माझे मायबाप वारकरी

santaji maharaj palkhi Warkari Ratnaparkh

  श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.

तुझ्या वडिलो वडीली निर्धारी I चालविली पंढरीची वारी II
त्यासी सर्वथा अंतर न करी I तरीच संसारी सुफळपणा II

    प्रत्येक काम वेळच्या वेळी करणारे शिस्तप्रिय असे आमचे वडील श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (तेली गुरुजी).”येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो I हा होईल दान पसावो II येणें वरें ज्ञानदेवो I सुखिया झाला...II” हा त्यांच्या रोजच्या नित्यकर्मातील ज्ञानेश्वरी वाचनानंतरचा पसायदानाचा समारोप अजूनही कानात घुमतो आहे.

माझे लहानपण, मला आठवतात आंघोळी नंतर हरिपाठ म्हणणारे माझे वडील, रोज सकाळचे ज्ञानेश्वरी वाचन संपवूनचकॉफी घेणारे, नेहमीच्या वेळेत स्वयंपाक घरात चुलीपुढे भाकरी करणाऱ्या आई समोर पाटावर बसून जेवताना गरम भाकरीचा पापुद्रा माझ्या तोंडात घालणारे, वेळेवर शाळेत पोहचून स्वतः घंटा देणारे ..आमचे आप्पा... इतके वक्तशीर की गावातील लोक त्यांच्या घंटे बरोबर आपली घड्याळे लावत.

आयुष्यातील ३७ वर्ष शिक्षकी पेशात घालवलेल्या आमच्या आप्पांची २७ वर्षांची शिक्षकी सेवा एकाच गावातील. मु.पो. धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे ..

धोतर, नेहरू शर्ट, पांढरी टोपी हा वेश परिधान करणारे, मोजकेच बोलणारे, कडक स्वभावाचे आमचे वडील रोजच्या ज्ञानेश्वरी वाचनानंतर दिसत ते शेजारील लायब्ररीच्या ओट्यावर वर्तमानपत्र वाचताना, गावच्या लोकांशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना. त्यांच्या शिस्तप्रियतेचा प्रभाव सर्व गावावर पडलेला जाणवत असे.

दिवसभरात शाळेतील कामकाज संपवून झपाझप चालत आप्पा घरी येत. नंतर बरोबरीच्या शिक्षकांबरोबर हॉलीबॉल खेळतानाही त्यांचे लक्ष विद्यार्थांच्या प्रगतीकडेच असे. रात्रीच्या जेवणानंतर श्री. वामने यांचे दुकानात सामुदाईक ज्ञानेश्वरी वाचनाचा नित्यनेम कधी चुकत नसे. सकाळच्या घरातील ज्ञानेश्वरी वाचनाबरोबरच याही वाचनाची समाप्ती नित्यनेमाने साजरी होई. प्रसादासाठी आम्ही सर्व मुले या समाप्तीची वाटच पहात असू.

आमची आई सौ. सुभद्रा रामचंद्र रत्नपारखी (तेलीण बाई) हिलाही अध्यात्माची, देवधर्माची आवड. काकड आरतीच्या वेळी, भजनात व इतर कार्यक्रमात आपल्या खणखणीत पण गोड आवाजात अभंग, गवळणी व भारूड यांच्या गायनात ती सदैव पुढे असे. 

उभयतांच्या भक्तिमार्गाच्या वाटचालीत,गाव परिसराबरोबरच आजूबाजूच्या गावात होणाऱ्या प्रवचन, कीर्तन श्रवणासाठी ते मलाही बरोबर नेत. अगदी वयाच्या ८ व्या वर्षापासून महान कीर्तनकार मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज, साखरे महाराज व समकालीन कीर्तनकारांच्या कीर्तन श्रवणाचा लाभ मला त्यामुळेच झाला.

आमच्या आईचे विठ्ठलभक्त वडील श्री दत्तात्रय लक्ष्मण काळे हे एक परिपूर्ण, प्रसन्न, वारकरी व्यक्तिमत्व. आषाढी, कार्तिकीची त्यांची वारी कधी चुकली नाही. त्यांचे बरोबर वारीच्या वेळी पंढरपूरला गेल्याचे व पहिल्यांदा विठ्ठल दर्शनाचा लाभ झाल्याचे अजूनही आठवते.  त्यांच्या नंतर १९७४/७५ पासून आमचे मामा श्री कोंडीराम द. काळे, मोठी मावशी सौ. हरणाबाई, काका श्री दामोदर क्षीरसागर, धाकटी मावशी बबिता , काका श्री पुरुषोत्तम द. वाव्हळ यांचे सोबत आईचीही पायीवारी सुरु झाली ती केंद्रे महाराज दिंडीतून. काही वर्षातच १९७८ साली श्री संताजी महाराज पालखी सोहळा सुरु झाला. सर्वजण त्यामध्ये सामील झाले. वडिलांचा मात्र नाईलाज होता, कारण शिक्षकी पेशा.. अखंड नोकरीच्या काळात रजा अगदी अपवादानेच. 

