- जन्मांतरीचे दोष गेले दग्ध होऊन -
शेंदुर्णी, जळगाव जिल्हयातल्या जामनेर तालुक्यातील एक पुराणप्रसिध्द व महाविष्णू भगवान त्रिविक्रम महाराजांच्या भक्तीचे केंद्र, भक्तीमय वातावरणातली टुमदार नगरी. परिसरातील चौर्याऐंशी गावांचे माथा झुकवणीचे श्रध्दास्थान. प्राचीन परंपरांची पुण्यदान नगरी. स्वर्गीय देवांच्या आशीर्वादाने सदाचार्यांचे वसतिस्थान.
या गावाच्या कीर्तीत आणि कार्यात भर पडली, ती कडू तेल्याच्या वास्तव्याने.
कडू तेली. साध्या, देवभोळया, कष्टकरी शेतकर्याच्या पोटी जन्मलेले. मुरडाजीबाबा हेच ते शेतकरी. निढळाच्या घामाच्या थेंबाथेंबांनी मुरबाड जमीन शिंपडल्यावर जेमतेम अर्ध्या-चातकार भाकरीची ज्वारी देणारं त्यांचं शेत. बेभरोसे पाऊस. कधी पडला कधी कोरडा. बर्याच हंगामात घामाचं शिंपणही कमी पडायचं. शेतातल्या उभ्या ज्वारीच्या पिकाचा कडबा व्हायचा. पोटाचा खड्डा मोठा व्हायचा. तो बुजवण्यासाठी दुसर्याच्या शेतात मजुरीनं राबणं हाच पर्याय असायचा.
गरीबीच्या संसारात कोंडयाचे मांडे करणारी सुगरण बनून, नाटूबाई आपल्या गाड्यामडक्यांचा संसार घासून पुसून टापटिपीने करण्याचा प्रयत्न करायची. मुरडाजीबाब आणि नाटूबाई यांचा शेती, मोलमजुरी व कष्ट करता करता अर्धा संसार व्हायला आला होता. त्यांच्या अडीच तपांच्या संसारात वीस वेळा घरातल्या झोक्याच्या झोळीत पोटची अपत्ये खेळवण्याचं भाग्य त्या दोघांना लाभलं, पण अति दुःखाची परिसीमा म्हणून झोळीतली बाळं रांगण्या आधीच मातीत पुरावी लागली. खंडीभर पुत्र-कन्यकांची माता नाटूबाई शेवटी निपुत्रिक, एकाकी कुढत कुथत दिवस कंठत होती. मुरडाजीबाबांची अवस्था तर भावनाविरहीत, बधीरचामडयाचं शरीर धारण केलेल्या निर्जीव बाहुल्यासारखी झाली होती. देह संसारात आणि चित्त मुरडेश्वरात असा त्यांचा दिनकम सुरू होता.
शेंदुर्णीपासून चौदा कोस अंतरावर औरंगाबाद जिल्हयात धावडे हे गाव आहे. हेच मुरडाजीबाबांचं गाव. त्यांचे वडिल मुरडेश्वराचे उपासक होते. त्यांनी मुरडेश्वराच्या कृपेने झालेल्या मुलाचे मुरडाजी असेच नाव ठेवले होते. त्याच मुरडाजीबाबांचा कुलक्षय होण्याची चिन्हे दिसायला लागली होती. स्वत:च्या रक्त-मासांचे वीस संतान त्यांना स्वहस्ते धरणीला अर्पण करावी लागली होती.
दोघेही जीवनाच्या उदासीन, नशीबाला बोल लावत, आला दिवस ढकलत होते. निरीच्छ, अलिप्तवृत्तीने संसार करणारी माणसं देवध्यानाकडे आपोआप वळतात. घराण्यात मरडेश्वराची पूजा होतच होती. त्यातही मुरडाजीबाबा आताशा एकांतप्रिय झाले होते. प्रपंचात फारसे लक्ष नाही. कुणाशी स्वत:हून बोलणे नाही. कुणी काही विचारलं तर हो-नाही असं जेवढयास तेवढे उत्तर द्यावं.
