नाव - सौ. विमल सतिश वाव्हळ माहेरचे नाव - विमल बबन उबाळे. जन्म - 13/07/1961 मु.पो. वाडा ता. खेड (राजगुरूनगर) जि. पुणे. आमचा हा वाडा हे गाव फार खेडेगाव आहे. भिमाशंकरपासून पायथ्याशी 30 कि.मी. अंतरावर हे आहे. तसेच हे गाव भिमा नदीच्या काठावर आहे.
आमच्या घरात पंजी, आजोबा, आजी, वडील, आई तीन चुलते व पाच आत्या हे होते. नंतर तीन चुलत्या दोन भाऊ व आम्ही दोघी बहिणी व सर्व घरातील एकूण चाळीस माणसांचा हा परिवार आहे. सर्व मुंलाची लग्ने झाली, चुलतभाऊ बहिणी बारा व आत्यांची बारा जण आता सर्व मिळून नव्वद एक संख्या आहे. यातील बरीच मंडळी कालवश झालीत. नऊ भावडांत माझे वडिल मोठे होेते.
माझ्या वडिलांचे टोपण नांव दशरथ शंकर उबाळे हे होय. माझ्या जन्मानंतर त्यांचेही जीवन बदलून गेले. आमच्या घरात खूप आनंदी आनंद झाला. पहिलीच नात म्हणून घरातील सर्वच माझे कौतुक करत असे. सर्वाच्या अंगाखाद्यावर खेळून माझे बालपण गेले. मी सहा महिन्याची होते त्यावेळी माझ्या वडिलांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यावेळी आमच्या दुकानात चहा, नाष्टा, जेवण व शीतपेय असे सर्वकाही मिळत असे. एक वर्षाचीस असताना सोडाले मन हातात घेऊन वडिलांनी माझा फोटो काढला. या धंद्यात त्यांना फार यश मिळाले. माझे आजी-आजोबा चुलते व आत्या यांचे त्यांना खूप पाठबळ होते. पंजी व आई घर व दुकान अशी दोन्ही ही कामे पहात असे. माझे चुलतेेही फार मेहनती होते. त्यांना ही स्वतंत्र्य धंदे चालू करून दिले सर्वजण आपआपली जबाबदारी पार पाडत असल्यामुळे आमचा परिवार खूप पुढे आला. माझी पणजी आजी व आजोबा हे फार कष्टाळू होते त्यांनी तेलाची घाणी व हाळीपाटी करून सर्व मुंलाना चांगले सुसंस्कृत करून आपला परिवार वाढविला.
त्यानंतर वडील व चुलते यांनी हॉटेल, सायकल दुकान, जनरल स्टोअर, मंडप व लाऊड स्पीकर आणि वीटभट्टी हे सर्व व्यवसाय चालु केले. वीटा वाहण्यासाठी ट्रंक व स्वतःला फिरण्यासाठी चारचाकी घेतली होती आजी आजोबांचे किराणा दुकान असे सर्व काही होते, सर्व भाऊ मान देत होते. घराच्या नावलौकीका बरोबर घराचा दराराही होता. पूर्ण गावात त्यांना आवडीने बबनशेठ असे म्हणत कमी वयात फार छान प्रगती केल्यामुळे सर्वत्र त्यांचे नाव आदराने घेत असे.
माझ्या आईचे माहेर हे गावातच, आजी आजोबा व नऊ मुले पाच मामा व पाच मामी व चार मावशा इतर चुलतही मामा आहेत. तिकडेही नव्वद एक माणूस आहे. त्याही सर्वांचे व्यवसाय आहे. यामध्ये एक मामा शिक्षक व लहानमामा पुणे येथे कामाला आहे. आईचे रोजच मामाकडे जाणे येणे असायचे आई मामा व मामी म्हातारपणापर्यंत, चल्लसपाणी, सागरगोटे व गाणी म्हणणे हे खेळ खेळत असे. जीवनाचा खरा आनंद घेत होते. आता यातील बरेच मामी मामा व आजी कालवश झाले.
बालपणातील दिवस संपत होते. तीन चार वर्षे निघून गेली. मी बालवाडीत जाऊ लागले त्यावेळी बालवाडी ब्राह्मण आळीला होत शाळेचा श्रीगणेशा सुरू झाला खूप लांब शाळेत जावे लागत असे म्हणून मी कंटाळा करत असे. जुन्या वाड्यात आमच्या बाजूलाच पोलीस स्टेशन होते, मी शाळेत जाण्याचा कंटाळा करू लागले की, पोलिसमामा मला धाक दाखवून शाळेत लहानपणापासून गाणी गोष्ट व खेळण्याची आवड निर्माण झाली.1,2, व 3 पूर्ण बाराखडी शंभरपर्यत पक्की झाली. बालवाडीतून लगेच पहिलीत घातले. मी हुशार आहे म्हणून पाढेही पाठ करून घेतले. तिसरीपर्यत बेरीज, वजाबाकी गुणाकार व भागाकार पक्के झाले. आमच्या घरी हॉटेल व्यवसाय असल्यामुळे घरी जास्त अभ्यास करत नसे. गुरूजी माझा चांगला अभ्यास करून घेत होते. त्या नंतर माझ्या आईने जवळ-जवळ चौथीपर्यत अभ्यास घेतला आई सहावीपर्यंत व वडील सातवी पर्यंत शिकले होते, नंतर त्यांनाही कामामुळे वेळ मिळत नव्हता. माझे वय लहान होते. पाचवीतील अभ्यास झेपत नव्हता, म्हणून गुरूजींना मला दोन वर्ष पाचवीत ठेवले.
