वधु - वर फॉर्म

तुकोबाची सावली संताजी जगनाडे

14 July 2019 sant santaji maharaj jagnade 9 views

श्री. अरूण इंगवले

    संतपरेपरेतील अनुल्लेखाच्या  ग्रहणाने ग्रासलेला तेजस्वी तारा म्हणून संताजी जगनाडे यांचा उल्लेख करावा लागेल. तुकारामांच्या प्रभावलीत वावरणार्‍या चौदा टाळकर्‍यात रामेश्वरभट्ट, महादजी कुलकर्णी, कोंडाजी लोकरे, मालोजी गाडे, कान्होबा यांचा समावेश असला तरी, तुकोबांच्या हृदयात स्थान असणारे सहकारी होते गंगाजी मावळ आणि संताजी जगनाडे.  मालोजी गाडे तुकोबांचे जावई होते. आणि कान्होबा पाठचा भाऊ होता. मात्र यापेक्षाही अद्वैताच्या पातळीवर पोहाचलेले एक अनामिक नाते तुकोबांशी जडले होते, गंगाजी आणि संताजी या सहकार्‍यांचे. तुकोबांनी रूढार्थाने कोणालाही शिष्यत्व दिलं नसले तरी तुकोबांचे गुरूपद मनोमन मान्य करून हे दोघे सावलीसारखे सुखदु:खात तुकाबांना साथ देत राहिले. आणि या दोघांत डावं उजवं करायचं म्हटलं तर संताजी जगनाड्याचं नातं तुकोबाशी अधिक निकटचं होतं. या नात्यात एक भावनिक ओलावाही होता.  तुकोबाच्या पहिल्या पत्नी रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला होता. तो दीड दोन वर्ष वयाचा होऊन वारला. रखमाबाईसुद्धा दम्याच्या दीर्घ आजाराने दुष्काळात वारली. तुकारामांना संतू जगनाड्याच्या रूपात यांचा नावाशी, वयाशी साधर्म्य असणारा मुलगाच दिसत होता.

    चक्रतीर्थ उर्फ चाकण आणि ज्ञानोबा माऊलीची आळंदी अशी दोन तीर्थक्षेत्रे चाकण चौर्‍याएैंशी परिसरात होती आणि आता एक नवे भक्तीपीठ तुकोबांच्या वास्तव्यामुळे देहूच्या रूपाने उदयास येत होते. सर्वसामान्य लोकांना कळेल अशा भाषेत निरूपण करणार्‍या तुकोबांच्या कीर्तनाला पंचक्रोशित प्रचंड गर्दी होत असे. तुकोबांच्या कीर्तनाच्या ठिकाणी परिसरातील दहा वीस गावातून भाविक लोटत असत. रोजच्या जगण्याच्या भाषेत मांडलेले अध्याम लोकांना भारून टाकत असे. तुकोबांची कीर्ती आणि लौकीक फार वेगाने पसरत होती. पौष महिन्यात जानेवारी 1640 मध्ये चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात तुकारामांचे कीर्तन होते. तुकारामांचे कीर्तन म्हणजे पंचक्रोशीत आदराचा विषय होता. आजोबा भिवा जगनाडे आणि वडील विठोबा जगनाड्यांच्या वारकरी पंरपरेमुळे आणि अध्यात्मिक वातावरणामुळे संतुला तुकारामांबद्दल ऐकुन माहिती होती. तुकोबा, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वरांचे काही अभंग घरी गुणगुणले जात, नित्य हरीपाठ चाले. संतुला अजाण वयातही ते अभंग भुरळ पाडीत होते. आज तुकोबांना प्रत्यक्ष पहायला ऐकायला मिळणार म्हणुन संतुच्या अंगात चैतन्य संचारले होते.तुकोबांचे कीर्तन नेहमीप्रमाणे रंगले आणि  कीर्तन संपल्यावरच भाविक भानावर आले. मात्र कीर्तन संपल्यावरही संतू देहभान हरपून त्यांच्याकडे पहातच राहिला. तुकोबा त्यांच्याजवळ आले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, विजेचा स्पर्श व्हावा तसा संतूच्या शरीरातून चैतन्याचा लोळ सळसळला. संतू उठला आणि तुकोबांचे पाय धरून, आता मी हे पाय कधीही सोडणार नाही, असे म्हणून तुकोबांच्या पायाला त्याने घट्ट मिठी मारली.

