- मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,
जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज !
जगद्गुरु तुकोबांनी जसं
कोण्याही जिवाचा न घडो मत्सर।
वर्मे सर्वेश्वर पूजनाचे॥
असे सांगितले व आपल्या आचरनातून प्रत्यक्ष तसे जगले. हे त्यांचे विचार पुढे संताजी महाराजानी पुढे चालू ठेवले.म्हणूनच संताजी महाराजांनी शब्दाला कृतीची जोड आवश्यक आहे हे सांगताना म्हणतात,
संतू म्हणे येथे पाहिजे जातीचे।l l येर गबाळाचे काम नव्हे॥
नाहीतर भागवत सप्ताह ,इतर प्रवचनांत क्या लेके आए थे ? हे सांगून आठव्या दिवशी भरघोस द्रव्य लुटून नेणारे आपण पाहतच आहोत. तत्कालीन व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीनच वर्ण व्यवस्थेचे लाभार्थी व शूद्र केवळ सेवेकरी शिवाय अतिशुद्रांचे हाल तर शब्दांच्या पलीकडचे. वर्नाश्रमा व्यवस्था इतकी बळकट व बंदिस्त असताना शिवाय महिला मग त्या कोणत्याही वर्णाच्या असल्या तरी कायम शूद्रच.शिवाय अठरापगड जाती, पोटजाती त्यातही उच्च नीच, शूद्र अति शूद्र. अशी विदारक स्थिती असतांना संताजी महाराजांनी
संतू म्हणे जाती दोनच त्या आहे।
स्त्री आणि पुरुष शोधुणिया पाहे॥
असे सांगतात म्हणजे किती पुरोगामी व परिवर्तनवादी विचार मांडतात हे आवर्जून लक्षात घ्यावे. हे जर आम्हास कळले तर संत महापुरूषांना जातीच्या चष्म्यातून पाहणे तरी किमान बंद होईल.
आज जात ,धर्म, प्रांत हे वाद उफाळून येत आहे त्यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे. मात्र वारकरी संतांचे जीवन हे समता प्रस्थापित करणारे होते म्हणूनच जगद्गुरु तुकोबा व संताजी महाराज यांचे विचार व कार्यास कशाचीही सीमा नाही. संतू तुका या देशीचा।। हे अभिमानाने सांगावेशे वाटते.
ब्राह्मणी अथवा वैदिक धर्मात नाना प्रकारचे देव देवता ,अनेक तिर्थस्थळे, जप ,तप ,यज्ञ, याग उपास ,तापास ,संस्कृत मंत्र, पुरोहित.हे सगळे व त्या आडून बहुजनांचे होणारे शोषण. प्रामाणिक कष्टकरी लोकांना खालच्या जातीचे व देव, धर्म, ग्रह तारे याची भीती दाखवून लुटणारे मात्र उच्च.ही जगात कोठेही न आढळणारी सामाजिक व धार्मिक व्यवस्था.
वारकरी संतांनी या धार्मिक व सांस्कृतिक व्यवस्थेविरोधात मोठे आंदोलन केले. याचाच फायदा पुढे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेत करून घेतला.
वैदिक आणि वारकरी यातील खरा फरक समजून घेणे महत्वाचे. केवळ जातीचे म्हणून संताजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि मनु आणि मनीवादी व्यवस्था बळकट होईल असे वर्तन ठेवायचे ही दुटप्पी भूमिका सोडून देने महत्वाचे.
जगद्गुरु तुकोबा व संताजी महाराज यांचे विचार व कार्य पुन्हा नव्याने समजून घेऊया.तरच येणाऱ्या संकटास व आव्हाणास सामोरे जाण्याचे बळ येईल. बहुजनांच्या आस्थेचा व श्रद्धेचा आज परत गैरवापर होत आहे. ते हक्क व अधिकारांची भाषा करू नये , लढा उभारू नये म्हणून त्यांना वेगवेगळय़ा व्रत वैकल्यात गुंतवून ,दैववादी करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणांत होत आहे.म्हणून बहुजन संत व मनुवादी जंत यांतील फरक ओळखण्याची ताकद ती कुवत निर्माण होवो ही अपेक्षा व संताजी महाराज चरणी प्रार्थना !