ज्ञानेश्वर, तुकाराम व इतर सर्व संत साहित्याचा अभ्यास असणारे, विठ्ठलभक्त असे आमचे वडीलही १९८१ पासून (निवृत्तीनंतर) वारीत सहभागी झाले. त्यांचे बरोबरच श्री मुरलीधर तु. रत्नपारखी (चुलते) गं. भा. शांताबाई ब. रत्नपारखी (चुलती), श्री जगन्नाथ गवळी, श्री गजानन शेटे, श्री कुलकर्णी काका व इतर अनेकजणही पायी वारीत सहभागी झाले. आपल्याबरोबर वारीत येण्यासाठी ते अनेकांना प्रोत्साहन देत. त्यासाठीच्या त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्नते मनापासून करत.आपण केलेले दान, मदत या हाताची त्या हाताला कळू नये अशी त्यांची शिकवण होती. आपल्या शिक्षकी पेशातून हजारो विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण देतानाच अंधश्रद्धेला थारा न देण्याची दीक्षाही त्यांनी अनेकांना दिली. एकदा सुरु केलीली पायी वारी त्यांनी शेवटपर्यंत चुकवली नाही. दर महिना एकादशीची त्यांची आळंदी वारीही कधी चुकली नाही. आई वडिलांच्या नंतर मीही वारीत सामील झालो. त्यावेळी त्यांच्या वारकरी मित्रांशी व इतरांशी बोलताना आमच्या विठ्ठलभक्त मातापित्यांची थोरवी अधिकच जाणवली. 

पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थव्रत ||

या तुकारामांच्या अभंगाची प्रचीती मला माझ्या आई वडिलांच्या सहवासात लाभली आहे. सतत दुसऱ्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांनी सर्वांसाठी त्यागभावना ठेवून आपल्या जवळचे दुसऱ्यालाही देण्यात आनंद मानला.

आमचे आप्पांचे चालणे भरभर, पण वारीत इतरांसाठी त्यांनी आपल्या वेगाला आवर घातला. भजनाचे अंग नसले तरी भजनकरी वारकऱ्याबरोबर आत्मीयतेने प्रेमळ व्यवहार ते करत. खाण्यापिण्याबद्द्ल केव्हाही तक्रार न करणारे ते एकमेव वारकरी होते.

स्वच्छतेची आवड असणारी माझी आई करारी स्वभावाची व वडिलांप्रमाणेच  शिस्तप्रिय होती. पालखी सोहळ्यातील वारकरी बंधू-भगिनीच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यास ती मुळीच कचरत नसे. भोजनापूर्वी गोड आवाजातील तिच्या गवळणी ऐकत रहावे असे सर्वांना वाटे. वारीतील अडचणीच्या काळात स्वतः स्वयंपाक करण्यास ती आघाडीवर असे. तिच्या हाताला खंरच चव होती.

ठेविले अनंते तैसेची राहावे I चित्ती असो द्यावे समाधान II  

ह्या ओवीप्रमाणे उभयतांनी पायी वारीमध्ये ऊन, वारा, पाऊस याबद्दल केव्हाही अडी -अडचणींचा पाढा वाचला नाही. दर वर्षी जून महिन्यात आमच्या शाळा सुरु झाल्यावर आई-वडिलांची वारीसाठी लस टोचून घेणे, वळकटी तयार करणे, खाण्याच्या वस्तूबनवणे अशी धांदल सुरु होई. काही वर्षे आई धामणीतील महिलांसमवेत सासवड मुक्कामी येत असे. सुरुवातीची काही वर्षे आपल्या संताजी महाराज पालखी सोहळ्याला अनंत अडचणीना सामोरे जावे लागले. मुक्कामाला जागा नाही, पिण्याचे पाणी नाही, जेवण बनवण्यासाठी इंधनाची गैरसोय. दरवर्षीच्या वारीनंतर आईचा गौरवर्ण थोडासा काळसर पडे तर वजन ३ते४ किलो कमी झालेले असे. आजारी असली तरीही तिने कधी वारीत खंड पडू दिला नाही.

हेचि व्हावी माझी आस I वारी चुको नेदी हरी II

या तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे तिची कृती होती. मध्यंतरी गोपालपुऱ्यामध्ये काल्याचे वेळी गजानन महाराजांचा हत्ती बिथरला, लोक सैरावैरा पळू लागले. चेंगरा चेंगरी झाली, आमचे बाबा त्यात सापडले पण थोडक्यात बचावले. त्या दोघांनी आपल्या शरीराची क्षमता असे पर्यंत वारी थांबवली नाही. त्यांची श्री. संताजी महाराज व पांडुरंगावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळेच आपल्या उतारवयात त्यांनी ठरवले होते...

आषाडी कार्तिकी सोहळा I चला जावू पाहू डोळा II
आले वैकुंठ जवळा I पंढरीये संन्निध II

    माझ्या आईने ३२ वर्ष तर वडिलांनी २५ वर्ष पायी वारी पूर्ण केली. प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, समाजाला आपण काही देणे लागतो, जे आहे ते सगळे आपले नाही. दानात आनंद मना, मानात नाही. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून शिकवले.श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्याच्या सुरुवातीपासून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यापैकी ते एक घटक होते. त्यांनी पायीवारी करताना वारकऱ्याचा धर्म सोडला नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी २००६ पासून एकदिवस तर २०१२ पासून वाल्ह्यापासून पायी वारी सुरु केली आहे. अशा महान माता पित्यांच्या पोटी जन्म झाला हे मी माझे सदभाग्य समजतो, म्हणूनच मी पुन्हा पुन्हा अभिमानाने सांगेन..

“माझे मायबाप वारकरी”

दिनांक 11-07-2015 12:28:59
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in