माजी खासदार लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांना मरणोत्तर सन्मान ! ४ ऑक्टोबरला पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम;
रेल्वेसाठी दिलेल्या योगदानाची अखेर मिळणार पोचपावती ...
रेल्वे उद्घाटनात नामोल्लेख टाळल्याने समाजात संतापाची लाट, आता सन्मानपत्राने भरपाई
बीड-परळी रेल्वे मार्गासाठी आयुष्यभर अथक पुढाकार घेणाऱ्या माजी खासदार व दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची दि. ४ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे. या निमित्ताने सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या भक्तिभावाने व दिमाखात पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यांनी रेल्वेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची व अथक पाठपुराव्याची दखल घेत त्यांना यावेळी मरणोत्तर सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार
या भव्य कार्यक्रमासाठी गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. पुरणेश मोदी, केंद्रीय राज्यमंत्री श्री. टोकन साहु, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री श्री. अरुण साव, तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देशभरातून साहू तेली समाजाचे अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. कालिदास थिगळे व डॉ. अरुण भस्मे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्य व केंद्रस्तरीय नेत्यांची उपस्थिती लाभणे, हे या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
नामोल्लेख टाळल्याने निर्माण झाली नाराजी
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या रेल्वे उद्घाटनाच्या अधिकृत कार्यक्रमात केशरकाकूंच्या ऐतिहासिक योगदानाचा साधा नामोल्लेखही टाळण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी आणि खंत व्यक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या अथक कार्याची योग्य दखल घेत, संबंधित बैठकीत त्यांना मरणोत्तर सन्मानपत्र प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. रेल्वेसाठी काकूंनी वर्षानुवर्षे दिलेल्या योगदानाची उपेक्षा होता कामा नये, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्याचा आढावा व सांस्कृतिक कार्यक्रम
या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून केशरकाकूंनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात केलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा जनतेसमोर मांडण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी. या पवित्र निमित्ताने समाधान महाराज यांचे भावपूर्ण प्रवचन व कीर्तन देखील आयोजित करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक व भक्तिमय स्वरूप प्राप्त होणार आहे.
नागरिकांना उपस्थितीचे कळकळीचे आवाहन
या ऐतिहासिक व भावनिक सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन अॅड. कालिदास थिगळे, जगदीश काळे, विलास बडगे, अरुण डाके, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, गंगाधर घुमरे, डॉ. राजू मचाले, गिरीश देशपांडे, अरुण बोंगाने, मुखीद लाला यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांना केले आहे.