    संतूचे नुकतेच खेडच्या राजगुरूनगर कहाणे घराण्यातील यमुनाबाईबरोबर लग्न झाले होते. तुकोबांनी त्याला प्रपंच, परमार्थ यासारख्या गोष्टींवर मार्गदर्शन करून प्रपंच सांभाळून परमार्थ करण्याची संमती दिली. चाकणपासून आठ - नऊ मैलावर असणार्‍या देहूला संतूचे जाणे-येणे वाढले. तुकोबांचे कीर्तन पंचक्रोशीत कोठेही असले तरी तो टाळकरी म्हणून तुकोबांच्या मागे उभा राहू लागला. पोर हाताबाहेर गेल्यासारखी विठोबांची अवस्था झाली. बाप भिवा थकला होता आणि हाताशी असलेला पोरगा कामधंदा सोडून अध्यात्माच्या वाटेला वळला होता. गडी माणसांच्या भरवश्यावर चार - सहा घाणे सांभाळणे विठोबाला अवघड होत होते . पोरगा हाताशी येणार या हुरूपाने त्याने संतूला अक्षर ओळख आणि हिशोबाचं शिक्षण पंतोजीकडून देवविले होते. मात्र चांगला शिकला सावरलेला एकुलता एक मुलगा व्यवसायाच्यादृष्टीने असून नसल्यासारखा होता. संतूचे अक्षर अतिशय रेखीव आणि घाटदार होते. कीर्तनात तुकारामांच्या तोंडून अचानक अभंगाची गंगा वाहू लागायची आणि आपल्या तीव्र स्मरणशक्तीत नोंदवलेला अभंग संतू वहीत उतरवून ठेवायचा न आठवणारा अभंग सहकार्‍यांशी चर्चा करून उतरून ठेवायचा. आपल्या अतिशय गोड आवाजात धृपद धरायचा. तुकोबांच्या सहकार्‍यांत सर्वांत कमी वयाचा असूनही तो तुकोबांचा कंठमणी झाला. मंबाजी गोसाव्याच्या आदेशाला बळी पडून तुकोबांनी गाथा इंद्रायणीत बुडवली. गाथा पाण्याबाहेर येईल म्हणून इंद्रायणीच्या काठावर तेरा दिवस अन्न पाण्यविना तुकोबा धरणे धरून राहिले. तुकोबांचा अट्टहासी स्वभाव माहिती असणार्‍या संताजीने, गंगाजी मवाळ यांनी भाविकांच्या मनामनावर तरंगणार्‍या अभंगांचे आणि स्वत: उतरवून घेतलेल्या अभंगांचे पुन्हा एकत्रित गाथा तयार करून मरणसन्न झालेल्या तुकोबांचे प्राण वाचविले इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तुकोबांच्या हातची अर्धवट पोथी, बाड तर सोडाच एखादा चिरोटाही अद्याप उपलब्ध झालेला नाही. याचाच अर्थ तुकोबांची गाथा इंद्रायणीने गिळली आणि आज उपलब्ध असलेली तुकोबांची गाथा संताजींच्या हस्ताक्षरात अभंग राहिली. तुकोबांच्या निर्वाणानंतरही संताजींनी स्वहस्ते लिहीलेली तुकोबांच्या अभंगाची गाथा प्राणपणाने जपली. तुकोबांच्या या वह्या त्यांनी आपल्या देवघरात रूमालात बांधून पूजेसाठी ठेवल्या. अनेकांना त्या वह्या नकला करण्यासाठी दिल्या. शाहिस्तेखानाने चाकणच्या संग्रामदुर्गला वेढा घातला. लुटालूट सुरू केली. त्यावेळी कोणताही दागदागिना व  संपत्ती न घेता संताजींनी तुकोबांच्या वह्या घोंगडीत बांधून घेतल्या आणि रात्रीच्या काळोखात आडवळणाच्या गावाचा म्हणजेच सुदुंबर्‍याचा रस्ता धरला. मुघल सैन्याची नजर चुकवित भर पावसात अनवाणी चिखल तुडवीत काट्याकुट्यातुन संताजी 14-15 मैलांचे अंतर तुडवून आपल्या आजोळी वह्या घेऊन सुखरूप पोहोचले. इकडे खानाच्या सैन्याने त्यांचे घर पार लुटून जाळून टाकले होते. मात्र त्यांच्यादृष्टीने पृथ्वी मोलाचं धन त्यांच्या सोबत होते. असाच अग्नीदिव्याचा प्रसंग आणखी दहा वर्षांनी आला. संताजींनी पुन्हा नव्याने घर उभारले. सर्व स्थिरस्थावर होतेय तोवर 1671 च्या अखेरीस दिलेरखानाने चाकणवर पुन्हा झडप घातली. चाकण आणि पुणे परिसरातील नऊ वर्षे वयाच्या वरच्या सर्व माणसांच्या राजरोस कत्तली सुरू झाल्या. लुटालूट आणि जाळपोळीला सीमाच राहिली नाही. पुन्हा ते धन जतन करण्याची फार मोठी जबाबदारी संताजींनी उचलली. महाराष्ट्राच्या भक्तीची दौलत उराशी कवटाळून संताजी बाजरीच्या शेतात लपून बसले आणि नंग्या तलवारी आणि मशाली घेऊन फिरणार्‍या मोगल सैन्याची नजर चुकवून मागच्या वेळेप्रमाणेच सुदुंबर्‍याचा रस्ता धरला. मोगल सैनिकांना रात्रीच्या काळोखातही संशय आला. काहीतरी धनसंपत्ती असावी या आशेने घोड्यावरून संताजींचा पाठलाग सुरू झाला नेहमींची पायाखालची वाट असल्याने एका बाभळीच्या झाडावर काही तास लपून त्यांनी पाठलाग चुकविला. आणि पुन्हा एकदा ही दौलत वाचवली. अंगाला बोचलेले काटे, चिखलात नाहीशी झालेली चप्पल आणि रक्त गोठवणारा पावसाचा गारठा सोसीत पुन्हा पहाटे संताजी सुदुंबर्‍यास पोहोचले. तुकोबाचे काव्य म्हणणे महाराष्ट्राची खरी दौलत आहे आणि ते वाचले केवळ संताजीमुळे !

