बुलढाणा – तेली समाजाची संख्या कमी असली तरी त्यांना राजकीय महत्व मिळवून देण्यासाठी प्रथम आपली संघटन शक्ती दाखवावी. जेव्हा समाजाची एकजूट आणि निवडणुकीतील प्रभाव दिसेल, तेव्हा राजकीय नेते आपोआपच आपल्या पायघड्या घालतील. असे स्पष्ट मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय सचिव रमेश आकोटकार यांनी व्यक्त केले.

ते लोणार सरोवर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे होते.
रमेश आकोटकार पुढे म्हणाले की, समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी लवकरच रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्यात समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी युवक संघटनेने आपली संख्या वाढवावी आणि युवकांना संघटित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनीही याच विचाराला दुजोरा देताना सांगितले की, समाजातील बेरोजगार सुशिक्षित युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. तसेच समाजातील महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. महिलांची संख्या कार्यक्रमात जास्तीत जास्त दिसली पाहिजे, कारण सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत यांनी मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पादुका पूजनाने झाली. यावेळी नवनिर्वाचित लोणार नगराध्यक्षा मिराताई भुषण मापारी यांचा तेली समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच महासभेचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, युवा संघटक जयेश भिसे, ज्ञानदेव क्षिरसागर, तुषार काचकुरे, नंदकिशोर गायकवाड, जगन दादा व्यवहारे, सुधाकर रायमुलकर, विजय सोनुने, अशोक इंगळे, नागेश सोनुने यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा मिराताई मापारी, संतोष डोंबळे आणि अश्विनी क्षिरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गोरखनाथ राऊत यांनी केले.
समस्त संताजी मंडळ, बुलढाणा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade