वधु - वर फॉर्म

संत संताजी महाराज जीवन गाथा

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 15 views

संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित बसे जवळ ॥ धन्य त्यांचे भाग्य संबळ।संग सर्व काळ तुकयाचे ॥

      महाराष्ट्र ही जशी शुरांची भूमी आहे तशी ही संतांचीही पुण्यभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व ज्यांच्या अभंगवाणीने सर्व महाराष्ट्राला भक्तीरसात बुडवून टाकले अशा संत तुकाराम महाराज व त्यांचेच समकालीन सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत रोहिदास इ. संत होवून गेले. या संत श्रेष्ठामध्ये तेली समाजाचे श्रद्धास्थान असणारे या काळातील संत श्री संताजी जगनाडे महाराज होय. संत वाङ्मयात संतु तेली या नावाने त्यांचा उल्लेख आपणास आढळतो

     श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म शके १५४६ (इ.स. १६२५) मध्ये खेड तालुक्यात (जि. पुणे) चाकण या गावी झाला. आई मथाबाई व वडील विठोबा हे भगवत भक्त माळकरी होते. घरातील भक्तीमय वातावरणाचे बाळकडू संताजीवर लहानपणीच झाले. उपजीविकेसाठी घाण्यावर तेल गाळण्याचा व्यवसाय संताजींच्या घरी चालत. विठोबा व्यवसायासोबतच पांडुरंग भक्तीत भजन, पोथी वाचन, चिंतन करत. विठोबाचे घर म्हणजे वारकऱ्यांचे हक्काचे निवासस्थान होते. अशा भक्तीमय वातावरणामुळे संताजीच्या मनावर बालपणीच अध्यात्माचा पगडा बसला. हरी भक्ताचे अव्यक्त संस्कार त्यांच्या बालमनावर हळूहळू बीज रूपाने पाखरण करत होते. प्रथेप्रमाणे बालवयात संताजींचा विवाह झाला. परंतु त्यांचे मन संसारात रमेना. याच सुमारास देहच्या पंचक्रोशीत संत तुकारामांची अभंगवाणी देववाणीप्रमाणे निनादू लागली. सामान्यजन विठ्ठल भक्तच नव्हे तर किर्तनासाठी पूर्ण गावचे गाव ओस पडू लागली. आपल्या भावपूर्ण अभंगांनी व सुमधूर वाणीने तुकोबा बुआंनी अवघे देहू स्वर्गमय करून टाकले. तुकोबांच्या किर्तनास आई वडीलांसमवेत संताजीसुद्धा आले होते व संताजींच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली. संताजी तुकोबांच्या किर्तनात इतके एकाग्र झाले की, किर्तन संपले तरी त्यांची समाधी अवस्था संपेना. शेवटी तुकोबांनीच संताजींना हलवून जागे केले. संताजींनी तुकोबांचे पाय घरले. येथेच तुकोबांना त्यांचा प्रिय शिष्य भेटला. गुरू-शिष्याची ही अमूल्य भेट त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा सांगत होत्या. 'संसार करून भक्तीमार्ग चालवा' हा तुकोबांनी संताजींना उपदेश दिला. परंतु संताजींना हे जमेनासे झाले. घरच्यांची समजूत घालून ते गुरूभक्ती सेवेस पूर्णवेळ हजर झाले. तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांचा संताजी प्रमुख भाग बनले. संताजींच्या हुशारीमुळे, निष्काम सेवेमुळे, तुकोबांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते.

sant Santaji Jagnade Maharaj     संताजी तुकोबांची सावली होऊन त्यांच्या सेवेत हजर असे. तुकोबांच्या अमृत वाणीतील अभंग ते आपल्या मनावर कोरीत होते. पाठांतर करत होते. हा अमूल्य ठेवा लिखित स्वरूपात राहावा, या अभंगांचा भविष्यात सर्वाना उपयोग व्हावा असे त्यांना वाटू लागले व त्यांनी या अभंग वाणीने, गीतगंगेचे अक्षम शृंखलेत रुपांतर करण्यास सुरुवात केली व त्यांच्या या महान कार्यामुळेच आज आपण तुकोबांचे कधीही भंग न होणारे अभंग ऐकू-वाचू शकतो. तुकोबांच्या अमृतस्वरूप अभंगवाणीस अक्षररूपाने संताजींनी अमर केले. या कार्यात तल्लीन होताना संताजींना तुकारामांच्या रूपाने पांडुरंगाचे अंतरमनात दर्शन घडत होते.

     बहिणाबाई सिटूरकर, निळोबा, गंगाराम भवाळ, कसकर असे अनेक शिष्य संत तुकारामांच्या आसपास होते. तुकोबा चिंतनासाठी नेहमी एकांतात भडारा डोंगरावर जात. ते संताजींना सोबत नेत असे. निसर्गाच मनमोहक दर्शन, पक्षांचे मंजुळ गीत या निसर्गात रममाण झालेल्या तुकोबांच्या तोंडून भक्ती काव्य प्रसवू लागले व संताजींनी या काव्यांना अक्षररूपात साकारले. अशा एकांत प्रसंगी गुरूशिष्यांचा संवाद वाढला व येथेच तुकोबांनी संताजींना वचन दिले. "संतु तुझ्या अंतकाळी आम्हास वैकुंठाहून परत येणे करावे लागेल" व देहधारी असताना दिलेले संताजींना वचन देहत्यागानंतर पन्नास वर्षानी तुकोबांनी संताजींच्या अंतसमयी पाळले. संताजीच्या कार्याबद्दल तुकारामांचे वंशज गोपाळबाबांनी त्यांच्या लिखाणात उल्लेख असा केला आहे, ते म्हणतात

संताजी तेली बहु प्रेमळ । अभंग लिहीत बसे जवळ ।।

धन्य त्यांचे भाग्य संबळ । संग सर्व काळ तुकयाचे ॥

     संत तुकारामांच्या नंतर त्यांचे अभंग लिहिलेल्या वह्या संताजींनी जीवापाड जपल्या. हा कालखंड म्हणजे शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ३५० वर्षाच्या जाचातून सुटका करण्याचा होता. मुघलांच्या अनेक स्वाऱ्या सर्वत्र होत होत्या. मंदिरे तोडली जात होती, गावांना आगी लावल्या जात. गावचे गाव लुटले जात होते. दिसेल त्यांची कत्तल केली जात. अशातच चाकणवर शाहिस्तेखानाची धाड पडली. संताजींनी यावेळी तुकोबांच्या अभंग लिहिलेल्या वह्या पाठीशी बांधून आपल्या जळत्या वाड्याला त्या भयंकर परिस्थितीत निरोप दिला. घनदौलतीपेक्षा हा अनमोल ठेवा त्यांनी वाचविला. आणि म्हणूनच आपण तुकोबांच्या अभंगवाणीचा लाभ घेऊ शकतो. श्री संताजींनी स्वत: रचलेले देखील अभंग, घाण्यावर गायलेले गीत आज प्रसिद्ध आहे. असा संतश्रेष्ठ वयाच्या ७६व्या वर्षी मार्गशिर्ष वद्य त्रयोदशीला अल्पशा आजाराने सदुंबरे या गावी अनंतात विलीन झाला. आज सदुंबरे या गावी श्री संताजी महाराजांची भव्य समाधी मंदिर वारकऱ्यांचेच नव्हे सर्व महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

- अशोक डोळसे, नगर

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj