शहराच्या मुख्य रस्त्यावरून आम्ही कस्तुरे चौकात आलो. दादा भगतांच्या घरातील मंडळींनी दर्शन घेतले. विणेकर्यांना नारळ दिला. दादांच्या वाड्यासमोर पांडुरंगाचे मंदिर, त्या मंदिरात पालखी विराजमान झाली. याच राऊळात पालखी दोन दिवस मुक्काम करणार होती. ही बातमी पुण्यातील सर्व समाजबांधवांना समजली सर्वजण दर्शनास येत होते. या सोहळ्याला यथाशक्ती देणगी देत होते.
शून्यातुन सुरू झालेली ही गंगा पावलापावलाने वाढु लागली. पालखी पुण्याकडे निघाली. पुणे तेथे काय उणे ! पुणे तेथे सर्वच नवे असे हे पुणे. या पुण्याच्या मातीचा, या पुण्याच्या पाण्याचा, या पुण्याच्या हवेचा काय गुण असावा कोण जाणे ! परंतु जे पुण्यात पिकते तेेच महाराष्ट्रात ठेाक व किरकोळ भावात विकले जाते. इथे जे पिकत नाही ते इतरत्र पिकून विकेलच याची खात्री नसते. ही पालखी याला अपवाद नव्हती.
शरद देशमाने चांगल्याचा मान राखणारे. या मातीचा, या संस्कृतीचा, या इतिहासाचा, या तत्त्वांचा, ज्यांनी ज्यांनी मान राखण्यात आपलेपण विसरून मान राखला ते कदाचित याचमुळे या घराण्याला देशमाने हे नाव मिळाले असावे. आपले नाव सार्थक करणारे हे शब्द. देमशाने पोलिस खात्यातला माणूस. पण वृत्तीन धार्मिक व श्रद्धाळू ते पुढे निघाले
चाकणचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान. मराठी माणसाची धनदौलत साठवणारा, तुकोबाचा शिष्य संताजी जगनाडे आपल्या पंढरीस जात आहे. जाता जाता आपल्या जन्मभूमीला भेटत आहे. ही भेट अविस्मरणीय ठरावी हा लोकमानस चाकणकर मंडळी टाळमृदंग घेऊन चाकणबाहेर आली. आली आली म्हणेपर्यंत संताजींची पालखी चाकणच्या शिवेवर आली. चाकणकरांचा आनंद शब्दांत मावत नव्हता. हर एकाने या भूमीच्या सुपुत्रांचे दर्शन घेतले मग संताजीचा गजर टाळ-मृदंगात करीत देहभान हरपून नाचत बागडत गावात निघाली
पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.