचा पलंग तेथे आलेला असतो. बुर्‍हाणनगरच्या बाजुला भिंगारमध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये एकमेकाला स्पर्श करुन पालखी आणि पलंगाचा ऐतिहासिक भेटीचा सोहळा संपन्न होतो. त्यानंतर त्याच ठिकाणा हुुन पलंग तुळजापूरच्या दिशेने रवाना होतो. तर पालखी बुर्‍हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात जाते. तिसर्‍या माळेला दुपारी बारा वाजता पालखी प्रदक्षिणेचा सोहळा मोठा देखणा असतो. यावेळी बुर्‍हाणनगर, कापुरवाडी आणि वादळवाडी येथील गावकरी मिरवणुकीचे मानकरी असतात, विशेष म्हणजे पालखीच्या पुढच्या बाजुला दलित समाजाला खांदा देण्याचा मान आहे. तर मागच्या बाजुला सवर्णाचे लोक खाँदा देतात, त्यानंतर सायंकाळच्या वेळी पालखी तुळजापूरकडे रवाना होते.

          पूर्वी पलंग-पालखी एकाच मार्गाने येत असत. तेव्हा पालखी आगळगांव-गोरमाळ याठिकाणी आली असता त्याकाळी नदीला फार मोठा पूर आला होता. तेव्हा तेथील लोकांनी मोठी मेहनत करुन पालखी नदीपार केली. याची उतराई म्हणून तुळजाभवानीच्या दरबारात ज्यावेळी पालखी मिरवली जाते त्यावेळी पालखीला खांदा देण्याचा मान नगरकरांनी या दोन गावांना दिलेला आहे. तुळजापूरमध्ये शुक्रवार पेठेत जानकोजीच्या समाधीपासून पालखीच्या मिरवणुकीला सुरूवात होते. त्यानंतर बाजार कट्ट्याजवळील पारंपरिक पालखीच्या कट्ट्यावर पालखी टेकविली जाते. त्यानंतर पालखी आणि पलंगाची एकत्रितपणे मिरवणूक निघून दसर्‍याच्या दिवशी पहाटे मंदिरात दाखल होतात. सुर्योदयाच्यावेळी तुळजाभवानीची मूळ मूर्ती पालखीत ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. यावेळी भाकरी आणि पेंडीच्या भाजीचा नैवेद्य दाखवितात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीतून देवींना मंदिरात नेल्यानंतर वरचा दांडा काढून घेवून उर्वीरित पालखी मोडून होमात जाळून टाकली जाते. त्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने बुर्‍हाणनगरच्या भगताचा भरपेहराव देवून सत्कार करण्यात येतो. अशारितीने शेकडो वर्षांची परंपरा जपत बुर्‍हाणनगरचे भगत घराणे निःशुल्कपणे पालखीची सेवा देत आहेत. पालखी ही वैभवाचे प्रतिक असून आई तुळजाभवानी आपल्या पालखीत विराजमान होतात हेच भगतांचे वैभव म्हणावे लागेल.

tuljapur bhawani mata temple tradition palkhi from Teli in Ahmednagar

दिनांक 11-07-2019 12:54:22
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in