८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या विचारकार्याची ही धावती ओळख...
संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा लिहून काढलेत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या काळाविषयी बरेच मतप्रवाह आहेत. काहींच्या मते ते समकालीन होते. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते, तर काहींच्या मते ते तुकोबारायांच्या निर्वाणाच्या काही वर्षं आधी जन्मलेत. त्यांच्या कार्यकाळ कोणताही असो, या दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संताजी महाराजांचे तुकोबारायांच्या विचारांशी असलेलं तादात्म्य हे कमालीचे एकरूप आहे.
भूगोलानेही जवळचेच
◆ संताजी महाराजांचा जन्म मावळ प्रांतात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे झाला. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावात झाला. संताजी महाराजांचं आजोळ हे जवळचंच सुदुंबरे हे गाव. ही सगळी गावं २०-३० किलोमीटरच्या घेऱ्यातच आहेत. देहू, सुदुंबरे, चाकण ही गावे आसपासच आहेत. त्यामुळे येथील लोकांमध्ये त्याकाळी संवाद होताच. या गावांमध्ये विवाहसंबंधही होत. एकमेकांचा पुरेसा परिचयदेखील असणं स्वाभाविकच आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याची मोठी व्याप्ती होती. प्रत्यक्ष भेटून किंवा ऐकून तरी सर्वांना तुकाराम महाराज माहीत असतीलच. संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज हे समकालीन होते याबद्दल विविध मतप्रवाह असले तरी भूगोलाने ते जवळ होते हे मात्र नक्की.
जन्म व बालपण
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ला झाला असं मानलं जातं. ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. यात त्यांचा कार्यकाळ १६२४ ते १६८८ असा सांगितला आहे. शासकीय मतानुसार संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ १६५० ते १६०८ असाही सांगितला जातो. मात्र वारकरी संताजी महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक मानतात. डॉ. किशोर सानप यांच्या ‘समग्र तुकाराम दर्शन’ या ग्रंथात संत चरित्रकार महिपतीबोवांनी संत तुकोबारायांच्या १४ टाळकऱ्यांचा उल्लेख केल्याचे नमूद आहे. सकल संतगाथेच्या दुसऱ्या खंडात एक वेगळा उल्लेख आहे. त्यात म्हटलं आहे की, वा. सी. बेंद्रे यांनी संताजी महाराजांचा काळ १६५०च्या पुढील मानला आहे.
संताजी महाराजांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे यांचा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबाशेठ यांच्याकडे आला. विठोबाशेठ यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत झालं. काही ठिकाणी त्यांच्या नावाचा मथाबाई असाही उल्लेख येतो. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. संताजींना अक्षरओळख, गणित असं बऱ्यापैकी शिक्षण मिळालं. संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांची निरीक्षणं अत्यंत सूक्ष्म असायची. वयाच्या दहाव्या वर्षी वडलोपार्जित तेलाच्या व्यवसायात संताजींचा प्रवेश झाला. अकराव्या वर्षी संताजींच्या विवाहासाठी स्थळ सांगून आलं. त्याकाळात लग्न बालवयातच व्हायची. खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत.
माणसांतच दिसला देव
संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला.
संताजी महाराज आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. संत तुकाराम महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्यांचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. संताजी महाराज हे त्यांच्या पक्षातले, म्हणून हा दाह त्यांच्याही वाट्याला आलाच. पण संताजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनाचं व प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. अभंगांसह त्यांनी ‘शंकर दीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचं लावण्य’ आणि ‘तेल सिंधू’ या ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्यांची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं. त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील अभंगांवरून लक्षात येईल-
● मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही। आपुल्या कृपेने होईल सर्वथाही।। १ ।।
● होईल मज आणि माझिया कुळांशी। पांडुरंग मुळाशी सर्व आहे।। २।।
● संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे। आपुले ते मन सुधारले।। ३ ।।
● आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा। नंदी जोडियला मन पवनाचा।।१।।
● भक्ति हो भावाची लाट टाकियली। शांती शिळा ठेवीली विवेकावरी।।२।।
● सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस। प्रपंच जोखड खांदी घेतीयले।।३।।
● फेरे फिरो दिले जन्मवरी। तेल काढियले चैतन्य ते।।४।।
● संतु म्हणे मी हे तेल काढियले। म्हणुनी नांव दिल संतु तेली।।५।।
मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला. जगद्गुरू तुकोबाराय आणि संताजी जगनाडे महाराज हे दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेघ आहे. ती रेघ वाकडीतिकडी नाही, अस्पष्ट नाही. ती ठळक आणि स्पष्ट आहे. ही रेघ आहे त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची, श्रद्धेची आणि आपुलकीची. एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं.