( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
ज्येष्ठ वद्य अष्टमी या दिवशी आजपर्यंत कष्टाची, त्यागाची, विचाराची गंगा वाहणार होती. त्या दिवशीच्या रात्रीच हे दोघे सुदुंबर्यात हजर झाले. सकाळी सकाळी आजूबाजूचे बरेच ग्रामस्थ व समाज बांधव हजर झाले होते. प्रस्थानाची वेळ जवळ आली पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मामलेदार पाठकसाहेब हजर झाले होते. जमलेल्या लोकांना ही पालखी सुरू होणार याचा आनंद झाला होता, जो तो हीच कुजबूज करीत होता. मा. पाठकसाहेबांनी प्रस्थानाचे उद्घाटन केले. राऊत व दादा लोकांच्या समोर उभे राहिले . जमलेल्या समुदायाला विनंती करू लागले. आता उद्घाटन झाले आहे. थोड्या वेळात पालखी निघेल. ज्यांना ज्यांना पालखीबरोबर यावयाचे आहे त्यांनी सांगावे. या आव्हानाला कोणाचीच साथ नाही. समूहाचे परिवर्तन करण्याचा बराच प्रयत्न केला पण उत्तर नाही हेच आले. या संकटाची कल्पना होती. पण इतका शून्य प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. ह. भ.प. हैबत बाबांनी जेव्हा माउलीची पालखी सुरू केली तेव्हा त्या सोबत किती माणसे होती ? असाच उदासीनपणा होता. पण आज साधी जाहिरातही न करता लाखो माणसांचा समुद्र गोळा होत आसतो. हा त्रास होणारच यावर मात करणे गरजेचे आहे. राऊत पुढे झाले, पाठकसाहेबांचे दर्शन घेेतले. मी प्रतिज्ञा करतो की, ‘‘ही पालखी पंढरपूरला नेणार व तशीच घेऊन येणार.‘‘
‘‘ तुम्ही एकटेच हे कसे काय करणार ?‘‘
मी एकटा नाही. माझी पत्नी आहे. विणा, टाळ घेऊन जाऊ. झालेच तर बोलल्याप्रमाणेे दादा भगत आहेतच आम्ही या गोष्टीपासून दूर जाणार नाही. राऊतांच्या पत्नी सौ. वनारसीबाई यांनी राम वनवासात जाताना सीतीने जसे पुढे यावे तशा त्या आल्या दादांनी स्पष्ट सांगितले बोलल्याप्रमाणे मला जे जे म्हणून शक्य आहे तेे ते सर्व सहकार्य केले आहे. माझा पाय दुखरा आहे. त्यामुळे मला पायी चालता येणार नाही, तेव्हा दुसरा उपाय पाहिला पाहिजे.
‘‘ दुसरा उपाय आहे, तुम्ही रथात बसा आणि दर्शन घेणार्या लोकांना अबीर व बुक्का लावत रहा.‘‘
हे तिघे चौघे ही पालखी कशी नेणार हा सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. मावळचे आमदारही त्या समूहात होते. त्यांना हा वेगळा सूर तसा सहन झाला नाही. ते उभे राहिले व म्हणाले, तुम्ही या प्रस्थान सोहळ्यास हजर झालात याबद्दल आभार. पालखीबरोबर जाण्यास तुमची मानसिक तयारी नाही. इंदोरीचे पोष्टमन धोंडिबा राऊत हे जिद्दीने पालखी नेत आहेत. त्यांना मी चांगले ओळखतो. ते बोलले तसे वागतील यात मला तरी संशय नाही. प्रत्येक संताजी महाराजांच्या उत्सवाला या ठिकाणी येतात. त्यांना मी पाहिले आहे. त्यांची तळमळ पाहिली आहे.
एक लोकनीयुक्त एक जबाबदार घटक जेव्हा विश्वासाने बोलतो हे ऐकल्यावर लोकांचा विश्वास दृढ झाला. श्री. व सौ. राऊत व दाद यांनी पालखीला हात दिला. पालखी मंदिराबाहेर काढली. ज्ञानोबा - तुकोबाचा व संताजींचा जयजयकार झाला. पालखी सुदूंबरे गावात गेली. गावातलेे पांडुरंगाचे मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या दरर्शनाला ठेवली. आयाबायांनी, नातीसुनांनी, तात्याकाकांनी, पोराबाळांनी या आगळ्यावेगळ्या व नवख्या सोहळ्याचे दर्शन घेतले. गावातले राणू भागूजी गाडे या दिलदार व वजनदार गृहस्थाने जेवण दिले. पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.