जगद्गुरु तुकोबारायांचा संताजी महाराजांवर फार मोठा प्रभाव होता. तुकाराम गाथेचे लेखक म्हणून संताजी महाराज तर इतिहासात अमर आहेत. पण त्यांनी स्वतंत्र सुद्धा अशी रचना केलेली आहे. त्यात शंकर दीपिका, कृष्ण दीपिका, प्रकाशदीप, घाण्याचे अभंग इत्यादी आहेत. संत तुकाराम व संताजी महाराज यांच्यात बरेच गोष्टीत साम्य आहे. संत तुकारामाची पहिली पत्नी रुक्मिणी व त्यांचा मुलगा संताजी. संताजी हा मुलगा मरण पावल्यानंतर दुसऱ्या संतांजीची चक्रेश्वराच्या मंदिरात भेट होते. शिवाय संत तुकाराम व संताजी महाराजांचे सासर एकच ते म्हणजे खेड.इथून खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होतो. संतू तुकाची जोडी लावी ज्ञानाची गोडी. महिपती बुवा ताहराबादकर यांनी 'भक्तलीलामृत' हा ग्रंथ लिहिला. त्यात ते संताजी महाराजांचा उल्लेख करताना असे लिहितात,
तुकयाच्या संगे वैष्णव जन l श्रेष्ठ निधडे असती कोण कोण l संताजी तेली बहुत प्रेमळl अभंग लिहित बसे जवळ l धन्य त्याचे भाग्य सबळ l संग सर्वकाळ तुकयाचाl.
तसेच संत तुकारामाचे वंशज गोपाळ बुवा महाराज यांनी सुद्धा संताजी महाराजांविषयी कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.
संत तुकारामाच्या निर्वाणानंतर संताजी महाराजांनी 50 वर्ष तुकाराम गाथा जीवापाड जपली. अनेक संकटाना तोंड दिले. आज संत तुकारामाचे विज्ञानवादी मानवतावादी विचार जिवंत आहे ते खऱ्या अर्थाने संताजीमुळे. हे जर झाले नसते तर महाराष्ट्राची फार मोठी सांस्कृतिक व साहित्यिक हानी झाली असती. मित्रहो,तेली समाजास फार गौरवशाली व जाज्वल्य इतिहास आहे. नवनाथापैकी एक असलेले गोरक्षनाथ, ताई तेलीन, वीर व दाणवीर भामाशहा,महान खगोल वैज्ञानिक डॉक्टर मेघनाद सहा व भटमुक्त व भयमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा, पुरोगामी विचाराचा धगधगता लाव्हा म्हणजे पेरियर रामास्वामी नायकर. ह्या सर्वांचे जीवन चरित्र अभ्यासले, पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित केले तर समाजात फार मोठी क्रांती येईल. संताजी महाराजांचा जन्म जरी तेली जातीत झाला असला, तरी संत हे विशिष्ट जातीचे नसतात तर ते अखिल मानव जातीचे असतात. बुडती हे जण न देखे डोळाl येतो कळवळा म्हणूनिया ll
ते केवळ भगवी वस्त्रे धारण करून देव देव करत बसत नाही तर समाजातील सुखदुःखासी एकरूप होतात. प्रपंच सांभाळून परमार्थ साधतात. आपण सुद्धा सर्वांनी उत्तम व्यवहार करून धन जोडावे व आपले काही सामाजिक उत्तरदायित्व आहे हे समजून उत्पन्नाचा काही भाग समाजावर खर्च करावा. जात धर्म,पंत,प्रांत या सीमा ओलांडून एक माणूस म्हणून जीवन व्यतीत करावे. जय संताजी असे अभिवादन करत असताना संताजी महाराजांच्या विचाराचा व कार्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपले नैतिक व आद्य कर्तव्य आहे असे समजावे.संतांनी चालवलेल्या परंपरा, अभंग वचने यातील मतीतार्थ समजून घेऊन मार्गक्रमण करावे. संताची चळवळ ही केवळ भक्ती चळवळ नसून ती मुक्तीची चळवळ होती. तत्कालीन धर्म व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला फार मोठे हादरे दिले. म्हणून अनेक संतांचा फार मोठा छळ झाला, प्रसंगी घातपातही झाला. त्यांचा लढा,कोणासाठी? कोणा विरोधात? व कशासाठी? होता. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वैदिक आणि वारकरी यातील भेद समजून न घेता अंधपणे जर आपण चाललो तर अध्यात्माच्या नावाखाली फार मोठे शोषण होईल. जात,धर्म, लिंग, वंश हे मानव निर्मित भेदभाव आहेत. यामुळे समाज एका बाजूला राजकीय गुलामगिरीत व दुसऱ्या बाजूला धार्मिक गुलामगिरीत अडकून देशाची प्रगती होत नाही. म्हणून "अवघी एकाचीच विनl तेथे कैचे भिन्नभिन्न ll " हे सर्वांना समान लेखनारे सूत्र आपण अंगीकारले पाहिजे.तरच एका सुदृढ,बलशाली व विवेकी समाजाची जडणघडण होईल. आणि सर्व समाज बांधवांनी संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना त्यांच्या कार्यात पहावे. म्हणजेच त्यांचे खरे कार्य पुढे नेऊन बहुजन समाजाला योग्य दिशा मिळेल. तसे झाले तर संताजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने फलदृप होईल.
मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, गडचिरोली. मो. 7798304437