मात्र चालता बोलता, काम करतांना सतत भगवान शंकराचं नामस्मरण करावं, भजने, अभंग गुणगुणत राहावं. देवळात सकाळ संध्याकाळच्या पूजाअर्चेसाठी मनोभावे हजर राहावे. देवाजवळ काही माण्याची अपेक्षा राहिली नव्हती. निष्काम भक्तीची तीव्रता वाढत होती...
आपोआप पडत असली, तरी बेलाच्या झाडाखाली असलेल्या पिंडीवर त्रिदलपत्रे अपर्ण झाल्याने शंकर महादेवाची सेवा त्या झाडाला घडतच असते.
काहीही मागणे नसलं तरी, नित्य प्रेमभक्तीने महादेवाची अहोरात्र आळवणी करणार्या मुरडाजीबाबांची मनोकामना महादेवाला नक्की माहीत होती.
नाटूबाईना एकवीसावा अपत्यप्रसाद प्राप्त होण्याची चिन्हं दिसायला लागली होती. काळजात साठवलेल्या महादेवनिनादभक्तीने केलेली शंकराची आराधना या जोडप्याची इच्छापूर्ती करणार होती. शके 1636, वर्ष इ.स.1714, या भाग्यवर्षात नाटूबाईंना मुलगा झाला.
महादेवाचा प्रसाद म्हणून शंकर नाव ठेवावं, असं एकदा दोघांच्या मनात आलं पण वीस वेळच्या अशुभानुभवांच्या जखमा भळभळायला लागल्या. संतानांना दिलेली शुभसात्विक नावं उच्चारणं आपल्या नशिबी नाही, या टोचणीने शंकर ऐवजी कडू असं बाळाचं संबोधन निश्चीत करण्यात आलं.
एकविसाव्यांदा झालेल्या बाळमुख दर्शनानं मुरडाजीबाबांची जीवनतृप्ती वाढली. जन्मसार्थकाचा अनुभव यायला लागला. महादेवाचे दृढ सान्निध्य त्यांना हवे हवेसे वाटायला लागले. देवओढीचे रूपांतर चीरसहवासात बदलायला लागले. जीवनतृप्तीने त्यांचा चेहरा समाधानी दिसायला लागला.
आणि..... आणि एक दिवस .....?
श्री भगवानशंकराचा निकटवास हेच आपले चीरशांतीचे ठिकाण असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. कालपर्यंत निस्तेज, निर्माल्यवत, निराश दिसणारी झाडं झुडपं, कडूच्या जन्मानंतर आज तेजस्वी, टवटवीत व नवी उर्जाप्राप्तीने सळसळत असलेली त्यांना दिसू लागली. पुत्रजन्माने त्यांना आकाश गवसल्याचा आनंद झाला होता. वंशाला दिवा मिळालेला होता. तोही साधासुधा नसून पाणीदार, तीक्ष्ण नजरेचा व सात्विक चेहर्याचा होता. टक लावून पाहावे पण नजरेची तृप्ती होऊ नये, असं दैविक तेज त्या कडू बाळाच्या चेहर्यात होतं.
बाळाची आकलन क्षमता जबरदस्त होती. श्रवण आणि निरीक्षणासाठी लक्ष केंद्रित न करताही बाळ अनेक गुंतागुंतीच्या बाबीही सहज शिकत होता. नवीन बाबी आत्मसात करतांना स्थीरदृष्टीने लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकताच वाटत नसल्याने, बाळाची नजर चंचल आणि वेडसर वाटायची पण तो अति तीक्ष्ण आणि तरल बुध्दिचा होता.
धावडे गावातील परिसरातील आयाबाया या पाणीदार नजरेच्या व उत्साही चेहर्याच्या बाळाला पाहण्यासाठी नाटूबाईच्या घरी येऊ लागल्या. प्रसन्न, सात्विक चोहर्याच्या बाळाला पाहाताच त्यांनाही बाळकृष्णाचे दर्शन झाल्याचा आनंद व्हायला लागला.