लहाणपणापासून मला खेळण्याची आवड होती. चौथी पाचवीपर्यंत एवढ्या जबाबदार्या नसतात. म्हणून आम्ही खूप खेळ खेळत असे. लपाछपी, लंगडी,खो-खो, गोट्या, सागरगोठे अंताक्षरी काचाकवड्या, संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, नकला करणे, पत्ते, विटीदांडू, चोर-पोलिस इ. हे खेळ खेळण्यासाठी मुली व मुले यांना बोलविण्यास त्यांच्या घरी जात असे. ती मुले काहीतरी काम करत असे त्यावेळी आम्ही सर्व मिळून त्यांचे काम करून देत असे कालच्या खेळात एखादी मुलगी जिंकली तर ती भाव खात असे व हारली तर खेळायला येण्यास काचकुच करत असे म्हणून तिची सर्वजण मनधरणी करत असे. एखादी मुलगी आढेवेढे घेत असल्यास तू पहिला नंबर घे पण खेळायला चल असे म्हणून तिला राजी करत असू. काळ बदलला असला तरी हे लहानपणीचे खेळ व त्यांची आठवण आजही ताज्या आहेत. त्यावेळचे रूसवे फुगवे आज आठवले तरी हसू येते. त्यावेळी आपण चूक होतो की बरोबर हे ही कळत नाही, पण लहानपणीचे खेळ आत्ता संसारात, लग्नानंतरही त्याचा उपयोग होईल असे वाटत नव्हते. कारण हेच पहा प्रत्येक खेळ खेळताना घेतलेली काळजी, तत्परता व अतिदक्षता ही जिंकून देणारी असते. जिथे आपण निष्काळजी, बेजबाबदार, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास न ठेवता खेळतो तिथे हारतो हे लहाणपणापासूनच शिकतो. जिंकलो तर गर्व करू नाही व हारलो तर दुःख करू नाही म्हणजे सुखाने हूरळून जाऊ नये व दुःखाने होरळून जाऊ नाही. दुःख पचविण्याची ताकत लहाणपणापासूनच यावी लागते. याचाही प्रत्यय आजच्या जीवनात येतो. जिंकला तर माझ्या सारख्या कोणी नाही असे वाटते. परंतु अपयश पचविता आले नाहीतर माणूस सूडभावना, व्यसनाधिन होणे किंवा मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे असे भाव जागृत होतात. खेळण्यामुळे मन प्रसन्न तर होतेच पण बुद्धी कौशल्य व शारीरिक व्यायाम होऊन खेळातील चातुर्य आजही संसारात उपयोगी पडते, तास बुडवून चिंचा बोरे काढण्याचा आनंद काही वेगळाच
लहाणपणापासून मला घरातील वयस्कर माणसांमुळे देवधर्माची आवड निर्माण झाली. पहाटे उठून काकड्याला जाणे नदीला आंघोळ करणे घरातील पूजा पाठ करणे ह्या सवयी लहान वयातच लागल्या. पाचवीत गेल्यावर आमची सहल श्रावणातील तिसर्या सोमवारी शंभूमहादेवाच्या डोंगरावर जात असे. तसेच नवरात्रीमध्ये गडदूबाईचा डोंगरावर जात असे. तसेच नवरात्रीमध्ये गडदूबाईच्या डोंगरावर जात असे. तसेच वनभोजन, भोंडला, भातुकली हे ही खेळ खेळत होतो. पाचवीनंतर सिंहगड, नाशिक, शिवनेरी व धरणे व साखर कारखाने असे पाहून झाले. घरातील मंडळी आम्हांला दोनतीन दिवस पुरेल एवढे पैसे, खाद्यपदार्थ व कानमंत्रही देत असे.
माझी वाढत्या वयाबरोबर प्रगती होत होती. प्रत्येक वर्षी मी बर्यापैकी मार्क मिळवून पास होत होते. तसे शाळेत शिकविलेेलेच मी मन लावून ऐकत असे. घरी अभ्यास होत नव्हता कारण मला हॉटेलातील जो गडी कामावर येणार नाही त्याच्या वाटयाचे काम करावे लागत असे. उदा. टेबल पुसणे कपबशी धुणे, चहा करणे, लाडू बांधणे, जिलेबी व भजी करणे किंवा टेबल वरची ऑर्डर सांभाळणे ही होय. तसेच गावात अनेक प्रकारचे सामने म्हणजे कब्बडी, हॉलीबॉल हे होत असत त्यांचा नाष्टा व जेवणाची सोय आमच्याकडे होत असे. तसेच माझे वडील लग्नाचे मोठे जेवणही करत असल्यामुळे आम्हाला नेहमीचे काम व मोठे स्वयपाक पाहण्याची व करण्याची सवय लागली. वार्षिक परीक्षा व लग्न सराई, एकाच काळात असल्यामुळे गावात नेहमीच बस्त्यांची गर्दी असायची. त्याकाळात अभ्यासाऐवजी 200 ते 300 लाडू बांधावे लागत असे. नंतर मी पेपरला जायचे. शनिवारी गावाचा बाजार असे त्या दिवशी ही शाळेत जाऊ देत नव्हते. बर्याच मुलांचे आई-वडील अभ्यास करत नाही म्हणून ओरडतात, पण आमच्याकडे दुकानात काम केले नाहीतर ओरडत असे वडील नेहमीच म्हणत असे शाळा शिकून पोट भरणार नाही. शाळेबरोबर पोट भरण्याची कलाही पाहिली शिकून घ्या. कुठेही पकडी पहाने घेऊन बसले तरी पोट भरता येईल फक्त अभ्यास करून पोट भरणार नाही. त्यांच्या त्या बोलण्यातली मेख आत्ता आमच्या लक्षात येते, म्हणजे काय? की मुलांनी पुस्तकी ज्ञानाबारोबर पारंपारिक धंदे वा कुठल्याही धंदा न लाजता करण्याची कला अवगत केली पाहिजे खूप शिक्षण घेतले तरच नोकरी चांगली मिळते दुसरीकडे काम करणे कमीपणा वाटतो.
बघता-बघता माझी सातवी होऊन मी आठवीत गेले. सातवीनंतर मी प्रथम मुंबईला गेले व एक महिना राहून आले तसेच आमच्या घरी सिझनीबल धंदे होते. गणपतीच्या मूर्त्या राख्या, बैलपोळ्याचे सामान दिपावलीत फटाक्याचे स्टॉल व होळी व गुढीपाडव्याला साखरेच्या गाठ्या असे असत, बरेच प्रकाराचे ज्ञानार्जन होणारे व्यवसाय वडिलांनी सुरू केले तसेच दुकान लावत असे. परंतु शाळेत सहल निघाली की ते केव्हाच नाही म्हणत नसे. सहलीला नेहमी पाठवत असे म्हणून अजिंठा वेरूळ, दौलताबाद किल्ला, भोर-भाटघर धरण, औरंगाबादचा बिवी का मकबरा, गोवा, किर्लोस्करचा कारखाना, काच कारखाना व अनेक प्रेक्षणिय व तिर्थक्षेत्र पाहून झाले.
