प्रा. प्रकाश भोसले, उद्योजक, उद्योग सल्लागार, लेखक
प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
करिअर: अतिउच्च शिक्षण, एमडी, एमएस, पीएचडी, इत्यादी करिअर्स समजू शकतो की वयाची तिशी होईपर्यंत शिकावे लागते, त्यानंतरच विवाहाचा विचार होतो पण पदवीधर, नोकरी, कामधंदा, शेती किंवा पुण्याला नोकरी करणारेही लग्नाविना वयाची तिशी-पस्तिशी गाठत आहेत.
आर्थिक घडी: ३०-३५ वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यानंतर १० वी नंतर DEd करून शिक्षक व्हायचे, ITI करून कंपनीत नोकरी, आर्मी किंवा पोलीस भरती व्हायचे व वयाच्या २५-२६ वर्षांचे झाल्यावर लग्ने व्हायची. ३० च्या आत २ मुलंही व्हायची व संसाराचा गाडा सुरु व्हायचा. नोकरी नाही लागली तरी लहानसहान काम व सोबत शेती करायचे त्यांची पण लग्ने लगेच व्हायची. पण आता नोकऱ्या मिळेनात व समाजाला व्यवसायाचा गंध नाही. इथले असंख्य व्यवसाय परप्रांतीय व्यापारी समाजांच्या हातात आहेत.
व्यावसायिक कुटुंबे: व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांत हा विवाह लांबण्याची प्रकार तेवढा नाही. तरुण मुलं आपल्या पारंपरिक व्यवसायात सामील होतात व योग्य वयातच त्यांची लग्नंही होतात. वेळेवर लग्न होणे हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
अर्थकारण बिघडले: स्वतःच जगायची पंचाईत मग लग्न करून मुलं व बायकोला कसे सांभाळणार? त्यामुळे मुलांची करिअर्स लवकर सेटल होईनात, उत्पन्न लवकर सुरु होईना, वयाची तिशी गाठली तरी कशात काय नि फाटक्यात पाय अशी अवस्था! नोकऱ्या शोधून, स्पर्धा परीक्षा देऊन कित्येकजण दमले. उलटपक्षी सर्वसाधारण कौशल्य आत्मसात करून व्यवसाय सुरु करणारे लवकर कामे करू लागतात व कमविते होतात व त्यांची वेळेवर लग्नेही होतात.
प्रेमविवाह वाढले: समाजातील ही लग्न जुळणीमधली वाढती क्लिष्टता लक्षात घेऊन स्वतःचं करिअर बऱ्यापैकी सेटल होतंय असे वाटल्यावर पुणे-मुंबई-बेंगलोर मध्ये नोकरीनिमित्त जाणारी हल्लीची मुलं ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथेच आपल्याला आवडणाऱ्या मुलाशी किंवा मुलीशी मैत्री करून प्रेमविवाह करण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. आज समाजात पस्तिशी ओलांडले तरी लग्न ठरेनात, त्यामुळे बाकीच्यांनी धसका घेतला आहे व ते प्रेमविवाहाच्या मार्गाने जात आहेत. दोघेही एकाच क्षेत्रात कामाला, दोघेही पगारदार; मग काय कुणाची फिकीर? हल्ली प्रेमविवाहांना कुटुंबीयांचाही सॉफ्ट कॉर्नर मिळतोय, कारण त्यांनाही कळून चुकलंय ३५-४० वय झालेली आपल्याच भाऊ-बंदकीतले लग्न न झालेले १०-१२ जण आहेत त्यांनी आपली मुलं प्रेमविवाह करून मोकळी झाली त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, फक्त वारंवार विरोध आणि नाराजगी दाखवायची.
दृष्टिकोनात बदल हवा: इथून पुढे सरकारी नोकरी म्हणजे दुर्मिळ बाब होणार असून खाजगी नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी असाच प्रकार आहे. समाजाने व्यवसाय करणाऱ्या तरुणांकडे सकारात्मकतेने पहिले पाहिजे व त्यांना मुली देण्यास प्राधान्य दिले पाहिजे व समाजात उद्योजकता वाढीस लागेल. इतर व्यावसायिक जातीत जर व्यावसायिकांना मुली देत असतील मग आपल्याला तरी फक्त नोकरी करणारच हवा असा अट्टाहास कशाला? नोकराला मुलगी देण्यापेक्षा मालकाला का नको? असा दृष्टिकोन वाढीस लागायला हवा म्हणजे लग्नाचाही प्रश्न सुटेल व उद्योग वाढीस लागून समाजात सधनता येईल.
प्रा. प्रकाश भोसले, उद्योजक, उद्योग सल्लागार, लेखक