एक अनोळखी व्यक्ती, कुटूंबातीलच एक असल्यासारखी सराईत नजरेने घरात शिरली. मुरडाजीबाबा आणि नाटूबाईंना आधी नवल वाटलं पण लागलीच ...., मागील वीस अपत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. अशुभाच्या भितीने नाटूबाईंनी त्या व्यक्तीला हटकलं. घराच्याबाहेर जाण्यास सांगितलं. पण ती व्यक्ती जागची हलेना. मी बाळाचं दर्शन घेण्यासाठी आलोय, दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही, अशा ठाम निर्धाराने बाळ निजलेल्या झोळीकडे आतूरतेने पाहायला लागला. शेवटी मुरडाजीबाबा त्याच्याजवळ आले. बाळाला दगाफटका करायचा प्रयत्न झाल्यास त्या अभ्यागताला ठोसे लगावण्याच्या तयारीत त्याच्याजवळ थांबले. नाटूबाईंनी झोळीतल्या बाळाला छातीशी लावत त्याच्याजवळ आणलं. क्षणभर ...?!
बाळाची आणि नवागताची नजरानजर झाली. बाळाची मुद्रा प्रसन्न झाली. चेहरा खुलला. बाळ खुदकन हसला. आणि .... आणि .... आलेल्या अतिथीने आपल्याला उचलून घ्यावे, म्हणून त्याच्याकडे झेपावला. पाहुण्याने कौतुकाने बाळाचा गाल चिमटीत धरला. सोज्वळ प्रेमाने त्याच्या कपोलाला चापटी मारल्यासारखा स्पर्श केला, आणि .... आणि .... आल्या पावली निघून गेला. तो कोणत्या दिशेला जातोय हे पाहाण्यासाठी मुरडाजीबाबा त्याच्या मागोमाग ओटीवर आले. डावी - उजवीकडचा रस्ता न्याहाळला पण त्या दार्शनिकाचा मागमूस मिळाला नाही. दर्शनच्छुकाच्या रूपात प्रत्यक्ष मुरडेश्वरानंच बाळाला दर्शन दिलं, असंच मुरडाजीबाबांना वाटायला लागलं.
प्रत्यक्ष महादेव बाळाची काळजी घेत आहे,अशी खात्री झाल्यावर मुरडाजीबाबांचा परमेश्वर ध्यास अधिकच वाढला.आता ते सतत मुरडेश्वराच्या पायाशी देवळातच राहू लागले. भजन,पूजन,नामस्मरण व ध्यान धारणा हाच त्यांचा निक्रम झाला. क्वचित कधीतरी घरी येत. कडूला कडेवर घेऊन हिंडवत.नाटूबाईंची विचारपूस करत आणि परत देवळात निघून जात. मुरडेश्वराला भक्तांनी वाहिलेले बेलपत्रे,हार फुलांचे निर्माल्य जमा करून नेहमीच्या उकिरडयावर टाकतांना एके दिवशी आपलं शरीरच निर्माल्यवत झाल्याचं त्यांना वाटलं. आपला देहही देवाच्या सेवेतून काढून घ्यावा, असा त्यांनी निर्धार केला. याच विचारात ते घरी आले. कडूला उचलून जवळ घेतलं. अडीच तीन वर्षांचा कडू त्यांच्या मांडीवर बसून उर्ध्वदृष्टीने बापाकडे पाहू लागला. मुरडाजी त्याला म्हणाले, बाळ कडू, मी आता देवाला भेटायला जाणार आहे. तू मोठा हो. देवाची सेवा कर. आईला सांभाळ. लोकांच्या अडचणी दूर कर.फहे म्हणत असतांनाच त्यांनी नजरेनेच नाटूबाईंचा निरोप घेतला, तोच त्यांचे चेतनाहीन शरीर खाली कोसळले. तीन वर्षांच्या वयातच कडूचं पितृछत्र गेले. नाटूबाईही पोरकी झाली. गावात दळणकांडण, मोलमजुरी करून ती कडूला जगवण्याचा प्रयत्न करत होती. पण भावी जीवनातील कडूचं कर्तृत्व लक्षात घेऊन नियतीनं त्याला शेंदुर्णीला पाचारण करायचं ठरवलं. नाटूबाईची एक पुतणी, कडूची चुलतबहीण शेंदुर्णी येथे राहात होती. ती खाऊन पिऊन सुखी व दोनपैसे बाळगून होती. ती नाटूबाईला शेंदुर्णीला घेऊन गेली.
