( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
मार्गदर्शन मिळाले माहिती मिळाली आता यापुढे काय ? हा प्रश्न उत्तर न देता रोज सतावत होता. अशीच एक वेळ सुदुंबरे येथे कार्यकारिणीचा उत्सव कसा साजरा करावा या विषयी नेहमीप्रमाणे मीटिंग होती. ही बातमी समजताच राऊत इंदोरीहून सुदुंबर्यास गेले. मागील अनुभव जमेस असल्याने त्यांनी पालखीचा विषय या मिटींगमध्ये उपस्थित काही केला नाही. कार्यक्रमाचा आराखडा तयार झाला. मीटिंग संपली. समाधीचे दर्शन घेऊन मंडळी पुन्हा परतु लागली. राऊत ही जाण्यासाठी एस.टीत बसले जवळ एक जागा मोकळी होती. ती खाली गर्दीत असलेल्या आपल्या मेहुण्यांना ठेवली. ते धोंडिराम चौथे हे वर आलेे. राऊतांच्या जवळ बसले बरेच दिवसांनी पाहुणे भेटले. दोघात इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात राऊत पालखीविषयी बोलून गेले.
''संताजी महाराजांची पालखी निघणे काळाची गरज आहे.'' राऊत.
'' बरे झाले विषय निघाला ते. ते पुढच्या सीटवर बसलेले - लेंगा, शर्ट घातलेली उंच व्यक्ती आहे ना, त्यांना ओळखता ?''
''त्यांना अनेक वळा पाहिले आहे. पण कोण ते ओळखत नाही.'' राऊत
'' ते कस्तुरे चौकातले रत्नाकर त्रिंबक भगत. माणूस हाडाचा कार्यकर्ता. तळमळ दांडगी. ते सुद्धा पालखी सोहळ्याचा विचार करतात. अनेकांना बोलले पण अनेकांचे एकच उत्तर. बघु, करू पाहु. तुम्ही कामाला लागला. ते सध्या असा माणूस शोधत आहेत की जो या पालखीसाठी काही झाले तरी खंबीर साथ देईल.''
'' संताजीनेच योग घडविला.''
'' आपण असे करा. आपले जे मत आहे ते त्यांना सांगा. यावर दोघे चर्चा विनिमय करा. आणि यातून योग्य तो मार्ग निर्माण करा.''
याच गाडीत दादा भगतांची व धोंडिबा राऊतांची भेट झाली. एस.टी. सुरू झाली. सुरू झालेल्या एस.टीत हे बोलत बसणे बरेही नव्हते आणि दुसरे म्हणजे इंदोरी जवळ जवळ येत होती. पण दादांना धोंडिबा व धोंडिबांना दादा मिळाले. दोघांनाही आनंद झाला. त्या एका गोष्टीचा ध्यास दोघांनी घेतला होता. ते दोघेही अपरिचित असल्याने वेगवेगळ्या मार्गाने एकटेच धडपडत चालले होते. दादा भगत म्हणाले, ''राऊत आपली ओळख झाली हा फार मोठा योगायोग. हा माझा कस्तुरे चौकातील पत्ता. तेथे आल्यावर कोणालाही विचारा दादा भगत म्हणून. कोणीही घर दाखवील.''
'' मी अवश्यक भेट घेईन. पण माझी नोकरी ही अशी. रविवारीच सुट्टी.''
''रविवार तर रविवारी पण जरूर भेटा. यावर सखोल चर्चा करू.''
राऊतांनी इंदोरीस गेल्यावर चारपाच ठिकाणी चौकशी केली. दादा भगत हे कसे आहेत. आपला जोडीदार कसा आहे हे त्यांचे मत. पण त्यांनी ज्यांना ज्यांना विचारले त्यांचे एकच मत. दादा हे एक सुखी संपन्न व्यक्तिमत्व. जे मनास पटेल ते करणारे. एकवेळ काम घेतले तर त्यात कितीही संकटे येवोत मागे सरकणार नाहीत. मग प्रसंगी खिशातील चार पैसे गेले तरी मागे पुढे पहाणार नाहीत. घेतला वसा सोडणार नाहीत. जोडीदाराला वार्यावर सोडून स्वत: लपणार नाहीत. प्रसंगी त्याला पाठीशाी घालून घेणारे संकट झेलतील. त्यात या माणसाच्या ओळखी फार. नात्यागोत्याचे संबंध थोरामोठ्यात. तेव्हा त्यांचा उपयोग झाला तर पालखीही सुरू होईलच. राऊतांना फार मोठा आधार झाला.