( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
दोघांनीही संताजी महाराजांची शपथ घेतली. व पुढच्या मार्गाला लागले. पालखीसाठी सहकार्य समाज बांधव किती करतील, यासाठी कोणा कोणाची कशी मदत घ्यावी. या विषयी प्रथम समाज मनाचा कनोसा घ्यावा त्यासाठी समाजाच्या कार्यालयात एक मीटिंग घ्यावी. त्यासाठी दादांनी लोकांना कळवावे. यानंतर सकाळ पेपरमध्ये पालखीसंबंधी जाहिरात द्यावी. सकाळमध्ये जाहिरात घेऊन दादांनी समाजाची बैठक बोलविली. त्या दिवशी त्या बैठकीला समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित तीस एक लोक हजर होते. यात लष्करमधील सर्वश्री प्रधान, ताराबाई सुपेकर, अंबादास शिंदे, व्यवहारे बाबा, रामचंद्र शेजवळ, तळेगाव दाभाडे येथील बाळासोा बारमुख आणि इतर मंडळी हजर होती.
या वेळी राऊत व दादा भगत यांनी पालखी माऊलींच्या मागे कशी घेऊन जावी व आणावी याबाबत सविस्तर कथन केले. याबाबत ज्या समस्या आहेत त्या मांडल्या. मग समस्या चर्चेतुन शंका वाढू लागल्या. त्या सर्व समस्यांना राऊत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. उलट सर्वांनी पालखी काढून हसे कसे होईल. हाच सुर लावला होता. दादा नाराज झाले. राऊत नाराज होतेच पण दादा भगतांवर राग होता. ते रागातच दादांना म्हणाले, ‘‘समाजाची बैठक घेऊ. त्यांचा अंदाज घेऊ. मगच पालखी सोहळ्याची जाहिरात पेपरमध्ये देऊ. ही तुमची चूक झाली. एवढे बोलेपर्यंत बैठक संपत आली होती राऊत इंदोरीला जाण्यासाठी बाहेर पडू लागले. ते दादांना म्हणाले, पालखीबाबत तुम्ही माझे सहकार्य मागू नये. मीही याबाबत आपले कोणतेच सहकार्य मागणार नाही.‘‘ एवढे म्हणुन राऊत शिवाजीनगर स्टेशनवर आले. आभाळ चांगलेच भरू लागले होते. रात्रीचे दीड वाजले होते. पावसाचे मोठमोठे थेंब पडत होते. तेवढ्यात लोकल आली. लोकल घोरावडी स्टेशनला जेव्हा येऊन पोहोचली तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. येऊन घोरावाडीला लोकल थांबली. राऊतांसह चार-पाच जण उतरले. लोकल गेली. मागे राहिला पाऊस व घनघोर अंधार. त्या अंधारात, त्या पावसात राऊत एकटे इंदोरीकडे निघाले. डोक्यात विचारांचे काहूर. पावले कुठे कशी पडत होती याचे भानच नव्हते.