इतिहास आणि पुराणकाळापासून शेंदुर्णी ही प्राचीन नगरी होती. पेशव्यांच्या मराठी मुलुखात असलेल्या शेंदुर्णीला लागूनच निजामाची हद्द होती. त्यामुळे पंचक्रोशीत प्रसिध्द असलेल्या शेंदुणीच्या बाजारपेठेचे व व्यापार व्यवहाराचे सरंक्षण करण्यासाठी पेशव्यांना खास बंदोबस्त ठेवावा लागे. निजामाच्या काळात मोगलांनी अनेक वेळा ही बाजारपेठ लुटण्याचा प्रयत्न केला, पण भगवान त्रिविक्रमांची कृपादृष्टी शेंदुर्णीवर असल्याने परकीय शत्रूला त्यात यश आले नाही, अशी लोकांची समजूत आहे.
इंद्रासुरानंतर सिंदुरासूर या राक्षसाचे येथे काही दिवस वास्तव्य होते म्हणून या नगरीला शेंदुर्णी नाव पडल्याचेही लोक सांगतात. मोहम्मद बीन कासीमने भारतात चौदाशे पीरांच्या मदार आणल्या. सारा भारत इस्लाममय करण्याचा त्याचा हेतू होता. त्यापैकी ममरहूम पैगंबरवासी सैय्यद मिराशी मियाँफ यांची मदार त्याने शेंदुर्णी येथे स्थापन केली होती. (ती अजूनही आहे.) श्रीमंत पेशव्यांचे गुरू नारायण महाराज दीक्षीत पाटणकर यांना पेशव्यांनी दिलेल्या चोवीस गावांच्या जहागिरीत या शेंदुर्णी नगरीचा समावेश होता. पाटण येथील पटणेश्वरी भगवती जगदंबेच्या सान्निध्यात राहून तिचा अनुग्रह प्राप्त झालेले, श्रीकृष्णदास महाराज गोसावी व त्यांचे वंशजही त्याकाळी शेंदुर्णी येथेच राहात होते.
अशा व्यवहार, भावना व कार्याच्या दृष्टीने प्रसिध्द असलेल्या शेंदुर्णी नगरीत तिचा वारसापुढे चालवील असा समर्थ पुरूष नसल्यानेच नियतीने कडूला शेंदुर्णी येथे आणून तिचे नेतृत्व बहाल केले होते. ते नेतृत्व बळकट करण्यासाठी कडूला शिक्षण देण्याचीही व्यवस्था केली होती.
सात वर्षांचा होताच नाटूबाईनी कडूला पंतोजिंच्या शाळेत घातलं. मूळचा एकपाठी, हुशार कडू, धडेच्या धडे पाठ म्हणत असे. एकदा ऐकलेली कविता त्याची लगेच पाठ होत असे. रात्री गावात भजन, कीर्तन, प्रवचन, पोथीवाचन, ग्रंथपारायण असल्यास कडू तेथे मोठया आवडीने जात असे.
त्याची बुध्दी आणि संभाषणातील आत्मविश्वास व धीटपणा पाहून गावातील राजाराम गणेश देशपांडे नावाच्या एका व्युत्पन्न, विद्वान ब्राम्हणाने कडूला संस्कृतातील स्तोत्र आणि पुराणकथा शिकवल्या. नियतीच्या नियोजनांप्रमाणेच या शास्त्री महाराजांना कडूला शिकवण्याची बुध्दी झाली असावी.
शिकत असतांनाच कडू पोहणं आणि कुस्ती खेळण्यातही तरबेज झाला होता.
आता कडू शरीर-बुध्दिने परिपक्व तरूण दिसायला लागला होता. भगवान त्रिविक्रमाचा व श्री विठ्ठलाचा भक्त म्हणूनही लोक त्याला ओळखायला लागले होते. अडीअडचणीला उपयोगी पडणारा, एक संवेदनशील कार्यकर्ता व वडिलधार्यांचा सेवेकरी म्हणूनही तो परिचीत व्हायला लागला होता. विठ्ठलाच्याठायी असलेली त्याची जाज्वल्य भक्ती पाहून शेंदुर्णीचे लोक दिपून जात.
