९ फेब्रुवारी २००९ रोजी सोमवारला गोंदिया शहरातील धोटे बंधू विज्ञान महावद्यालयात भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेली समाजाचे दैवत संत संताजी जगनाडे महाराजांच्या टपालतिकिटाचे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्रातील करोडो तेली समाजबांधवांची मागणी यावेळी पूर्ण झाली असली तरी या तिकिटाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्रातील तेली समाजबांधवांचे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी दिसून येते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होताना संताजी महाराजांवरील तिकीट प्रकाशनापर्यंतची वाटचालीचा इतिहासही माहिती करून घेणे आवश्यक आहे.
विदर्भात तेली समाज जवळपास १९ टक्के आहे. अनेक गावात तेली समाजाची संख्या ही ६० ते ८० टक्क्यापर्यंत जाते. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात तेली समाजाची मतदारसंख्या २.७५ लाखाच्या जवळपास आहे. नागपूर, रामटेक, वर्धा व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात तेली समाजाची मतदारसंख्या लक्षणीय आहे. खासदार निवडून देण्यापुरती तर नक्कीच आहे. २००२ ला चंद्रपूर येथे विदर्भ तेली समाज कर्मचारी परिषदेचे अध्यक्ष सुरेश रेवतकर यांच्या प्रयत्नाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. येथे पहिल्यांदा तेली समाजबांधवांनी संताजीवर टपाल तिकीट काढण्यात यावे म्हणून ठराव संमत केला होता. त्यानंतर खºया अर्थाने संताजीवरील टपाल तिकिटासाठी प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन आमदार व सध्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १९ आॅक्टोबर २००२, २७ जानेवारी २००३, ९ जानेवारी २००३ आणि ६ जून २००६ ला सतत केंद्रीय संचार राज्यमंत्री यांना संताजींच्या चित्रांकित टपाल तिकिटाबद्दल पत्र लिहिले. ३१ मार्च २००३ ला सुरेश रेवतकर यांनी केंद्रीय संचार राज्यमंत्री तिरुनावुक्करिसर यांना संताजीवरील टपाल तिकिटाबद्दल पत्र पाठवले. त्यांचे उत्तर ६ एप्रिल २००३ ला आले. त्यात केंद्रीय संचार मंत्र्यांनी टपाल तिकीट सल्लागार समितीच्या मापदंडानुसार संताजीच्या टपाल तिकिटाचा प्रस्ताव नसल्यामुळे काढता येत नाही, असे स्पष्ट सांगितले. सदुंबरे, जिल्हा पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय तेली समाजाच्या मेळाव्यात तत्कालीन अनेक आमदार, खासदार व मंत्र्यांच्या उपस्थितीत संताजी महाराजांवरील तिकिटाबद्दल जोरदार मागणी करण्यात आली. मंचावर राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ होते. खा. शरद पवार यांनी सहा महिन्यात संताजींवर टपाल तिकीट काढण्याची घोषणा केली. पण ती मेळावा संपल्याबरोबर हवेतच विरली. शरद पवारांची ही राजनीती आहे. तिची अंलबजावणी झाली नाही.
त्यानंतर महाराष्ट्र तेली समाजाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केंद्रीय संचारमंत्री यांना ६ फेब्रुवारी २००५ ला महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांना ६ मे २००५ ला संताजी टपाल तिकिटाबद्दल पत्र पाठविले. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. ४ मार्च २००६ ला नागपूरच्या राज्यस्तरीय तेली समाजमेळाव्यात आमदार, खासदार व अर्ध्या डझन मंत्रिमंडळासमोर तेली समाजाने संताजी तिकिटासाठी जोरदार मागणी केली. नेत्यांनी आश्वासन दिले. परंतु तिकीट काही निघाले नाही.
२० जुलै २००७ ला विधानसभेत सध्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठरावाद्वारे संताजी महाराजांवर टपाल तिकीट काढण्याच्या मागणीवर चर्चा घडवून आणली. अनेक आमदारांनी या मागणीला समर्थन दिले. अखेर महाराष्ट्र सरकारला संताजी महाराजांच्या टपाल तिकिटाचा अशासकीय ठराव पारीत करावा लागला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सी/एम-३/एफएसडी (३४)२३९ द.१८ आॅक्टोबर २००६ रोजी संताजी महाराजांवर टपाल तिकिटाचा महाराष्ट्र शासनाचा ठराव केंद्रीय संचारमंत्र्याकडे पाठविला.