माझे जीवन हे चांगले चालले होते. कष्ट करून का होईना परंतु चांगले जीवन जगत होतो. लहान वयात वडील व्यसन करणारे नव्हते, परंतू आम्ही चारही भांवडे मोठे झाल्यानंतर त्यांना मित्रमंडळीमुळे व्यसन लागले. केव्हातरी चोरून पिणारे नंतर नंतर उघडपणे पिऊ लागले. अती पैसा माणसांला बेधुंद करतो याचा प्रत्यय आला. पहिले दोन तीन वर्षे काहीही वाटले नाही. परंतु शेवटचे चार वर्ष आमचे फार वेदनाप्रत गेले. मला त्याचे फार वाईट वाटत होते. मोठी मुलगी म्हणून त्याचे हे सर्व जवळून अनुभवले एकीकडे माझी जबाबदारी वाढत होती. दुकानावर कोणाचेच. लक्ष लागत नव्हते.
थोड्या दिवसात दुकान बंद झाले. माझी दहावी होती. दुकानाची अर्धी जागा भाड्याने दिली व अर्ध्या जागेत किराणा मालाचे दुकान चालु केले. मी थोडी मोकळी झाल्यामुळे पुण्यात मामा व चुलते यांचेकडे अधून मधून जात होते. पुण्यात राहिल्यामुळे थोेडे बाहेरचे जग कळू लागले.
मी दहावी नंतर थोडे आत्या व मामी यांचे पाहून मशिनकाम शिकले, रोज बारा आणि व दीड रूपया या प्रमाणे रोज तीन चार ब्लाऊज व चोळ्या शिऊ लागले. साड्यांना फॉल लावणे हे ही शिकले तशी मी हॉटेलमधील रद्दी पेपरवर कपड्याची कटींग करणे हा छंद जोपासत होते. मला डी.एड. शिक्षिका होण्याची फार हौस होती परंतु दहावीत माझे गणित व इंग्रजी हे विषय गेले होते. नंतर मी पौढ वर्ग शिकविण्यासाठी आळंदी येथे तीन शिबिरात प्रशिक्षण घेतले. वाड्यापासून जवळच असलेल्या तिफनवाडीत दहा ते एक सकाळी बालवाडी व रात्री सात ते आठ पर्यंत पौढ वर्ग चालवत होते. सायंकाळी पाच ते सहा एक तास मुलांची शिकवणीही घेत असे. पैसा मिळविण्याची कला मी बरीचशी आत्मसात केली. लोकरीचे विणकामही शिकले परंतु दाराचे तोरण व ताटावरचे रूमाल यांच्यात फार वेळ जातो. आणि कोणी विणाल्यानंतर पैसे देतीलच असे नाही. म्हणून मी शिलाई काम खूप करत होते. तसेच हा व्यवसाय माझे पोट भरण्याची कला म्हणून मी त्याच्याकडे पाहू लागले. माझ्या आजोबांनी मला चोळी व परकर शिवण्यास शिकविले.
मी व माझ्या मैत्रिणी वयाबरोबर उंचीने व अंगानेही वाढत होतेे. थोडे खेळ कमी झाले. घरातील कामाच्या जबाबदार्या एकीकडे वाढत होत्या. घरातील दिवाळीची कामे उदा. घरे सारवणे, भांडी घासणे, गोधड्या धुण्यास नदीवर जाणे व कपडे धुणे ही सर्व कामे आम्ही करत होतो. गोधड्या धुवून झाल्या की, मनसोक्त पाण्यात डुबत होतो पोहता येत नसल्यामुळे जास्त खोल पाण्यात जात नव्हतो. रंगपंचमीलाही खूप रंग खेळून झाला की घरातील पाणी संपविण्यापेक्षा आम्ही सर्व नदीवर अांघोळीला जात होतो. एक दोन वेळा मैत्रिणी बुडण्याचा प्रकार झाला तेव्हापासून मैत्रिणीबरोबर नदीवर जाणे बंद झाले. एखाद्या तासाचे शिक्षक आले नाहीतर चिंचा, बोरे व कैर्या पाडण्यास जात होतो. दुसर्या तासाला उशिरा गेलो म्हणून मार बसत असे. घरी कळाले की घरी ही मार बसत असे. पुन्हा शाळेत येऊन घडलेला वृत्तांत आंम्ही जसाच्या तसा सांगयचो. पैसे काढून आतकुल भातकुल खेळायचो माझ्या मैत्रिणींची नावे अशी आहेत. रंजन, प्रतिभा, बेेबी, उषा मीना, लता, आशा, सुजाता, शारदा, सुरेखा, नझमा, रिजवाना, हूरमत, सरला इ. आठवी नंतर प्रत्येकीचे एकएक वर्षाआड लग्न झाले. आमच्यात रूसवे-फुगवे हे क्वचितच होते. माहेरी आलो तर केव्हातरी गाठ पडते. पण बर्याच मैत्रिणींची खूप वर्षे भेट झाली नाही. आता आम्ही एकमेकींचे फोन घेतो. व आवर्जून घरी जाऊन भेटण्याची इच्छा पूर्ण करतो. जुन्या आठवणींना उजाळा देतो, वर्गणी काढून केलेले कार्यक्रम त्याचा ठेवलेला हिशोब तेवढ्यात तेवढे कसे खर्च बसविता येतात हे त्या वेळी शिकलो. चार आठाणेे कमी पडल्यास खर्च आमच्या मामीकडे जाऊन हिशोबाचा ताळमेळ बसवत असे. आमच्या मामीकडून घेतलेल्या सामानाचा हिशोब करून उरलेले थोडसे पैसे देवून हिशोब मिटवत असे. पैसे कमी पडले की मामीला थोडेसे द्यायचे, एकदा चारणे कमी म्हणून लहान मुलीला घेतले.