शेंदुर्णीची अनेक कामं मार्गी लावतांनाच कडूने पहिल्यांदा शेंदुर्णी म्हणजे श्रीविठ्ठलाची प्रतिपंढरपूर करण्याचा ध्यास घेतला. सदाचरणी लोकांचं, भक्तांचं त्याला भरभरून सहकार्य मिळायला लागलं. कडूला आता लोक भक्त कडोबा महाराज म्हणायला लागले. कडोबांनी पंढरपूराप्रमाणेच शेंदुर्णीला मंदिर बांधण्यासाठी आजुबाजुच्या चौर्याऐंशी गावांतील भक्तांना हाक दिली. पैसा जमू लागला. श्रमदानासाठी गावोगावचे तरूण पुढे आले. कडोबांनी - देवी रूख्मिणी माता, श्री विठोबा, गोपाळकृष्णांची देवडी, त्रिविक्रम महाराजांचा जामदारखाना (देववाडा), श्री मारूती, भक्त रोहिदास, देवघराची चौकट व पायाभूत काम, महाद्वार, श्री त्रिविक्रम महाराजांचा रथ, श्री राधामंदिर, धर्मशाळा, श्रीदेवाचा सभामंडप, संत चोखोबा देवालय - अशा पवित्र वास्तू उभारल्या. तसेच शेंदुर्णीतील - नदीकाठची देवालये, विहीरीसमोरचे मंदिर मिनार, दोन मठ, दोन चबुतरे, श्री नामदेव महाराजांचे मंदिर, भक्त पुंडलिकाचे मंदिर, श्री गोरक्षनाथ मंदिर, गोमुख-ओवर्या - कुंड, भगवान शंकराचे मंदिर, संत कबिराची मस्जिद, श्री राहीचे मंदिर, श्री शनिमहाराजांचे मंदिर, दीपस्तंभ, पाचमहादेवाच्या पिंडी, श्रीगणपतीचे मंदिर, दगडावरील मूर्ती, पालखी, तीर्थक्षेत्र रुद्रेश्वर येथील मंदिर - ही श्रध्दास्थानेही त्यांनी उभारून पंढरपूरला जाण्याऐवजी सर्व भक्तांची शेंदुर्णी येथेच सोय व्हावी अशी व्यवस्था केली.
समाजावरची निष्ठा, सहकार्याचा नेम व पतितांबद्दलची तळमळ या देवदयेने प्राप्त झालेल्या जन्मजात गुणांनी कडोबा महाराजांनी अनेक कुटुंबांना उजेडात आणलं. श्री विठ्ठलावरच्या प्रगाढ श्रध्देचा उपयोग करून सर्व उपाय संपलेल्या गरजूंना अंतीम क्षणी चमत्कार करून जीवनानंद मिळवून दिला असल्याने, मंदिरात न राहाणारा मानवातला देव म्हणूनच तत्कालीन समाज कडोबा महाराजांना मान देत होता. इतका की महाराजांचे शके सतराशे एक्केचाळीस, प्रमाथी संवत्सर, कार्तिक शु. पौर्णिमा, मंगळवारी पहाटे दोन प्रहर उलटल्यावर महानिर्वाण झाले, तरीही ते आपल्यातच आहेत, अशी लोकांची दृढ भावना होती.
भक्तांनी त्यांची समाधी बांधली. समाधीच्या एक मैल परिघात त्यांच्या नावाने यात्रा सुरु केली. या घटनेलाही 80 वर्षे होऊन गेली, तरी कडोबा महाराज आजही त्यांच्या भक्तांच्या हाकेला धावून येतात ही लोकांची तीव्र श्रध्दा 1898 साली कायम असल्याचे एका प्रसंगाने दिसून आले.
