सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्या अध्यक्षपदी अशोक भोज यांची बिनविरोध निवड
लिंब, दि. १८ जून : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये समाज संघाच्या अध्यक्षपदी अशोक भोज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिपक क्षीरसागर, कार्याध्यक्षपदी नितीन देशमाने यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या निवड प्रक्रियेदरम्यान उपस्थित समाज बांधवांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाज संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, अडचणी आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस सुरेश किर्वे, अनिल क्षीरसागर, मनोज विभुते, सोमनाथ धोत्रे, वसंत खर्शीकर, रघुनाथ दळवी, प्रमोद दळवी, तुळशीदास शेडगे, हणमंत चिंचकर, विठ्ठल चिंचकर, सुरेश चिंचकर, राजेश शेडगे, शिवाजी चतुर, रवींद्र शेडगे, लक्ष्मण गवळी, अनिल राऊत, मंगेश क्षीरसागर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
निवडीनंतर अध्यक्ष अशोक भोज यांनी आपल्या मनोगतात सातारा जिल्ह्यातील तेली समाज हा मोठ्या प्रमाणात विविध भागांत विखुरलेला असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि समाजामध्ये एकोपा वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बैठकीचे प्रास्ताविक अनिल क्षीरसागर यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन सुरेश किर्वे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मनोज विभुते यांनी मानले. नवीन कार्यकारिणीकडून समाजाच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी काम होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केला.
