माढा - माढा तालुक्यात लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगाला युवकांच्या पुढाकारामुळे गती मिळत असून लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अभियंत्यापासून अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत या उद्योगात लोक उतरलेले आहेत.
रिफाइंड तेलाच्या उपलबधतेपूर्वी गावोगावी बैलाच्या साह्याने चालणारे लाकडी घाणे लोकांच्या तेलाची गरज भागवत होते. लोकही तेल मिळवण्यासाठी खास करडई, शेंगदाणा, सूर्यफूल यासारख्या पिकांची लागवडही करत होते आणि स्वतः साठी लागणारे तेल स्वतःची करडई, सूर्यफूल, शेंगदाणा बैलाच्या लाकडी घाण्यावर नेऊन काढून आणत होते. मात्र काळाच्या ओघामध्ये हळूहळू हे लाकडी घाणे बंद पडू लागले व रिफाइंड तेलात जमाना आला. आता मात्र तेलाचा वापर करण्याबाबत लोकही जागरूक होऊ लागले असून लोकांचा कल लाकडी घाण्याचे तेल वापरण्याकडे वाढताना दिसून येत आहे. लोकांची गरज व या उद्योगातल्या संधी ओळखता माढा तालुक्यामध्ये नव्याने सात ते आठ लाकडी घाण्याचे तेल मिळणारे व्यवसाय युवकांनी सुरू केले आहेत. माढा, केवड, टेंभुर्णी, मोडनिंब या भागांमध्ये लाकडी घाण्याचे तेल उत्पादित करणारे उद्योग सुरू झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास २५ हुन अधिक असे उद्योग असल्याची माहिती आहे.
माढ्यातील रहस्य ऑईल या नावाने संदीप कापसे या मेकॅनिकल इंजिनियरने नोकरी व पारंपरिक इंजिनिअरिंगमधील व्यवसाय न करता लाकडी घाण्याचे तेलाच्या उद्योगाची सुरुवात माढ्यामध्ये केली असून सध्या या उद्योगात त्यांचा चांगला जम बसलेला आहे. तर माढा तालुक्यातील केवड येथे महारूद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण व त्यांची पत्नी सरिता यांच्या सहकार्याने गंधर्व ऑईल इंडस्ट्रीज हा लाकडी घाण्याचे तेल उत्पादन करणारा आयएसओ मानांकित व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी जीएमसी या नावाने लाकडी घाण्याच्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. त्यांचाही या व्यवसायामध्ये चांगला जम बसलेला आहे. या व्यवसायात त्यांना बंधू कालिदास चव्हाण यांचीही साथ मिळत आहे. लाकडी घाण्यावर शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, जवस, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी यासारख्या तेलबियांचे तेल काढून दिले जाते. सध्या सुरूवाततीच्या काळात या व्यवसायात महिन्याला दोन ते तीन लाखांची अर्थात वार्षिक तीस ते पस्तीस लाखांची उलाढाल होत आहे.
ठळक मुद्दे..
केवड (ता. माढा) येथील गणेश चव्हाण यांच्या गंधर्व ऑईल इंडस्ट्रीजने मिळवले आयएसओ प्रमाणपत्र
• संदीप कापसे यांनी मेकॅनिकल इंजिनिअर असतानाही रहस्य ऑइल मिल या स्टार्टअपने उद्योगाला केली सुरुवात
• तेल काढून राहिलेली पेंड पशुखाद्य म्हणून विकली जाते.
• मशिन दोन लाखांपासून पाच लाखांपर्यंत उपलब्ध असून सुमारे चार लाखांच्या भांडवलात हा व्यवसाय उभा करता येतो.
• व्यवसायाच्या व्याप्तीनुसार किमान दोन कामगारांवर हा व्यवसाय सुरू करता येतो या व्यवसायासाठी करडई, शेंगदाणा, सुर्यफुल यासारख्या कच्च्या मालाची सोलापूर जिल्ह्यात उपलब्धता