इ.स.1898 च्या कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेला पंधरा दिवस असतांनाच शेंदुर्णीच्या आसपासच्या गावात रोगाची साथ सुरू झाली. ती अधिक पसरू नये म्हणून इंग्रज अमदानीच्या कलेक्टरने यात्रा बंदिचा हुकूम जारी केला. कडोबा महाराजांच्या भक्तांना जबरदस्त धक्का बसला. देवतुल्य कडोबा महाराजांची यात्रा बंद होणं हे त्यांच्या भक्तांना मानवलं नाही. दिवसा लपत छपत व रात्री उघडपणे त्यांनी यात्रेची तयारी सुरू केली. इंग्रज कलेक्टरला याची कुणकुण लागल्यावर त्याने गावोगावी दवंडया देऊन यात्राबंदीचा हुकूम मोडणारास कठोर शिक्षेचे फमान काढले. हुकूमाप्रमाणे, मामलेदार, देशमुख, देशपांडे, तलाठी, पोलीस पाटील व इंग्रजधार्जिण काही ग्रामस्थ कामाला लागले. यात्रेची छुपी तयारी करणारांना चौकात चाबकांच्या फटकार्याचा शिक्षा सुनावली जाऊ लागली. डी.एस.पी., फौजदार, कारकून शिरस्ते यांनी शेंदुणीला तंबू ठाकून बंदोबस्त वाढवला. रस्त्यारस्त्यात बंदुकधारी शिपाई गस्त घालू लागले. सरकारच्या दहशतीमुळ अनेक भक्त घाबरले. कडोबा महाराजांचं दर्शनच न होणं, यामुळे अनेक भक्त अस्वस्थ झाले. दर्शन घेण्यासाठी काय करावे, उपाय सापडेना.
आणि .... आणि .... एक चमत्कार झाला. स्वत: कडोबा महाराजांनीच कलेक्टरला शरण यायला लावलं.
झालं असं. बंदी हुकूम जारी झाल्यावर दोन तीन दिवसांनी महाराजांच्या समाधीच्या पोटातून पहिल्यांदा धूर आणि नंतर जाळ दिसायला लागला. गावोगावी वार्यावर बातमी पोहोचली. चमत्कार बघायला लोक गर्दी करू लागले. पण हातात शस्त्रधारी शिपाई त्यांना समाधीचं दर्शन घेऊ देईनात. लोक अगतिकतेने तडफडत होते.
दुसर्या चमत्काराची बातमी आली.
बंदी हुकूम काढणार्या कलेक्टरचं पोट दुखायला लागलं. पोटशूळ वाढत वाढत असहय वेदना व्हायला लागल्याने तो जमिनीवर गडबडा लोळायला लागला. हिम्मत करून कुणीतरी फौजदाराला सांगितलं, साहेब, यात्राबंदी हा फैलावलेल्या साथीच्या रोगावरचा उपाय नाही. उलट कडोबा महाराजांच्या समाधीपुढे रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी साकडं घालणं हा उपाय करायला हवा होता. आताही कलेक्टर साहेबांनी समाधीचं दर्शन घेऊन क्षमा मागावी व यात्राबंदीचा हुकूमही त्वरीत मागे घ्यावा, म्हणजे त्यांच्यावर आलेलं पोटदुखीच संकट दूर होईल.
पहिल्याने समाधीचं दर्शन घेण्यास नकार देणार्या कलेक्टरचं पोटशूळ वाढतच गेल्याने त्याने नाईलाजाने फौजदाराचा सल्ला मानला. दर्शन घेऊन त्याने कडोबा महाराजांची क्षमा मागितली. समाधी समोरच यात्राबंदीचा हुकूम रद्द केल्याचे आदेश जारी केले. त्याची पोटदुखी आणि समाधीचे दर्शन घेण्याची भक्तांची चिंताही मिटली.
जन्मांतरीचे दोष गेले दग्ध होऊन । नारायण शरण म्हणोनिया
असा अनुभव कडोबामहाराजांचे भक्त आजही घेत आहेत.
ह. भ. प. शांताराम महाराज भगत कडोजी महाराज संस्थान शेंदुर्णी गादी वारस वहिवाटदार आठवे मो 8329530047.9975341454
संदर्भ - संत कडोबा महाराज, ले. रा. सी. चौधरी सुखलाल नथू चौधरी खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड.