( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
एका रविवारी ते लोकलने पुण्याला गेले. शिवाजीनगर ते कस्तुरेचौक हा तीन चार किलोमीटरचा प्रवास पायी केला. चौकात पानट्टीच्या दुकानात चौकशी केली. समोरच दादा भगताचा वाडा. वाड्याचा मोठा दरवाजा. तो बंद होता. पण दिंडीदरवाजा उघडा होता. वाकुन आत गेले. समोर चौक. चौकातल्या पायर्या चढून ते दारात गेले. खुर्चीवर एक वयस्कर आज्जी होत्या त्यांना विचारले ‘‘दादा भगत इथेच रहातात?’’
’’मी इंदोरीचा धोंडीबा राऊत’’ घरातून पाणी व चहा आला ’’दादांना भेटावयाचे होते त्यांनी बोलवले म्हणुन आलो आहे.’’
’’ते सकाळी घरातील एका कामाकरीता बाहेर गेलेत संध्याकाळी सात पर्यंत येणार नाहीत ’’
’’इंदोरीचे राऊत आले होते. पुढच्या रविवारी या वेळेस येतील.’’
आल्या पावली राऊत गेले ठीक आहे. परत येऊ इतके दिवस धडपडलो त्यांचे फळ जवळ आले. एकंदरीत माणूस निष्ठावान मिळाला घरातील आईसुद्धा भक्ती संप्रदायातील. या माणसाची या पुर्वी भेट झाली असती तर पालखी यापूर्वीच सुरू झाली असती. दुसर्या रविवारी पुन्हा राऊत दादांच्याकडे गेले. दादा घरात नव्हते राऊत निराश झाले. मी येणार हे सांगूनसुद्धा ते थांबले नाहीत याचे दु:ख मनात साचले. या रविवारी राऊत येतो. कोठे जाऊ नका. असा निरोप ठेवून ते गेले. सांगितल्याप्रमाणे पुन्हा रविवारी राऊत हजर. दादा घरातील व काही सामाजिक कामासाठी बाहेर गेलेले. हे १९८० साल. याच वर्षी पालखी काढायची असे परवा एस.टीत त्यांना बोललेलो. दिवस तर असे भराभरा जात चाललेत. आणि मी हेलपाटे किती घालू ! मी येणार हे सांगूनसुद्धा ते भेटत नाहीत, या सर्व गोष्टींचा राऊतांना राग आला. दादांच्या सौभाग्यवती व मातोश्री समोर उभ्या होत्या.
‘‘ मी कोणी श्रीमंत नाही. इंदोरी ते पुणे हेलपाटे घालण्यास. त्यांनी सांगितले म्हणुन इथपर्यंत तीन वेळा आलो. मी येणार हे माहीत असुनसुद्धा भेट घेत नाहीत.‘‘
‘‘ त्यांना तसे महत्त्वाचे काम निघाले‘‘
‘‘ पण त्यापेक्षा हे काम महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ जवळ येत आहे. आणि पालखीची तयारी केव्हा करणार ? त्यांना जमणार नसेल तर मला हेलपाटे तरी कशााला द्यावयाचे ?‘‘
राऊत उंबर्याच्या आत ठेवलेल्या आपल्या चपला पायात अडकवून तावातावाने चालू लागले. खाली रस्ता तापलेला. वरून सुर्य पोळतो आहे. मनात अग्नी पेटेलेला. हा आधार वाटला तोही तुटला. आता कोण भेटणार हा विचार डोक्यात थैमान घालत होता. ते शिवाजीनगर रेल्वे स्थानक जवळ करीत होते. तर इकडे दादा घरी आले. सकाळी कपभर चहा घेऊन दुसर्यांची कामे करण्यास वणवण भटकत होते. पोटात अन्नही नव्हते. दोन वाजुन गेले होते. त्यांना हा निरोप मिळाला. घरातील सायकल घेतली. पायडल मारत ते निघाले. शिवाजी नगरच्या शिवाजी पुतळ्याजवळ त्यांना राऊत भेटले. दादांनी त्यांना अडविले. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दादांचा आग्रह घरी चला. आपण यावर चर्चा करू दोघेही कस्तुरे चौकात आले. दादांनी सायकल लावली बैठकीच्या खोलीत बसले.