तेली समाजातील आमदार, खासदार यांनी संताजींच्या टपाल तिकिटासाठी पत्रव्यवहार केला. पण पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. तिकीट काढण्यासाठी जोश नव्हता तर केवळ औपचारिकता होती. परंतु इतर समाजाच्या आमदारांनी मात्र प्रत्येकवेळी जोर लावल्याचे दिसून येते. खासदार हंसराज अहीर यांना मधुकर वाघमारे, बबनराव फंड, रघुनाथ शेंडे यांनी संताजी महाराजांच्या टपाल तिकिटासाठी चर्चा करून माहिती दिली. तेव्हा लोकसभेत खासदार हंसराज अहिर यांनी संताजी महाराजांवर टपाल तिकीट काढण्यासंदर्भात चर्चा घडवून आणली. पण केंद्रीय संचारमंत्री दयानिधी मारन यांनी टपाल तिकीट काढण्यास असमर्थता व्यक्त केली. सुरेश रेवतकर यांनी २० जुलै २००६ ला संचार विभागाला दिल्ली येथे पत्र पाठविले. त्याचे उत्तर सहाय्यक महानिदेशक सचिन किशोर यांनी २८ सप्टेंबर २००६ ला दिले. त्यात सल्लागार समितीच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, संतोष चौधरी, तुकाराम बीडकर, राजू तिमांडे, बंडू सावरबांधे, जगदीश गुप्ता आणि खासदार सुरेश वाघमारे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी व महाराष्टÑातील तेली समाजाच्या संस्था, कार्यकर्ते यांनी संताजी टपाल तिकिटासाठी दिल्ली येथील संचार विभागासोबत पत्रव्यवहार केला. नाशिकच्या ‘तेली समाज सेवक’मध्ये लेख लिहून संताजींवरील तिकिटाबद्दल पाठपुरावा केला. पण प्रतिसाद मिळाला नव्हता.
२१ डिसेंबर २००८ ला गोंदियातील संताजी सभागृहात जिल्हास्तरीय संत संताजी जगनाडे महाराज जयंतीला जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मधुकर वाघमारे व प्रा. नामदेव हटवार यांनी प्रफुल्लभार्इंना तेली समाजाच्या भावना संताजी महाराजांच्या टपाल तिकिटाशी जोडलेल्या आहेत, तेव्हा तिकीट प्रकाशनासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी समाजाच्या वतीने केली. त्यावेळी त्यांनी दोन महिन्यात टपाल तिकिटाच्या प्रकाशनासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. नंतर त्यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री ए. राजा व राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन संताजी महाराजांवर टपाल तिकिटाला प्रकाशित करण्याचा आग्रह धरला. अखेर केंद्रीय दळणवळण, संचार मंत्रालयाच्या वतीने संताजी महाराजांचे तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ५ रुपयाच्या टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले.
सदोष तिकीट
संताजी महाराजांच्या तिकटाचे प्रकाशन झाले असले तरी प्रकाशनाच्या घाईगडबडीत ते सदोष तिकीट प्रकाशित करण्यात आल्याचे त्यावेळी कुणाच्याही लक्षात आले नाही. नंतर काही दिवसांनी त्या तिकिटातील दोष दिसून आला. जे तिकीट प्रकाशित करण्यात आले त्या तिकिटावर इंग्रजीत संत संताजी जगनाडे महाराज १६८८ असा उल्लेख आहे. संताजी महाराजांचा मृत्यू २० डिसेंबर १६९९ ला झालेला असताना १६८८ मृत्यू वर्ष तिकिटावर टाकणे चूक होते. मराठीतील जन्म १६२४ हे बरोबर लिहिलेले आहे. तेव्हा मृत्यूवर्षाची घोडचूक संताजी महाराजांच्या टपाल तिकिटावर झालेली आहे. या चुकीवर चर्चा करून राष्टÑपती प्रतिभा पाटील यांना निवेदन देण्याचे ठरविले. मार्च २००९ मध्ये दिल्ली येथील राष्टÑपती भवनात मधुकर वाघमारे, रघुनाथ शेंडे, प्रकाश भुरे, देवराव भांडेकर, अरविंद जायस्वाल यांनी तत्कालीन राष्टÑपती प्रतिभा पाटील यांची राष्टÑपती भवनात भेट घेतली. यावेळी संताजी टपाल तिकीट प्रकाशनात झालेल्या चुकीची माहिती देऊन चूक दुरुस्त करण्यासाठी निवेदन दिले. आयबीएन लोकमत दूरचित्रवाणीला मुलाखत देऊन ती दाखविण्यात आली. परंतु मृत्यू सनात टपाल तिकिटावर बदल मात्र झाला नाही.