नागपूर पासून पश्चिमेस चौदा मैलावर व्याहाड हे गांव वसलेले आहे. नागपूरहन अमरावतीस जाणार मोटारच्या सडकेवर हे गांव आहे. येथे एक जुना किल्ला असून गावाजवळून वेणा ही पवित्र नदी वाहते. व्याहाड येथे फार पूर्वीपासून 'टापरे' या आडनावाचे एक तेली घराणे होते. या घराण्यात अठराव्या शतकात भिकाजी बुवा हे सत्पुरुष होऊन गेले. यांना लोक 'बुवा' या नावानेच संबोधित.
दमडाजी हे भिकाजीबुवाचे चिरंजीव. दमडाजीच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. त्यांना सावत्र आई होती. तिचे नांव सीताबाई, नवल असे की सीताबाईचे दमडाजीवर विशेष प्रेम होते. कुटुंब अगदी गरीब परिस्थितीतले असल्यामुळे दमडाजींना लहानपणी गुरे चारणे, घाणा हाकणे इ. कामे करावी लागली व त्यामुळे शाळेच्या शिक्षणाशी त्यांचा संबंध आला नाही.
ईश्वरभक्तीची प्रेरणा लहानपणापासूनच झाली असल्यामुळे ते सदासर्वकाळ त्यात तल्लीन असत. त्यांच्या भजनामुळे त्यांची कीर्ती पसरु लागली. सामान्य ज्ञातीतील पुरुषाचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे काही गुंडांनी डाव आरंभला. पण परमेश्वर ज्याच्या पाठीशी आहे त्याचा छळ करुन कोणास काय लाभणार ? उलट छळ करणाऱ्याचाच नाश मात्र ठरलेला असतो.
महाराजांनी व्याहाड येथे विठ्ठल रखुमाईचे भव्य मंदिर बांधले. १९१२ साली या देवळात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. ज्यादिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून बरोबर एक वर्षाने महाराजांनी आपला देह ठेवला. त्यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी बांधलेली आहे.
व्याहाड येथे दशाहर, दसरा, रामजन्म अशा तीन वेळी नवरात्र होतात. दर एकादशीस येथे अनेक लोक दर्शनास येतात. मुख्य यात्रा पूर्वी आषाढीस भरत असे आता ती रामनवमीस भरते.
श्री. घन:श्याम रेवतकर संकलन - चंद्रकांत तेली, कणकवली