शाळेत प्रत्येक वेळी झेंडावंदन, राष्ट्रगीत, स्वागतगीत किंवा शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम यात भाग घेत असे. गावात कोणताही कार्यक्रम आला की, आंम्ही सर्व मुली पहायला जात होतो. जुन्या काळात चित्रपटगृह नव्हते. परंतू मराठी शाळेच्या बाजूला भव्य पटांगण होते. काही चित्रपट मराठी शाळेपुढे होत होते. कालांतराने चारही बाजूने कापड लावलेले आनंद टॉकीज मराठी शाळेपुढे चालू झाली. घरातील मंडळीबरोबर किंवा मैत्रिणी बरोबर प्रत्येक शनिवार व रविवार आम्ही चित्रपट पहात असे. तसेच आमच्या घरी अभ्यास होत नव्हता म्हणून मामाची मुलगी माझ्या वर्गात होती तेव्हा तिच्या बरोबर राहून रात्री 12 ते 1 पर्यंत अभ्यास करत असे. रात्री जर अभ्यास कमी झाला तर पहाटे उठवून अभ्यास करत होतो. मी धंदापाणी करून लग्नाआधी फार दुःख काढत होते. मशिन काम शिकवण्या बालवाडी व प्रौढवर्ग हे सर्व करून फार दमत होतोे. प्रत्येकजण तुझे फार चांगले होईल पण लग्नानंतर तुला सर्व्हिस करणारा मुलगा मिळाला पाहिजे असे वाटत होते. सर्वांचेच आर्शीवाद माझ्या पाठीशी होते. मी फार नाजूक होत, तसेच माझा स्वभावही मायाळू होता.
एक दिवस दुपारी एक वाजता नोंव्हेबर महिन्यात माझे सासरे व वडिलांचे मामा हे पहाण्यास आले. मी बालवाडीवर गेले होते घरात चुलते वैगेरे पाहुण्याबरोबर बोलायला आलेले नव्हते. ते येईपर्यंत आमच्या इकडे राहणार्या भाऊसाहेबांना बोलाविले, ते आले, परंतू ते एकमेकांकडे पाहून हासू लागले. त्याचे कारण आईने विचारले कारण असे होते, की गाडीत जागा पकडण्यावरून त्यांचे व माझ्यासासर्यांचे भांडण झाले होते. नंतर मला रितीरिवाजा प्रमाणे प्रश्न विचारले मुलगी पसंत आहे असे सांगितले. आईने पण या स्थळाला होकार दिला कारण हे स्थळाची माहिती माझ्या वडिलांच्या कानावर गेलेली होती.
माझे वडील यांचे निधन 2-9-1980 या दिवशी झाले. त्यांना तीन महिने जाऊन झाले होते. आंम्ही सर्व दुःखात होतो. पण मुलगा मुंबईला सर्व्हिसला आहे. व मुलीचे लग्न वर्षाच्या आत करायचे म्हणून लग्नाला सर्व तयार झाले. हे स्थळ वडील असताना आमच्या मावशीने सांगितले होते, म्हणून मुलाला पहायला पाठवा असे सांगितले. 10-11-1980 साली हे सर्व परिवारासह पाहण्यास आले. आमची पंसती झाली. मुलाला रजा नाही दोन दिवसच तो गावी आहे. तुम्ही आजच आळे या गावी बैठकीला या असे सांगितले, वाड्यावरून काही मंडळी आळे या गावी गेले व माझे लग्न 11 नोव्हेबर ला ठरले. सहा महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरली. सर्व मुलगा काय करतो असे विचारू लागले. मुलगा भायरवळ्याला खटावमील मध्ये काम करतो असे सांगितले. लालबागला खोली आहे असे सांगण्यात आहे.
माझे पति सतिशशेठ बापूराव वाव्हळ रा. आळे, ता. जुन्नर जि. पुणे यांचे बरोबर व21-5-1981 व गुरूवार या दिवशी आळे या गावात विवाह झाला. दोन भांवाची एकत्र लग्न झाली हे मुंबईला कापड मील मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी 1973 मध्ये कामाला लागले. गिरणी कामगारांना एवढा पगार नव्हता. तिन्ही पाळ्यामध्ये म्हणजे तीन शीफ्ट ( फस्ट,सेकंद व थर्ड) असे होते.
लग्न फार थाटात झाले होत, दुसर्या दिवशी हळद उतरविणे व सत्यनारायणाची पूजा झाली. घरात खूप पाहुणे मंडळी होती. चार-आठ दिवस निघून गेले गावातील सर्व देवांना जाऊन आलो. त्यानंतर आमची एक एक बोळवण झाली. इकडच्या चाली-रिती, वागणे-बोलणे या सर्वात फरक वाटत होता. माहेरी केव्हाही न केलेली कामे सासरी करावी लागत होती. बर्याच गोष्टीवरून बोलणी खावी लागतात हे कळाले. सासर-माहेर या मधला फरक जाणवत होता. सासरी कितीही चांगले असले तरी माहेरची ओढ लागते. कारण माहेरच्या माणासांना सोडून आल्याचे दुःख मनात सतत बोचत असते. माझेतर वडील जाऊन नऊ महिनेच झालेले होते आणि मी एक जबाबदार मोठी मुलगी आई व लहान भांवडे सोडून आल्याचे दुःख फार मोठे होते. आईला व काका काकू नाना नानी यांना वाईट वाटू नये म्हणून मी फार आनंदात आहे असेच भासवत होते. मी एक महिना आळे या गावी राहिले. नंतर आम्हाला घरातून सर्व सामान म्हणजे लग्नात माहेरची आलेली भांडी देवून मुंबईला जाण्यास सांगितले. आळ्याला पाण्याची सोय नव्हती म्हणून तिथेही आडाचे पाणी भरावे लागत असे.
तसा आमचा सासरचा परिवार माहेरपेक्षाही मोठा आहे. पाच-सहा सासरे त्यांची मुले व मुली बहिणी भाचे नंतर आमच्या नणंदा-दिर व भाचे-नदावे हे सर्व दीडशेच्या जवळपास होतील माझे सर्व सासरे मुंबईत कामाला होते. कालांतराने फक्त सख्खे सासरे गावी रहाण्यास आले. आमचे हे त्यांचे चुलत्या बरोबर रहात होते व त्यांच्या बरोबर कामही करत होते.
