पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत. घाण्यातून काढलेले तेल शुद्ध असते. त्यात रंग, रसायनांचा वापर होत नाही. हे तेल शरीरासाठी गुणकारी असल्याने मागील दोन वर्षांत शहरात घाण्यापासून तयार केलेल्या तेलाच्या विक्रीचा आलेख वाढता आहे. इतकेच नव्हे तर दहाच्या आत असलेल्या लाकडी तेल घाण्याची संख्या औरंगाबाद शहरात ४० च्या जवळपास गेली आहे.
पूर्वी शहरात पिढ्यान्पिढ्या चालत आलेली जवळपास १०० च्या जवळपास घाणे होते. जालन्यात तर जवळपास ४०० घाणे होते. मात्र राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या यात उतरल्याने काळाच्या ओघात लाकडी घाणे परवडत नसल्याने ते बंद पडत गेले. बारा बलुतेदारांमधील महत्त्वाच्या या घटकाला नाइलाजाने इतर व्यवसायांकडे वळावे लागले. आता लाकडी घाण्यांमध्ये काळाच्या ओघात काही बदल झाले. यामध्ये ८० च्या दशकात वीजघाणे आले. आता पोर्टेबल पॉवर घाण्याचासुद्धा पर्याय
उपलब्ध आहे.
औरंगाबादेत विस्तार - औरंगाबादेत मागील काही वर्षात लाकडी घाण्याची संख्या वाढत चालली आहे. हे युनिट सुरु करण्यासाठी अनेकांना कर्ज सुद्धा मिळाले आहे. तसेच रोजगाराचे साधन म्हणून अनेकजण या व्यवसायाकडे वळले आहे. कोरोनानंतर आरोग्याबाबत जागृती आणखी जास्त वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील लोकांची पावले तेल खरेदीसाठी घाण्यांकडे वळत आहेत.
सध्या तेल बियांचे उत्पादन कमी होत असल्याने त्या मिळविण्यासाठी घाणे चालकांना अडचणी येतात. कनार्टक, तेलंगाणा, लातूर, उदगीर येथून करडई खरेदी करावी लागते. तसेच शेंगदाणा, सूर्यफूल त्यांना लोकल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. १ क्विंटल करडईतून २४ ते २५ किलो तेल निघते. तर १ क्विंटल शेंगदाण्यातून सरासरी ४० टक्के तेल निघते. शिवाय तीळ, सरसो, जवस, खोबरा, बदाम तेलही काढले जाते. घाण्यामध्ये तेल काढल्यानंतर पेंढ तयार होते. मात्र, जनावरांची संख्या कमी होत चालल्याने पूर्वीसारखी पेंड आता विक्री होत नाही. सध्या करडईची पेंड २०, शेंगदाणा ३० ते ४०, सूर्यफूल १५ ते २०, तीळ ४० रुपये किलो दराने विक्री होते. दरम्यान, सोयाबीन, पामतेल आणि राईस ऑइल शहरात सध्या घाण्यातून काढले जात नाही.
पूर्वी बैलांचे घाणे असल्याने दिवसभरात जास्तीत जास्त २५ लिटरच्या जवळपास तेल निघत होते. मात्र आता विद्युत लाकडी घाणे असल्याने दिवसभरात १५० ते २०० लिटर तेल निघते. याला पाच एचीपर्यंत मोटार लावली जाते. सध्या औरंगाबाद शहरात महिन्याला जवळपास १२ लाख लिटर खाद्य तेलाची आवश्यकता असते. तर देशात खाद्य तेलाची महिन्याला २० ते २१ लाख टन एवढी मागणी आहे. देशात मलेशिया, ऑस्ट्रेलिया, यक्रेन, इंडोनेशिया, ब्राझिल. अर्जेटिना या देशातून खाद्यतेलाची आयात केली जाते. गरजेच्या तुलनेत फक्त ३५ टक्केच खाद्यतेलाची निर्मिती देशात होते.
घाण्याचे तेल आरोग्यदायी घाण्यावर तेल काढण्याअगोदर करडई, सूर्यफुलाची स्वच्छता केली जाते. त्याचा भरडा करुन तेल काढले जाते.
यात कोणताही रंग, रसायन वापरले जात नाही. जसे तेल निघाले त्याच पद्धतीने ते ग्राहकांना दिले जाते.
विजेवर चालत असले तरी घाण्यावर तेल काढताना नगण्य उष्णता निर्माण होते. त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व जपले जाते.
या खाद्य तेलाला स्वतःचा सुगंध व रंग असतो, हे तेल घट्ट असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त असते.
या तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारची प्रथिने असतात.
शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो त्यात शरीराला आवश्यक असणारे फैटी एसिड असतात व व्हिटॅमिन ड आणि मिनरल्स असतात.
शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार कमी होतात.
भारतात शेकडो वर्षापासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते.
आहारात सेंद्रिय घटक असल्याने १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.
आम्हाला करडई मिळविण्यात अडचणी येत आहेत. तसेच शासनाने याचा जीएसटी कमी करायला हवा. त्यातून घाणे चालकांवरील आर्थिक भार थोडा कमी होईल. आम्ही मोठ्या कंपन्यांची बरोबरी करू शकत नाही. शासनाने आम्हाला आर्थिक पाठबळ द्यावे. -किशोर मिटकर, घाणेचालक
तेलबियांसाठी अडचणी येत असल्याने तेल बियांच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे. तेलाची गरज कायम राहणार असल्याने बारा बलुतेदारातील हा महत्त्वाचा घटक जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न हवेत. तेल उत्पादकांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे. शिवाय अल्पव्याजदराने अर्थपुरवठा व्हावा. -कचरू वेळंजकर, जिल्हाध्यक्ष, खाद्यतेल महासंघ
माझ्या वडीलांना त्रास जाणवायला लागल्यापासून त्यांनी घाण्याचे तेल वापरण्यास सुरवात केली. आता मी स्वतःच घाण्याचे तेल खरेदी करत असतो. याचा आमच्या आरोग्यासाठी चांगला फायदा झाला आहे. या तेलामुळे पित्ताचा त्राससुद्धा खूपच कमी प्रमाणात होतो. - पवन यादव, घाण्याचे तेल वापरणारे नागरिक