महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अशा या सुजलाम - सुफलाम महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा एकामागन एक देत अनेक संत होऊन गेले. या सर्व संतानी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे ढोंग उघडे पाडले आणि हे सर्व करीत असतांना स्वतःच्या घरादाराची, स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही. अशा या संताच्या मालिकेत संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव इतिहासात आवर्जून घेतल्या जाते. संत संताजी महाराज यांची आज आठ डिसेंबर ला जयंती आहे, त्यानिमित्य त्यांच्या कार्याचा या लेखात घेतलेला छोटासा आढावा.
संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ ला पुणे जिल्ह्यातील 'चाकण ' या गावी वडील विठोबा व आई ' मथाबाई ' यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील विठोबाला मानणारे होते. बऱ्याचदा संतू (संताजी) आपल्या आई - वडिलांबरोबर तर कधी आजोबांबरोबर चक्रेश्वराच्या मंदिरात कीर्तन - भजन ऐकायला जात असे. अशा या संस्कारक्षम वातावरणात संताजी वाढत होते.
संतुचे शिक्षण जेमतेम झाले होते. जुन्या रितीरिवाजाप्रमाणे बालपणीच त्यांचा विवाह 'कहाणे' कुटुंबातील यमुनेशी झाला. एकेदिवशी चक्रेश्वराच्या मंदिरात संतू सोळा - सतरा वर्षाचा असतांना संत तुकाराम महाराजांचे कीर्तन झाले. त्यांचे तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ व प्रस्थापित व्यवस्थेशी झुंज देणारे विचार ऐकून संतू प्रभावित झाला आणि संत तुकाराम महाराजांच्या मागोमाग संतू जावू लागला. ज्या गावी संत तुकारामांचे कीर्तन असे तेथे संतू पोहचायचा. अशाप्रकारे संतुची वारंवार उपस्थिती बघून संत तुकारामांनी संतुला स्वतःचा शिष्य बनविले. अशा त-हेने संतू संत तुकारामांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी झाला. संतुचे स्थान या चवदा टाळकऱ्यांमध्ये सर्वात वर असल्याचा पुरावा आपल्याला श्री. 'महिपती ' लिखित ' लिलामृत ' या ग्रंथात मिळतो. अशाप्रकारे 'संतू ' संताजी महाराज म्हणून जनमानसात नावारूपास आले.
तत्कालीन काळात इथल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा, लेखन करण्याचा अधिकार नव्हता आणि अशा या वातावरणात संत तुकारामाने जगाला आदर्शवत असे अभंग लिहून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला. या एकाच कारणासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा प्रतिनिधी रामेश्वर भट्ट याने संत तुकारामांच्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीत बुडविली. त्यामुळे संत तुकाराम नदीच्या काठावर आमरण उपोषणाला बसले. संताजी महाराज आणि त्यांचे काही सहकारी सतत संत तुकारामांच्या सोबत कीर्तन करीत असल्यामुळे त्यांचे सर्व अभंग त्यांना तोंडपाठ झालेले होते. ते सर्व अभंग त्यांनी पुन्हा लिहून काढले आणि संत तुकारामांच्या विचारधारेला अजरामर केले.
संताजी महाराज यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्त्व जाणले होते आणि त्यामुळेच त्यांनी हातात लेखणी घेऊन 'तैलसिंधू' व 'शंकर दीपिका' नावाचे दोन ग्रंथ आणि 'घाण्याचे अभंग ' लिहून बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
संताजी महाराज एकदा चाकण ला वास्तव्यास असतांना शाहीस्तेखानाच्या सैनिकांनी गावात प्रचंड लुटमार, जाळपोळ केली. अशावेळी मात्र संताजीनी स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता संत तुकारामांच्या साहित्याचा ग्रंथरूपी अनमोल ठेवा वाचविण्यासाठी तेथून लपत छपत पुढे ते अनेक ठिकाणी मार्गक्रमण करीत राहीले. पुढे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने सुदुंबरे येथे देहावसान झाले. अशा या महान संताची समाधी पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे येथे आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने संताजींच्या जयंती व पुण्यतिथीचे (स्मृतीदिनाचे) औचित्य साधून बहुजन समाजातील बांधव तेथे एकत्र येऊन संताजींना अभिवादन करतात. जयंती निमित्य या महान संतास लक्ष - लक्ष प्रणाम.
निलेश गुल्हाने पदमावती नगर, हिंगणघाट जि. वर्धा