आम्ही दोघे 20-06-1981 ला मुंबईला गेलो 21-06-1981 ला आमच्या संसाराची सुरूवात झाली. दिवसभर संसारात लागणार्या गोष्टी दुकानातून घेवून आलो व आमच्या संसाराचा श्री गणेशा सुरू झाला. जवळ लालबाग मार्केट होते. भाजी, किराणा, मच्छी व इतर सामान सर्व काही जवळच होते. आमचा हा गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असणारा सर्व सुखसोयींनी उपलब्ध होता. सर्व नातेवाईक जवळजवळ रहात होते. हे कामावरून आले की आम्ही रोज एका नातेवाईकाकडे जात असे. मुंबईतील सर्व प्रेक्षणिय स्थळे पाहून झाली. आम्ही तिथे जाऊन थोडे दिवस झाले होते. आमच्याकडे आमचे दोन नंबरचे सासरे रहाण्यास आले होते. आमचा नविन संसार पहाण्यास घरातील काही नातेवाईक आमच्याकडे येत असत. आमच्या या गिरणगावात बरीच चित्रपट गृहे आहेत. आम्ही चार ते आठ दिवसाने सर्व टॉकिजला लागणारे चित्रपट पहात होतो. लालबागला आम्ही गणेश टॉकीज समोरच रहात होतो. जयहिंद, भारतमाता, पॅलेस,दिपक, कोहिनूर ओडियन मराठा मंदिर, सहकार, चित्रा, हिंदमाता, व काही नाट्यगृह येथे लागणारे बरेच चित्रपट पाहिले. बस टॅक्सी व पायी फिरून बरीच ठिकाणे पाहिली तसेच आमची दहा बाय बाराची खोली होती. दोन्ही बाजूला कॉमन गॅलरी बाहेरच्या हायवेलगतच आमची खोली होती बच्चूपरदेशी चाळ, दुसर्या माळयावर आम्ही रहात होतो. खोलीत पाणी व बाथरूम नव्हते. लग्नाअगोदर बाथरूम बांधले डोक्यावर पाणी वाहिले नव्हते परंतु मुंबईत राहून पाणी भरावे लागले. आमच्या माळ्यावर आमच्या गावची दोनच बिर्हाडे होती. बाकी सर्व मालवणी कोकणातील होते. या सर्वांशी मैत्री झाली काही सणवार केल्यावर ते आम्हाला व आम्ही त्यांना देत असे. त्यांची मुले माझ्याकडे ठेवून भाजीला जात असे. त्यांच्या मुलीही मला रात्रपाळीला सोबत करत असे. सासूबाईनी मुंबईला आल्यावर शिलाईकाम करण्यासाठी मशिन घेवून दिले. आजूबाजूचे रेडिमेड डझनावर मिळणारे काम मी अधून-मधून करत असे. चांगला जम बसविला होता.
वर्षभर खूप मजा करतो ना करतो तोच आंमची गिरणी बंद पडली. 18 जानेवारी 1982 साली मुंबईतील सर्व गिरणी कामगार संप पडल्यामुळे बेरोजगार झाले. आंम्ही त्या दिवशी गावाकडे आलो. मी शिलाई मशीन गावाला आणली नाही म्हणून सासूबाई नाराज झाल्या. मग रोज शेतात काम करावे अशी सर्वांची इच्छा होती. आम्ही दोघे तिघे रोज शेतात जात असे. तसेच आमच्या गावी पाण्याचे नळ नव्हते. म्हणून रोज आडाचे पाणी भरणे कपडे-भांडी करणे,सडा-सारवण रांगोळी काढणे, इस्त्री करणे, स्वयंपाक, व निवडणे-टिपणे झाडणे ही सर्व कामे करून शेतातही जावे लागत असे. आमच्या घरातील वातावरण तसे चांगले होते. सासरे फार जीव लावत असे. सासरच्या मंडळीना सुनेला वागवून घेण्याची सवय नसते. सूनही हुडबूज असते म्हणून अधून-मधून वातावरण गढूळ होत असे. म्हणून म्हणतात संसार म्हणला की भांड्याला भांडे लागणारच ते त्यांच्या जागी व आपण आपल्या जागी बरोबर असतो, असे जरी वाटत असले तरी आपल्या चूका दुसर्याने दाखविल्याशिवाय कळत नाही. आणि तरच आपल्यात सुधारणाा होते. आपण आपल्यात काळानुसार केलेली सुधारणा चांगले-वाईट यांचे ज्ञान होऊन आपल्याला मोठेपणाच्या शिखरांवर नेवून ठेवते. म्हणून म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. मला सासरी एक अनुभव आला आपली चुक असो वा नसो मी चुकले मी असे करायला नको होते. असे म्हणून वाद वाढविण्यापेक्षा मिटविण्यात मोठेपणा असतो हे कळाले घरातीेल मोठ्या माणसांच्या चूका दाखवून देणे ही पण चूक केव्हा करू नये हे कळाले.
ह्यांचा स्वभाव फार तामसी होता परंतु सर्वाना शांत, मितभाषी असल्यामुळे वाटत होता. त्यांचे गावाकडे मोजून चार मित्र होते अधून मधून त्यांच्याकडे जाणे-येणे असायचे बर्याच वेळा आंम्हाला जेवणाचे आमत्रंणही असायचे. घरात एक नंणद व दोन लहान दीर होते. आम्ही गावी असताना नणंदेचे लग्न झाले. नंतर हे मुंबईला आले व दुसरीकडे काम करून मला मुंबईला घेवून गेले आमच्या घरी चांगले होते म्हणून वर्षभर गावी काढले ज्या गिरणी कामगारांचे गावी काहीच नाही त्याचे खूप हाल झाले. माझे हाल म्हणजे मी काम करून खूप आजारी पडले महिनाभर माहेरी राहिले होेते.