    तुकोबांच्या काव्य संकलनापुढे त्यांनी आपल्या काव्य प्रतिमेलाही गौणता दिली. जणू आपल्या प्रतिभेलाही त्यांनी तुकोबांच्या अभंगात विसर्जित केले. तुकोबांमध्येच त्यांनी आपले सर्वस्व पाहिले. संताजींचे महानिर्वाण, तुकोबांनी तीन मुठी माती टाकुन मुखकमल झाकणे वगैरे भाबड्या चमत्काराहनही त्यांनी जीवापाड केललं गाथेचं रक्षण हा नतमस्तक व्हावं असा खरा खुरा चमत्कार आहे. संताजींनी हे कार्य केलं नसंत. तर तुकारामांचं मोठेपण काळाच्या काळोखात कदाचित झाकलंही गेलं असतं. इतर अनेक संतांचे दोन चार सुटे अभंग सापडतात तसे तुकारामचें सापडले असते. आणि तुकाराम नावाचाही एक संत होऊन गेला असे म्हंटले गेले असते. 

    तुकारामांच्या अभंगातून त्यावेळचा सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक पट उभा रहातो तो राहिला असताच असा नाही. तुकारामांचे अभंग केवळ अध्यात्म नाही तर तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. आणि केवळ संतांजींच्या थोर कार्यामुळे हा दस्तावेज अभ्यासकांपर्यंत पोहोचला. गावंढळ आणि अनाडी म्हणुन हिणावल्या गेलेल्या संत तुकारामावर आज शेकडो अभ्यासक एम.फिल., पी.एचडी. करत आहेत. अनेक साहित्यिक अनेक पैलूंवर लिहितायत तरीही संत तुकाराम पुर्णांशाने अद्यापही मांडले गेले आहेत असे म्हणता येत नाही.

    तुका आकाशाएवढा होण्यात किंवा संत तुकारामाचा जगदगुरू होण्यापर्यंतच्या प्रवासात स्वत्व विसरून त्यांच्यामागे सावलीसारखे उभे असणार्‍या संताजींचा वाटा फार मोठा आहे. 

santaji maharaj jagnade

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994