श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
श्री. अंबादास व काशिनाथ पलंगे यांच्या घराण्यात पूर्वापार एैतिहासिक काळा पासून श्री. तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा मान मिळत आलेला आहे.
कुलस्वामिनी तुळजापुरची भवानी माता ही उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवत. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य दैवत. श्री. छत्रपतीना भवानी मातेने आशिर्वाद देवुन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची आज्ञा केली व हिंद धर्माचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करविली. त्या मातेच्या पलंगाचा तुळजापुर मुक्कामी नेवून सेवा करण्याचा मान नगरच्या श्री. पलंगे (भगत) ह्या घराण्यास मिळाला आहे. श्री. पलंगे हे आपल्या तिळवण तेली समाजाचे असल्यामुळे आपण सर्व तेली बांधवास त्यांचे बद्दल सार्थ अभिमान वाटणे सहाजिकच आहे. त्यांच्या या सेवेबद्दल थोडक्यात माहिती अशी.
उधे ग अंबे उधे -
तुळजामातेचा पलंगे तुळजापूर मुक्कामी नेण्याची परंपरा ही एैतिहासिक काळा पासुन नगरच्या पलंगे घराण्यांत चालत आलेलो आहे. श्री. पलंगे यांच्या पूर्वजापासून ही परंपरा चालू आहे. मु. घोडेगांव जिल्हा पुणे या ठिकाणी हा पलंग विशिष्ठ लाकडापासून तयार केला जातो. हे पलंगाचे काम ठराविक कलेने कारागिरच करतात. पुर्वी पासुन ते आज तागायत एकाच घराण्यातील कारागिर हे काम करीत आले आहेत. सध्या श्री. पंढरीनाथ बळवंत ठाकूर व श्री. प्रभाकर बाबूराव ठाकूर हे पलंगाचे घडणाचे व जोडणीचे काम करतात श्रावणी पोळ्याचे दिवसापर्यंत मातेचा पलंग पुर्ण तयार होतो. ऋषी पंचमीला घोडेगांव जिल्हा पुणे येथुन निघुन जुन्नर मुक्कामी येतो. जुन्नर येथे दहा दिवस पलंग तिळवण तेली समाजाच्या वाड्यात ठेवला जातो. तेथे सर्व तेली बांधव त्याची स्थापना करतात. त्यात नवी गादी छत वगैेरे बांधणी केली जाते दहा दिवस पुजा अर्चा केली जाते. देवीची भजने व किर्तन केली जातात.
भाद्रपदी पौणिमेला पलंग जागेवरून उठुन जुन्नर येथील तिळवण तेली समाजाच्या प्रत्येक बांधवाच्या घरासमोर जावुन नैवद्य व पुजा केली जाते व पलंग पुढील मार्ग आक्रमु लागतो. या वेळी श्री. पलंगे हे जातीने पलंगा बरोबर पदयात्रा करतात. तेनि कुमशद या गावी पलंग येतो तेथे पलंगाची यात्रा होवुन भक्तगण मोठा उत्सव करून भंडारा घालतात. दुसर्या दिवशी पलंगे तेथून हलून पुढील गावी हे पायीच नेला जातो पुढे नारायणगांव आले, राजुरी, आळकुटी, वडझिरे, पारनेंर, कान्हुर, किन्ही, गोरगाव, खांदगांव टाकळी, भुतकरवाडी, मालेगांव, असा चालत घट स्थापनेला श्री. पलंगे यांचे नगर शहरातील भक्तगणाच्या घरासमोर मिरवत जावुन श्री. कवठेकर (शेलार) यांचे घरी मंडई येथे मुक्कामास राहतो. तिसर्या माळेस मु. भिंगार येथे तुळजाभवानीची पालखी व पलंग यांची भेट होवून भक्तगण पुजा अर्चा करतात.
पुढे पलंग रात्रदिवस पायी प्रवास करून चिंचोडी, आठवड, पिंपाळा, लोणी, फंडी, कुंटेफळ, वाघलुज, धानोरा, कडा, जामखेड, खर्डा भुम, आमळगांव, दगडधानोरी, घारापुढी, झोररबोटे ते तुळजापुर मुक्कामी आश्वनी शुद्ध नवमीस पोहोचतो. ह्या पलंगाचे वैशिष्टय म्हणजे दसर्याच्या दिवशी पहाटे सिमोनलंघन झाल्यावर जगदंबामाता ह्याच पलंगावर पौर्णिमे पर्यंत पाच दिवस विश्रांती घेत. पौर्णिमेला भवानी माता सिंहासनावर विराजमान होते. नंतर श्री पलंगे व अहमदनगर मधील इतर तेली समाज बांधव मातेच्या पलंगाची मिरवणुक काढतात व त्यांची ते परंपरे नुसार होमा मध्ये आहुती देतात. कोजागिरी पौणिमा (पलंगी पौणिमा) ह्या दिवशी हा कार्यक्रम होता. ह्या दिवशी हा कार्यक्रम होता. ह्या होमासाठी सर्व महाराष्ट्रातुन अंदाजे दोन ते तीन लाख यात्रीक जमा होतात. व ‘उदे ग अंबे उदे’ असा जयघोष करीत होमात आहुती टाकली जाते.
ह्या पलंगासाठी लागणारा खर्च, तसेच इतर आणलेले भोई बांधव व इतर सर्व खर्च तसेच तुळजापुरला समाज बांधवासाठी भंडारा घालणे हा सर्व खर्च श्री. पलंगे स्वत: करतात. दिवसेनदिवस वाढत चालेल्या माहागाईमुळे हा सर्व खर्च डोईजड होत चालला आहे. परंतु घराण्यात चालत आलेली प्रथा व देवी मातेची आपल्या हातुन होत असलेली सेवा ह्या श्रद्धेतुन ही प्रथा भाक्तीपुर्वक चालु ठेवीत आहेत.
आज नगर मधील तेली समाजातील पलंगे घराण्याला हा जो तुळजापुरला बहुमान मिळतो त्याची समाज बांधवांना माहिती व्हावी यासाठी हा लेख लिहीला आहे. या सन्मानामुळे पलंगे घराणे कौतुकास पात्र आहेत. तसेच त्यांना हा माल ज्या पलंगाची आहुती द्यावे लागते त्याची किंमत तुळजापूर संस्थानाकडुन मिळावी म्हणुन समाजातील प्रमुख बांधव व श्रेष्ठी प्रयत्न करतील अशी आशा आहे.
श्री. अंबादास पलंगे व श्री. काशिनाथ पलंगे हे दोघे बंधु आत जवळ जवळ 65 वर्षांचे असुन हल्ली त्यांचे चिरंजीव श्री. बाबुराव व श्री. वसंतराव पलंगे हे पलंगाचे काम व प्रथा आपल्या सर्व नातेवाईकांना बरोबर घेऊन पुढे साला आड चालवित आहेत.