आम्ही पुन्हा 10 फेंबु्रवारी 1983 मुंबईला गेलो. आमच्या खोलीत लाईट नव्हती पाहिल्यावर्षी बाजूवाल्याकडून वाईट घेतली होते. वर्षभर ,खोली बंद होती. नवीन मीटर घेऊन लावला. तिसर्या वर्षी माझे धाकटे दीर शाळेला आले. घरातील सर्व काम करून फावल्या वेळेत मशीन काम करत होते. आमच्याकडे दुरदर्शन टि.व्ही. नव्हता थोडे-थोडे पैसे करून आम्ही टि.व्ही. घेतला. आमच्या माळ्यावर साळव्याकडे एकच टि.व्ही. होता मग चाळीतील थोडी मुले आमच्याकडे ही येऊ लागली. आमच्या समाजाच्या तीन-चार खोल्या आमच्या चाळीत होत्या. त्यांचीही मुले आमच्याकडे येऊन बसत असे. तसेच मी रोज यांना मीलमध्ये डबा घेऊन जात होते. आमच्या संसाराची पुन्हा नव्याने सुरूवात झाली. आम्ही खूप फिरत असे मी केव्हा कंटाळा केला तर ते म्हणायचे परत केव्हा फिरायला घेऊन जाणार नाही. असे म्हणताच मी आवरून जात असे. लग्नाला दोन वर्ष होऊन गेले. मुलांसाठी दवाखान्याची सुरूवात केली. खुप आनंदात रहात होतो. तेवढ्यात आमची चाळ जुनी झाली आहे ती खाली करण्याची नोटीस दिली गेली. त्यांच्या भाषेवरून ते मला कळत नसे. मी ते प्रत्यक्ष पहात असे. तसेच माझा भाऊ मुंबई पहाण्यास आमच्याकडे आला. आमच्या खोलीत येणासाठी तो दुसर्यांच्या जिन्यासमोरिल खोलीतून येत असे ते लोक मला म्हणाले हा मुलगा असा काय ? म्हणून मी त्याला विचारले तू जेवत असतानाही त्यांच्या खोलीतून येतो तेव्हा तो म्हणाला की मीच तुला विचारणार होतो की ती लोकं रस्त्यात का जेवतात ? अशी गंमत झाली. दुसरी गंमत म्हणजे हे कामावर गेले की आम्ही आमचे ताट भरून शेजारी नेऊन जेवत असे. एक दिवस सर्व जेवण त्यांच्याकडे नेऊन ठेवले व त्यांच्याकडे भांडणे झाली. माझ्या दीराला फार भूक लागली असे म्हणत असे. एक तासाने वातावरण शांत झाले.मग आम्ही त्यांची समजूत काढून सर्वजण जेवलो. लालबागला दहा दिवस गणपतीमध्ये फार मजा असते. येथील सर्व सुखसोयी सोडून घाटकोपरला जावे लागले.
मराठी माणसाची ओळख सांगणारा व गजवजलेला परिसर सोडून 10-04-1984 ला आम्ही घाटकोपर येथे रहाण्यास गेलो. पन्नास चाळी असलेला व एका चाळीत आठ खोल्या असलेला घाटकोपर पूर्व नायडू कॉलीनी संक्रमण शिबीर येथे चाळीस नंबर चाळीत 316 नंबरची रूम मिळाली. खोलीची रंग रंगोटी केली खोलीच्या पुढे चांगले पाच गुंठ्याचे मैदान होते. नळाला पाणी ही चांगले होते. खोलीपुढे बगीचा केला मोठे भेंडाचे झाड होत त्या खाली कोंबड्याचे खुराडे केले. मस्त पंधरा वीस कोंबड्या पाळल्या माझ्या पूर्ण कॅम्पात ओळख झाली. मी शिलाई काम वाढविले ज्या खोल्या बंद होत्या त्यांची रेशनकार्ड गोळा करून रॉकेल धान्य विकत असे. साड्या विकणे हा ही व्यवसाय सुरू केला. आमच्या बाजूचे लोक फार चांगले होते काही भंडारी तर काही अग्री, तर काही मालवणी, गुजराथी व काही महाडकडचे होते. मी सुट्टीत गावी गेले तर ते सर्व काही पहात होते. मी या खोलीत गौरी बसविण्यास सुरूवात केली. माझे दीर मुंबईत एकच वर्ष राहिले घाटकोपरला गेल्यावर ते तिथे आले परंतू मला शाळा शिकायची नाही म्हणून ते पुन्हा गावी गेले. आजूबाजूची मुले आमच्याकडे टि.व्ही. पहाण्यास येत असे. बाजूच्या मुलीही मला काहीना काही काम करू लागत असे. मी फार नाजुक होते. लग्नानंतर ही माझे वजन छत्तीस किलो असे सात वर्षे होते.
मला मुलांची फार आवड होती. घाटकोपरला गेल्यावर दुसर्या वर्षी मी गावारून जावेची मुलगी आणली. पुन्हा दोन तीन वर्षाने तिचा भाऊ ही आणला. या मुलांमुळे दिवस कुठे जात होता ते कळत नव्हते त्यांची कामे व शाळेत ने-आण वाढली तसेच मी दवाखाना ही चालु ठेवला. खर्चही वाढत होता. घाटकोपरच्या खोलीत असताना माझ्या लहान बहिनीचे लग्न केले. तिलाही लालबागलाच दिले होते परंतू ती माझ्या तिचे घाटकोपरला राहावयास आली. तिचे लहान मुल घेऊन माझ्याकडे रोज येत असे. तिचा मुलगा मोठा झाल्यावर माझ्या मुलांबरोबर शाळेतून घरी आणत असे. तीही गारमेंटमधून काम आणून घरी करत असे व तिचे काम आणून घरी करत असे व तिचे काम करून मलाही थोडा हातभार लावीत असे. असे करताकरिता तिथे आठ वर्ष राहिलो. पुन्हा तिथे मोठी बिल्डिंग होणार असे सांगण्यात आले. मी खुप खरपटी करून त्याच कॅम्पात चाळ नं. 13 मध्ये खोली मिळविली. आमच्या खोलीजवळच शंकराचे मंदिर आहे. नित्यनेमाने रोज मंदिरात जाणे. उपास व औषधे हे सर्व चालुुच होते. बाहेरचेही पहिले. दहा अकरा वर्षे लग्नाला झाली होती. माझ्या विराहित कोणीतरी दुसरे लग्न करण्याचा सल्ला देत असे. पण हे मुले नाहीत म्हणून मला केव्हाच कमीपणा दिला नाही.
आम्ही 1992 साली 13 नं चाळीत राहिला गेलो. तोपर्यंत माझ्या लहान दिराची लग्ने झाली होती त्या रूमवर आणखी एका जावेची मुलगा आला. नंतर दोनतील वर्षाने आमच्याकडे तीन जावांची सहा मुले शाळा शिकण्यासाठी होतो. या मुलांच्या नादाने चाळीतील दुसरी मुले अभ्यास खेळण्यास आमच्याकडे यायला लागली ही मुले मला मम्मी व त्यांना पप्पां म्हणत बाकीचे चाळीतीलही आम्हांला पप्पा-मम्मी म्हणून हाक मारत असे. यामुळे मला देवी कि होता आले नसले तरी यशोदा होण्याचे भाग्य मिळाले आपले मूल दुसर्याकडे ठेवणे किंवा दुसर्याचे मूल जबाबदारीने सांभाळणे. या दोन्हीही ठिकाणी मायेचा पाझर महानता व उदारता असे गुण असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. मला या सर्व मुंलामुळे घर गोकुळासारखे वाटत होते. मला मुले नाहीत हे कुणाला जाणवत नव्हते. व मला मूल नसल्याचे दुःख ही होत नव्हते. ह्या मुलांमुळे लग्नानंतरचे अठरा वर्षोपर्यंतचा काळ सुखाचा गेला.
या तेरा नंबर चाळीत आठ व समोरच्या आठ अशा सोळा खोल्यांचा राबता होता. इथे काही मराठी तर काही तेलगू व काही युपीवाले होते. माझी सर्वाबरोबर ओळख झाली मला मुंबईत राहून मालवणी, तेलगू गुजराथी व भैय्याची भाषा समजू लागली. आमची मुले शाळेत फार हुशार होती तशीच चाळीतील सर्वच त्यांचे लाड करत असे. मुले खेळण्यातही खुप हुषार होती नेहमी नंबर काढत असे. मी पाचवी पर्यत चांगला अभ्यास घेत होते नंतर जमेल तसा घेत होते वेळ न मिळाल्यामुळे त्यांना शिकवणी लावली होती. आमची व आमच्या मुलांची चाळीत केव्हा भांडणे होत नव्हती चाळीतील लोक आम्ही गावाला गेलो तर त्यांना करमत नव्हते. असे म्हणत असे. आमच्या चाळीपुढे फार मोठे वडाचे झाड होते. घरातील कामे आटोपली की तिथे खुर्ची टाकून हवेवर बसत असे. सहा सात वर्ष तिथे रहात नाही तोच नवीन संकटाची चाहूल लागली. आमच्या कापड गिरण्या कायमच्याच बंद होणार हे कळाले.
आम्ही 24 एप्रिल 1997 ला थोडे घरसमान घेऊन मुंलासह पुन्हा गावी आलो. यांनी तिथे एकाच वेळी दोन ठिकाणी काम केले होते त्या पैशांचा फ्रिज घेतला होता. फ्रिज, टि.व्ही. हे सर्व घेऊन आलो. पुन्हा 1982 च्या संपाची आठवण झाली ते म्हणाले गावी आपले चांगले आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. आता आपण त्यांची अठरा वर्ष मुले सांभाळली आता आपले जीवन चांगले जाईल. पण प्रत्येक दिवसाला व प्रत्येक महिन्याला वेगवेगळा अनुभव आला. घरातील लोकांनी आमचा पुन्हा पुणा येथे दवाखाना चालु केला. पण छे आम्हाला केव्हा यश आलेच नाही. सव्वा वर्षे एकत्र राहिले. तसेच आमचे घर पुना-नासिक हायवे वर पुणे जिल्ह्यात, जुन्नर तालुक्यात आळेफाटा येथे आहे. आमच्या घरी हायवे लगत सर्वाचे ढाबा, बियर बार लॉज व शेती हे आहे. आमचे सर्विस स्टेशन होते. ढाब्यावर नेहमीच भांडणे होत असत अशाच एका भांडणात यांना फार लागले होते. हात पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना काहीच काम करता येत नव्हते त्यांना मुंबईला ऑप्रेशन साठी न्यावे लागले. आमचे सासरे म्हणाले तुम्ही तुमचे मुंबईला सुखी रहा इथे तुमचा निभाव लागणार नाही. पुण्याचा दवाखाना बंद केला व पुन्हा मुंबईला गेलो. ऑगस्ट 1998 ला मुंबईला आलो. मुंबईत पोट भरण्याची चिंता होती तर औषधे कुठून करणार मुले होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या त्या पुन्हा मावळल्या.
आम्ही गावी आल्यानंतर आमची खोली माझ्या बहिणीला राहण्यास दिली होती. तिच्यामध्ये राहून आम्ही थोडे दिवस काढले. तिच्या पडत्या काळात आम्ही तिला साथ दिली व आमच्या पडत्या काळात त्यांनी साथ दिली. नंतर समोरच्याच चाळीत त्यांना खोली भाड्याने मिळाली. मी सर्व जुन्या गिर्हाईकांनां जाऊन भेटले मी पुन्हा गावावरून आले मला गावची हवा मानवत नाही म्हणून सांगितले मी पुन्हा जम बसविला तसेच हे कुठचेच काम करू शकणार नव्हते. ते म्हणाले मी नारळाची गाडी लावतो. असे म्हणताच माझ्या डोळयात चटकन पाणी आले. गावी जाऊन आपले फार नुकसान झाले, पण काम गेल्यावर मुंबईत काय करणार मुंबईत आम्ही मुले घेऊन रहातो परंतु थोडे दिवस तुम्हांला महिन्याला पैसे घ्यावे लागेल असे विचारले होते. मुले गावीच रहातील असे सांगितले.
आमच्या घरची माणसे व परिस्थिती चांगली आहे सर्वकाही स्वातंत्र्य आहे. लाड ही पुरविले जातात. बाहेर फिरण्यासाठी टू-व्हिलर व कार आहे. एकत्र कुंटूबात मी मोठी सून म्हणून मान ही आहे. घरी शेती असल्यामुळे ते थोडे फार कामही करावे लागत असे. प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे शक्य होत नाही. तरी मी गावी रहाणार नाही असे म्हणले नाही. कारण मला हे म्हणले असते तू मला भरल्या घरातुन उठवून आणलेस हे विधान मला आवडले नसते.
माणूस म्हणतो जास्त पायाजवळ पाहू नये दूरदृष्टी ही असावी आज ह्या मुलांचे केले तर हिच मुले पुढे आपल्या कामाला येतील पण त्यानंतर क्षणभर वाटले ह्या मुंलासाठी माझा वेळ पैसा सर्व खर्च केला, मी हा राखून राहिले असते तर आज खूप संपत्ती साठविली असती. मी मुंबईत बरीच स्थावर मालमत्ता करण्याचा विचार करत होते पण आपल्या गावी खुप आहे, मला त्याची गरज वाटत नाही. मी म्हणाले बाकी सर्व जाऊद्या पण आपल्याकडून सर्व मुलाचे अर्धवट शिक्षण झाले. मुले कोणीतरी पदाधिकारी झाल्याचे स्वप्न माझे अपूर्ण राहिले नंतरही त्यांच्या आईवडिलांकडून ही जास्त शिक्षण झाले नाही प्रत्येकजण आपले पारंपारिक धंदे सांभाळत आहे.
मला मुंबईत करमत नव्हते तेवढ्यावरून. आम्ही पुन्हा गावी राहाण्याचा निर्णय घेतलाजवळ असलेला ऐवज मोडून बंगला बांधण्याचा विचार केला. अनंतचतुर्थीला भूमीपूजन करून 720 चौ. मी. बंगला बांधला बंगल्याचे बांधकाम तीन चार महिन्यात उरकले.
18 डिसेंबर 2000 ला मार्गशिर्ष महिन्यात सोमवारी वास्तूशांती झाली. सासर व माहेरचे तसेच गावातले जवळ जवळ हजार माणसे कार्यक्रमास आली. आमच्या वाटणीत सर्व्हिसस्टेशन आले होते. ते आम्ही 2001 ला विभक्त करून घेतले. एक एकर शेती ही होती. त्या मध्ये उत्पन्न घेऊन कसे तरी भागवत होतो. आम्हा शेतीसाठी पाच बोअरवेल घेतल्या त्यामध्ये तीनला पाणी लागले नाही दोन बोअरवेलला खूप पाणी लागले. जो-तो आपला धंदा व शेती पहात होता आम्हाला गावी पैसे पुरत नव्हते चार-पाच वर्ष मुंबईवरून पैसे आणून खाल्ले. नंतर आम्ही अर्धा एकर शेतात दीडशे सीताफळ लावली. शेतात कांदा, गहू, हरभरा, मूग उडिद व भुईमूग ही पिके घेत होतो. मला ऊन सहन होत नव्हते. म्हणून मी थोडे फार सावलीत बसून काम करत असे. गावी राहून सर्व नातेवाईकांकडे कार्यक्रमांस जातो. व तेही आमच्या कडे येतात. गावचे हवामान आम्हाला चांगले मानवले आमची खोली पुन्हा बहिणीकडे ठेवली. वर्षातून दोन वेळा आम्ही खोलीवर जातो.
आमचे तसे सर्व काही चांगले चालले होते. मी वर्तमानपत्र केव्हा घेत नाही परंतु शब्दकोडे मुंबई चौफेर व संध्याकाळ हे पेपर घेऊन सोडवत असे. 2006 ला मी कानाचे ऑप्रेशन केले. 2007 मी 2 महिने आजारी होते त्यात बराच खर्च झाला त्यानंतर 2007 सप्टेंबर ला गाडीवरून पडले. खांद्याला मार लागला त्यामुळे मला 2 तीन वर्ष व्यवस्थित काम करता येत नव्हते. आमची गावी राहून कोणाशी भांडणे नव्हती.
तसेच आमच्या मील चे प्राव्हिडंट फंड व सर्व्हिस दहा अकरा वर्षाने मिळाली. आमच्या कडे मुले होती त्यांची सर्वाची लग्न झाली. ते अधुन-मधून सर्व आमच्याकडे येतात. आम्ही अर्धा एकरमध्ये डाळिंब, रामफळ, चिकू, आंबा, पेरू व नारळ लावलेली आहेत. काही फूलझाडे ही लावली आहेत. दुकान विकून आलेल्या पैशांचा बंगला आणखी मोठा केला. तळाची बाजू भाड्याने दिली व आम्ही वरती राहतो.
सर्व काही चांगले चालले होते ऐवढ्यात 16 एप्रिलला भाऊ 2014 ला 11 मे 2014 आई ह्या दुःख देण्याच्या घटना घडल्या. मी बाहेर नेहमी समाजकार्य करत असते ते म्हणजे लग्न जमविणे प्रत्येक कार्यक्रमाला जाणे. माझी आई अधून मधून माझ्याकडे रहाण्यास येत असे मला तिचा खूप आधार वाटत होता. आईची जागा कोणीच भरून काढत नाही. आई गेल्यानंतर आईचे महत्त्व वाटते. तसेच माहेरी अधुन-मधून जाणे, सर्वाची भेट घेणे कारण आमचे आप्पा-काकू, नाना-नानी सर्व भाऊ हे आंम्हाला आईची उणीव व भासू देत नाही. तसेच सर्व भाचे भावंड, मामी-मामी व त्यांचे मुले सुना हे सर्व तितक्याच मायेेने करतात. तसेच माहेरी कोणत्याही जातीधर्माची माणसे भेटल्यास आम्ही एकमेकांची तितक्याच आदराने विचारपूस करतो. सासर व माहेर यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा माझा नेहमीच अट्टहास असतो. मला जास्त बोलून ओळख काढण्यास आवडते. नातीगोती काढून लग्न जमविण्यासाठी या ओळखीचा फार उपयोग होतो. प्रत्येक वधू-वर मेळावे फक्त तेली समाजाचे उपस्थित राहून स्थळांबद्दलची माहिती गोळा करते. मी सर्व ठिकाणी एस.टी. ने फिरले.